Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा
अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि
तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
आधुनिक भारतातली गावं स्वयंपूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न - स्वामित्व योजनेचा
शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
**
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयचे छापे
**
औरंगाबाद इथं आज ३५ कोविडग्रस्तांचा मृत्यू
आणि
**
बीड जिल्ह्यात नवे एक हजार १९५ कोविड रुग्ण
****
आधुनिक
भारतातली गावं स्वयंपूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. स्वामित्व योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान बोलत होते. देशातल्या
ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी सुमारे दोन लाख २५ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून
दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशातल्या सहा लाख ६२ हजार गावांमध्ये या योजनेचा
विस्तार करण्यात आला आहे. भूजल, स्वच्छता, कृषी आणि शिक्षण या चार बाबींवर अधिक काम
करण्याची सूचना पंतप्रधानांनी ग्रामपंचायतींना केली. ई स्वामित्व योजनेअंतर्गत चार
लाखापेक्षा अधिक लाभार्थींना ई प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहेत, या आधारे हे नागरिक
बँका तसंच आर्थिक संस्थांच्या कर्जसुविधेचा लाभ घेऊ शकतात. २०२१ चे राष्ट्रीय पंचायत
पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी कोविड
प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
दरम्यान
पंतप्रधान उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
प्रसारित होईल.
****
केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळानं विविध करांचा भरणा करण्यासाठी दोन महिने मुदतवाढ दिली आहे. विवाद
से विश्वास तक योजनेत तसंच आयकरांतर्गत करनिर्धारणाची मुदतही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात
आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर करदाते, विशेषज्ञ तसंच संबंधित घटकांकडून केली जाणारी
मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिली आहे.
****
न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी आज देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश रमणा यांची
१६ महिन्यांसाठी नियुक्ती असेल.
****
रेमडीसीविर
इंजेक्शनच्या राज्यातील तुटवड्यामुळे ते पुरवण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या आवाहनास
काही देशांनी संमती दर्शवली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिरातला सिंगापूर, बांगलादेश आणि इजिप्त या देशांनी
प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, रेमडीसीविर परदेशातून आयात करण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या
विनंतीस केंद्राची लवकरच परवानगीही मिळणार असल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे
सांगण्यात आलं आहे. रेमडीसीविरचा तुटवडा दूर करून कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी
राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
नाशिकसह
विरार इथं रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं
फायर तसंच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी
जिल्हा यंत्रणांना दिले आहेत. कुंटे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस
आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा
असून पोलिस संरक्षणात त्यांची वाहतुक करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
राज्याचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध प्रथम माहिती अहवाल-एफआयआर दाखल झाल्यानंतर,
आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं देशमुखांच्या मालमत्तांची झडती घ्यायला
सुरुवात केली आहे. त्यांच्या नागपूर, काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयनं छापे टाकले
आहेत. देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम सात आणि भारतीय दंड
विधानाच्या कलम १२० ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देशमुख यांची सीबीआय मार्फत
चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्यानंतर
उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. गेल्या पाच एप्रिलला अनिल
देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
****
औरंगाबाद
इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज ३५ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला. मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या तीन, आणि नाशिक तसंच
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित २६ मृत रुग्ण औरंगाबाद
जिल्ह्यातले आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात ८३ नवे रुग्ण उपचारासाठी
दाखल झाले.
****
बीड
जिल्ह्यात आज एक हजार १९५ नवे कोविड बाधित आढळले, यापैकी बीड तालुक्यात सर्वाधिक २०८
रुग्ण आढळले. आष्टी तालुक्यात २०१, अंबाजोगाई तालुक्यात १९४, केज १३०, गेवराई १२४,
परळी ७२, पाटोदा ६५, माजलगाव ५९, शिरुर ५८, धारुर ५०, तर वडवणी तालुक्यातल्या ३४ रुग्णांचा
समावेश आहे.
****
परभणी
जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचं आज पहाटे कोविड संसर्गावर उपचार सुरु असतांना
रुग्णालयात निधन झालं. १५ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयत दाखल करण्यात आल होतं.
****
नांदेड
वाघाळा महानगपालिकेने १९ एप्रिल पासून सुरू केलेल्या जंबो कोविड रूग्णालयात सध्या ७०
रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी आज सात रूग्ण बरे होऊन घरी परतले. या रूग्णांना जिल्हाधिकारी
डॉ विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी निरोप दिला.
****
औरंगाबाद
नजिकच्या एकूण सहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज
भेटी दिल्या. यात, वाळूज औद्योगिक वसाहत, गेवराई, चितेगाव आणि शेंद्रा या ठिकाणी असलेल्या
प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्रकल्पामधून एकूण दहा
मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना
मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली.
****
लातूर
जिल्ह्यातील रुग्णालयं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सध्याच्या कोविड प्रादुर्भावावर मात
करण्यासाठी एकमेकांसोबत समन्वय राखत काम करण्याची आवश्यकता असल्याचं राज्यमंत्री संजय
बनसोडे यांनी नमूद केलं आहे. ते आज उदगीर इथं पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीरसह जळकोट
तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाच्या सद्य-स्थितीचा आढावा - उपाय योजना संदर्भातल्या
बैठकीत ते बोलत होते.
****
औरंगाबाद
इथल्या महावितरणच्या वीजग्राहकांना त्यांच्या वीज वापराची नोंद अर्थात मीटर रीडिंग
महावितरणला स्वत:हून पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे लावण्यात
आलेले निर्बंध आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता महावितरणला मीटर रीडिंग घेणं अवघड
आहे. त्यामुळे महावितरण मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे मीटर रीडिंग पाठवावं असं
आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या नागरिकांना आरोग्याच्या तक्रारींवर घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी केंद्र
शासनानं ई-संजीवनी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी केलं आहे. सद्यस्थितीत
काही नागरिक भीतीपोटी दवाखान्यात जात नाहीत. त्यांची आरोग्य परिस्थिती आवाक्याच्या
बाहेर गेल्यानंतर उशीराने दवाखान्यात येत आहेत. यामुळे बराचसा विपरीत परिणाम होत असल्याचे
दिसून येत आहे. कोणालाही घरबसल्या त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत मोफत सल्ला घेण्याची
संधी ई-संजीवनी ऑनलाइन अॅप आणि संकतस्थळाद्वारे घेता येणं शक्य आहे.
****
औरंगाबाद
इथल्या क्रीडा-भारती संस्थेद्वारे ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
कोरोना प्रादुर्भामुळे खेळाडूंमध्ये निर्माण झालेलं नैराश्य दूर करुन त्यांचा उत्साह
वाढवण्यासाठी खेळाडूंसह अन्य नागरिकही घरबसल्या
ह्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन विविध खेळाचा आनंद घेऊ शकणार आहेत. ह्या क्रीडा महोत्सवात
१२ खेळांचा समावेश असून सहभागासाठी गुगल फॉर्म द्वारे रेजिस्ट्रेशन झाल्यावर खेळानुसार
सहभागी खेळाडूंना व्हाट्सॲपद्वारे खेळाचे नियम-अटी कळवल्या जाणार आहेत. दोरी उडी, बास्केटबॉल
ड्रिब्लिंग, कुस्तीच्या सपाट्या मारणे, जिम्नॅस्टिक, महिलांसाठी सीट-अप, लाठी-काठी,
कराटे-काटा, गदा चक्र, सूर्यनमस्कार, बुद्धिबळ, ल्युडो आदी प्रकारात या ऑनलाईन क्रीडा
स्पर्धा होणार आहेत. २७ तारखेला हनुमान जयंतीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धांमध्ये
हनुमान चालिसा पठणाचीही स्पर्धा होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात संचारबंदीच्या काळात कपड्याचं दुकान सुरु
ठेवणाऱ्या दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
****
कोविड संसर्गामुळे
मरण पावलेले महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक तसंच बाह्यस्रोत कर्मचारी
यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेला महावितरणने
मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊन ती आता ३० जून २०२१ पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment