Wednesday, 24 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक २४ मार्च २०२१

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक २४ मार्च २०२१

****

जागतिक क्षयरोग निवारण दिन आज देशभरात पाळला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघानं निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाच्या धोरणानुसार भारत वैश्विक आरोग्य रक्षणाच्या ध्येयासाठी कटिबद्ध असून, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरलेली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या तत्वानुसारचं राबवण्यात येत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यामिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. भावी पिढ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं आहे.

****

टाळेबंदीच्या काळात गेल्यावर्षी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेनं दिलेल्या लोन मोरॅटोरियम - कर्जवसुली स्थगिती काळातील थकीत इएमआयवरील व्याजावर व्याज आकारु नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं बँकांना दिले आहेत. तसंच ज्या बँकांनी असे चक्रवाढ व्याज घेतलं आहे, ते कर्जदारांना परत करावं, किंवा त्यांच्या ईएमआयमध्ये ते समायोजित करण्यात यावं, असं न्यायालयानं सांगितलं आहे. सहा महिने दिलेल्या लोन मोरॅटोरियमला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

****

लोकसभेत वित्त विधेयक २०२१ ला काल मंजुरी देण्यात आली. सरकार करविषयक प्रक्रिया सोपी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळी नमूद केलं. राज्यसभेत खर्च विनियोग विधेयकाला काल आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली.

****

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि २२ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांनी, काल गडचिरोली इथं पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. यात एका नक्षल दाम्पत्याचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

****

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी, राज्यपाल भगतसिं कोश्यारी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केलं. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास उडाला आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

  

No comments: