Monday, 1 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.03.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक०१ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ.

·      पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांचा वनमंत्री मंत्रीपदाचा राजीनामा.

·      राज्याची आर्थिक घडी विस्कटली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाल्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका.

·      ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून सुरूवात.

·      मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच्या प्रशासक नियुक्तीस, मुदतवाढ देण्याचा तसंच नांदेडला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता.

·      राज्यात आठ हजार २९३ तर मराठवाड्यात ६३९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.

आणि

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभू्मीवर हिंगोली जिल्ह्यात आजपासून सात दिवस संचारबंदी.

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनास प्रारंभ होईल. राज्याचे अर्थमंत्री- उपमुख्यमंत्री अजित पवार, हे येत्या आठ मार्चला महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. कोरोना विषाणू संसर्ग काळात भ्रष्टाचार करण्यात आला, असा त्यांनी आरोप केला, या आरोपातून ते कोरोना योद्ध्यांची चेष्टा करत असून, आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांची कीव करावीशी वाटते, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, दुसरी लाट वाढू नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात रूग्ण संख्या वाढत आहेत तिथं सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला असल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूजा चव्हाण हिचा मृत्यू दुर्दैवी असून, या प्रकरणाचा स्वतंत्र आणि निष्पक्षरित्या तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजा चव्हाणचे आई-वडील आज आपल्याला भेटले, त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, मात्र नैतिकतेच्या आधारावर राठोड यांनी राजीनामा दिला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, मंत्रीपदापासून दूर राहून या संदर्भातल्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं, राजीनामा दिल्यानंतर राठोड यांनी सांगितलं. चौकशीपूर्वीच विरोधी पक्षातर्फे आपली बदनामी करण्यात आली, पोलिस तपास करत आहेत, त्यातून सत्य बाहेर यावं ही आपली भूमिका असल्याचंही, राठोड म्हणाले. पूजा चव्हाण सोबतची त्यांची छायाचित्रं तसंच या प्रकरणासंबंधी ध्वनिफीत सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यापासून, भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

****

राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर, ते वार्ताहरांशी बोलत होते. वाळू चोरी, पोलिसांच्या बदल्या, कोरोना विषाणू संसर्गाच्या परीस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून, हे विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाचा पुढचा टप्पा आजपासून राज्यात सुरू होणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत उपलब्ध असेल, तर खासगी रुग्णालयात प्रत्येक डोसकरता, २५० रुपये शुल्क द्यावं लागेल, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डी. एन. पाटील यांनी दिली. विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरच्या व्यक्ती, आणि ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, उद्यापासून ‘कोविन अॅप’वर लसीकरणासाठी नोंदणी करू शकतील, याशिवाय रुग्णालयांमध्ये थेट जाऊन सुद्धा वेळ घेता येईल, असं त्यांनी सांगितलं. लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणार असलेल्या रुग्णालयांची यादी लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचंही, लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं.

औरंगाबाद शहरात तीन आरोग्य केंद्रार ज्येंष्ठांकरता लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या बन्सीलाल नगर, एक-११ आणि एन-आठ या तीन आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत लस दिली जाणार असल्याचं, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आरक्षणाच्या कायद्यासाठी ज्या प्रमाणे विधीमंडळात सर्व सदस्य एकत्र आले, त्याप्रमाणेच यापुढेही हा न्याय हक्काचा लढा सामुहिकपणे लढू, यासाठी राज्य शासन म्हणून जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते सर्व केलं जाईल, त्यात कमी पडणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, मुदत संपलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच्या प्रशासक नियुक्तीस, मुदतवाढ देण्याचा निर्णय, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे, त्यामुळे प्रशासक नियुक्त काळात निवडणुका घेणं शक्य नसल्याचं, राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला कळवलं असून, प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळानं काल हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकही लांबली आहे.

 

बाल संगोपन योजनेअंतर्गत, अनाथ आणि तत्सम बालकांचं संगोपन करणाऱ्या पालक तसंच संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात, वाढ करण्यासही, राज्य मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली. आता पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणारं सहायक अनुदान, ४२५ वरून ११०० रुपये इतकं, तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना, प्रती बालक ७५ वरून १२५ रुपये इतकं करण्यात आलं आहे. यामुळे प्रति बालकाला देण्यात येणारं अनुदान एक हजार २२५ रुपये इतकं होणार आहे.

 

नांदेड इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं, शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यासही, मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० निश्चित करण्यात आली असून, यासाठी आवश्यक पदनिर्मितीला, तसंच १६ कोटी नऊ लाख १४ हजार ४८० रुपये खर्चास, मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, आणि घटक महाविद्यालयातल्या शिक्षण आणि शिक्षक समकक्ष पदांना, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन लागू करण्याचा, तसंच मुंबईत महापौर निवासस्थान परिसरातल्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या ४०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा निर्णयही मंत्रीमंडळानं घेतला आहे.

****

राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांनी काल पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

****

परीक्षांचा काळ येत असून लवकरच ‘परीक्षा पे चर्चा करु’ त्यासाठी सूचना पाठवा, चर्चेत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा हा चौऱ्याहत्तरावा भाग होता. डॉ.सी.व्ही रमण यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ काल साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, नाशिकच्या स्नेहिल यांच्या `रमण इफेक्ट` संदर्भातील संदेशाचा उल्लेख करुन, देशाचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. जून मध्ये पावसाळ्याच्या अनुषंगानं जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं, जल शक्ती अभियान सुरू करण्यात येणार आहे. ‘जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल, ते साठवा’, हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून, पाणी बचत आणि नियोजनाची माहितीही पंतप्रधांनांनी यावेळी दिली.

****

राज्यात काल आठ हजार २९३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ५५ हजार ७० झाली आहे. तर काल तीन हजार ७५३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख २४ हजार ७०४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ६२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १५४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७७ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत

****

मराठवाड्यात काल नव्या ६३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या दोन, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २५६ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९०, लातूर ८६, जालना ७९, बीड ४३, परभणी ३३, हिंगोली ५१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० नवे रुग्ण आढळून आले.

****

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात आजपासून सात दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले. दरम्यान, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर काल हिंगोलीत बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

****

लातूर शहरात शनिवार आणि रविवारी संचारबंदी पाळण्यात आली. काल जिल्ह्यात संचारबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काल दुपारनंतर अनेक दुकानं सुरु झाली, तर नागरीकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. 

****

बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. प्रशासनानं सर्व दुकानं उघडण्याची मुभा दिली असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्व दुकानं उघडी राहणार आहे. इतरही २५ प्रकारच्या सेवा खुल्या करण्यात आल्या आहेत. शहर आणी ग्रामीण भागातले आठवडी बाजार मात्र पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

****

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन परभणी इथं व्यापारी, व्यावसायिक नागरिकांची तपासणी तात्काळ आणि सुलभ व्हावी यासाठी, विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेंतर्गत परभणी शहरातल्या वैष्णवी मंगल कार्यालय, मनपा रुग्णालय आणि जुना पेडगाव रोडवरील आरोग्य केंद्रावर आरटीपीसआर आणि रॅपिड अँटिजन चाचणी शिबिर आयोजित केलं आहे. शहरातले व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांनी त्यांच्या सोईनुसार सदर केंद्रावर जाऊन तात्काळ कोरोना तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.

****

केंद्र सरकारनं केलेल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत काल राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं पेट्रोलपंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकांखाली ‘चूल मांडा’ आंदोलन केलं. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा झालेल्या गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. एका महिन्यात करण्यात आलेली १०० रूपयांची गॅस दरवाढ, सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उध्वस्त करणारी असल्याची टीका, चाकणकर यांनी केली. केंद्र सरकारच्या विविध करांना महागाईसाठी जबाबदार ठरवत याचा निषेध म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार सायकलवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवनात येणार आहेत.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या, महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या संचालकपदी, हिंदी विभागातले प्राध्यापक डॉ.संजय नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अध्यासन केंद्राचे संचालक तथा मराठी विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य यांच्याकडे, मुकुंदराज अध्यासन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

****

औरंगाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून महापालिकेचं पथक दंड वसूल करत आहे. काल ९१ व्यक्तींकडून ५०० रुपयेप्रमाणे, ४५ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला.

****

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट- क सरळसेवा भरतीसाठी, काल राज्यभर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची प्रश्र्न पत्रिका एक तास उशिरा आल्यानं औरंगाबाद शहरातल्या काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींनी गोंधळ घातला.

दरम्यान, या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन उत्तरे पुरवणारी कंट्रोल रुम चिकलठाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. खोकडपुरा परिसरातल्या एका अभ्यासिकेतून उत्तरे पुरवणाऱ्या या रॅकेटमधल्या तिघांना, तर गेवराई तांडा इथल्या एका परीक्षा केंद्रातून दोघांना पोलिसांनी अटक केली. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...