Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र
समृद्धी महामार्गाच्या, दहाव्या टप्प्यातलं काम येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ण
करावं- मुख्यमंत्र्यांची सूचना
**
सर्वोच्च न्यायालयाच्या
घटनापीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी
सुनावणीसंदर्भात पाच
वकिलांची समन्वय समिती गठीत
**
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन; चैत्यभूमीवरच्या शासकीय
मानवंदनेचं थेट प्रसारण
**
जागतिक मृदा दिनानिमित्त काल ठिकठिकाणी विविध
कार्यक्रमांचं आयोजन
**
राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८८ शतांश टक्क्यांवर
आणि
**
मराठवाड्यात काल पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू, तर नव्या २६९ रुग्णांची नोंद
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र
समृद्धी महामार्गाच्या दहाव्या टप्प्यातलं काम येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ण
करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल अमरावती तसंच औरंगाबाद
जिल्ह्यात या महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते, महामार्गाचं कामं
गतीनं होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असं मुख्यमंत्री
म्हणाले.
काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री
हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात गोलवाडी इथं पोहोचले, सार्वजनिक
बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा
आढावा घेतला. राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्गाच्या
या टप्प्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. सुमारे ५८ किलोमीटरच्या महामार्गावरच्या
धावपट्टीदरम्यानचे, छोटे तसंच मोठे पूल, या भागातल्या हरणांना जाण्यासाठी रस्ता, आदींची
तपशीलवार माहिती सादर करण्यात आली.
त्यानंतर स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्र्यांनी
या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही प्रकल्पाच्या
सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत
समाधान व्यक्त करत, हा देशातला या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल, असा विश्वास व्यक्त
केला.
दरम्यान, समृद्धी महामार्गामुळे बाधित
झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान फलक झळकावत, आपल्या विविध मागण्यांकडे
लक्ष वेधलं
****
मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या
पाच सदस्यीय घटनापीठासमोर येत्या ९ तारखेला होणाऱ्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय
समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक
चव्हाण यांनी ही समिती जाहीर केली. विधीज्ञ आशिष गायकवाड, राजेश टेकाळे, रमेश दुबे
पाटील, अनिल गोळेगावकर आणि अभिजीत पाटील यांचा या समितीत समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात
होणाऱ्या या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातले नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक
तसंच संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांना समन्वय समितीतल्या
सदस्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास
करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देणार आहे.
****
शेतकऱ्यांकडे असलेल्या दुभत्या गायींचं
उत्पादन वाढवण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ होईल, असं राज्याचे पशु
संवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या
सहकार्याने नागपुरात तेलंगखेडी इथं उभारण्यात आलेल्या भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या
उद्घाटन समारंभात काल ते बोलत होते. केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हे भ्रूण जास्तीत जास्त
शेतकऱ्यांच्या गायींपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र तसंच राज्य शासनाच्या समन्वयातून
पशुवैद्यकांना प्रशिक्षण देण्याची सूचना गडकरी यांनी केली. तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात
आलेल्या या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयोग होऊन, त्याचं जीवनमान - आर्थिक
स्तर उंचावला जावा, असंही गडकरी म्हणाले.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद
पदवीधर मतदार संघातले नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी केलं आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. दादर
इथं चैत्यभूमीवर आज होणारी शासकीय मानवंदना तसंच पुष्पवृष्टीचं थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या सामाजिक संपर्क माध्यमावरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन
करण्यात येणार आहे. सकाळी पावणे आठ ते नऊ या कालावधीत शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे
पुष्पवृष्टीचं प्रसारण होईल. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसंच दुपारी १२ वाजून
५० मिनिटांनी दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या
मुंबई केंद्राकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
जनसंपर्क विभागानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
विशेष माहिती पुस्तिका तयार केली आहे. काल चैत्यभूमी परिसरात मुंबईच्या महापौर किशोरी
पेडणेकर यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
वतीनं आज ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘कवितेतील बाबासाहेब’ या विषयावर
ज्येष्ठ समीक्षक कवी डॉ. महेंद्र भवरे सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या सामाजिक
संपर्क माध्यमांवर विचार मांडतील.
****
युनेस्को आणि वारको फाउंडेशनचा ग्लोबल
टिचर पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजीतसिंह डीसले यांचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते
प्रवीण दरेकर यांनी काल भेट घेऊन अभिनंदन केलं. डिसले यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून
भारतीय जनता पक्ष त्यांच्या नावाची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस
करणार असल्याचं, दरेकर यांनी सांगितलं.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
दत्तात्रय भरणे यांनी बार्शी इथं डिसले यांच्या घरी जाऊन त्यांचा आणि त्यांच्या आईवडीलांचा
सन्मान केला. डिसले यांचं कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं भरणे यांनी
नमूद केलं.
****
मृदा आरोग्याच्या क्षेत्रात भारतानं
अन्य देशांसमोर आदर्श स्थापन केला असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी म्हटलं आहे. काल जागतिक मृदा दिनाच्या पार्श्वभूमीवर एका ट्विट संदेशात
जावडेकर यांनी, संपूर्ण देशभरात मृदा आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं
मत व्यक्त केलं. फक्त जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठीच नव्हे, तर पर्यावरण संतुलनासाठीदेखील
ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचं जावडेकर यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
****
जागतिक मृदा दिनानिमित्त काल ठिकठिकाणी
विविध कार्यक्रम घेण्यात आले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन नांदेड
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. नांदेड जिल्हा मृद सर्वेक्षण
आणि चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं काल जागतिक मृदा दिनी, नांदेड इथं शेतकरी कार्यशाळा
घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माती परीक्षण अधिकारी ए. एस. गुंजकर
यांनी शेतकऱ्यांना माती आणि पाणी तपासणी करून पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्याची
मात्रा देण्याबाबत मार्गदर्शन केलं.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात ग्रामविकास
आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ५३५ किलोमीटर लांबीच्या २६४ रस्त्यांचे प्रारंभिक
मातीकाम आमदार निधीतून करणार असल्याची घोषणा आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. औसा
तालुक्यातील आलमला इथं शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना चांगले रस्ते निर्माण
करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पवार यांनी दिली.
****
उस्मानाबाद तालुक्यात किणी आणि तडवळा इथं शेतकऱ्यांना मृदा आरोग्य
पत्रिकांचं वाचन आणि त्यानुसार काढलेल्या सुपीकता निर्देशांकाप्रमाणे खत देण्याबाबत
मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी
या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केलं. रासायनिक खतांचा
वापर प्रकर्षाने टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत
आमचे वार्ताहर. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ८० गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात
आले आहेत.याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…
जिल्ह्यातल्या शेतजमिनीत आढळलेल्या नत्राचे प्रमाण मध्यम, स्फुरदचे
प्रमाण कमी पालाशचे प्रमाण मध्यम या सरासरी निष्कर्षानुसार शेतकऱ्यांनी सेंद्रीय कर्वाचं
प्रमाण वाढवण्यासाठी गांडुळ खत, शेण खत, हिरवळीची खते वापरावीत, जेणेकरून शेतजमिनीतील
सेंद्रीय कर्वाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल अशी शिफारस जिल्ह्यात मृदू चाचणी आणि सर्वेक्षण
कार्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ होऊन
जिल्ह्याच्या सुपीकता निर्देशांकात वाढ होण्यास मदत होणार आहे. परिणामी दरडोई उत्पन्नात
वाढ होऊन जिल्हा मागास जिल्ह्यांच्या यादीतून म्हणजेच केंद्र सरकारच्या निती आयोगानं
जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे. देविदास
पाठक,आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
केंद्र शासनाचे सुधारित कृषी कायदे
शेतकऱ्यांना स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता देणारे असून, या कायद्यांना काही जण गैरसमजुतीतून
तर काही जण जाणीवपूर्वक राजकारण म्हणून विरोध करत असल्याचा आरोप माजी आमदार शिवाजीराव
पाटील कव्हेकर यांनी केला आहे. ते लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना प्रक्रिया
उद्योग, निर्यातदार ठोक खरेदीदार यांच्या बरोबर शेती करार करता येतील, शेतकऱ्यांना
आपला शेतीमाल कुठेही विकण्याची परवानगी असेल, तसंच किमान हमीभाव योजना तसंच बाजार समित्याही
पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं कव्हेकर यांनी सांगितलं.
****
राज्यात
काल चार हजार ९२२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ४७ हजार ५०९ झाली आहे. राज्यभरात काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४७ हजार ६९४ झाली आहे.
तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के एवढा आहे. काल पाच हजार ८३४ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख १५ हजार ८८४ रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८८ शतांश टक्के एवढा
झाला आहे. सध्या राज्यात ८२ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २६९ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद
इथं काल तीन कोविड बाधितांचा तर जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडबाधिताचा
मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ८० नवीन रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात
४३, लातूर ३५, परभणी ३४, बीड २८, उस्मानाबाद २७, जालना २१ तर हिंगोली जिल्ह्यात
काल कोरोना विषाणू संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला.
****
दरम्यान, औरंगाबाद महापालिकेने शहरातल्या बेघर नागरिकांची कोविड चाचणी
सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत ८७ बेघरांची तपासणी करण्यात आली. काल जाधववाडी
इथं फळं तसंच भाजीविक्रेते आणि ग्राहक अशा सुमारे ४९ जणांची तपासणी करण्यात आली. या परिसरात दररोज सकाळी चाचणी करण्यात येणार आहे. काल औरंगाबाद
रेल्वेस्थानकावर १९९ तर विमानतळावर २३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद
इथले साहित्यिक आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्रीकांत उमरीकर यांनी केलं आहे.
****
हिंगोली इथले प्रतिष्ठित व्यापारी रामप्रकाश
देवडा यांचं काल पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. हिंगोली
इथल्या ओमप्रकाश देवडा बँकेचे संचालक तसंच गांधी सेवा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.
त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर इथल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.
वंदना प्रदीप उगीले यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं. देशातल्या पहिल्या खाजगी एचआयव्ही
एड्स रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे. पती डॉ. प्रदिप उगीले यांच्या
निधनानंतर डॉ वंदना यांनी या एचआयव्ही एड्स रुग्णालयाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांच्या
पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
//***********//
No comments:
Post a Comment