Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी
साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
**
१८ ते ४४ वयोगटाला कोविड लस मोफत देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब
**
राज्यात ९ लाखावर बांधकाम कामगारांच्या खात्यात १३७ कोटी ६१ लाख रुपये मदतनिधी जमा
**
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं
आज कोविड संसर्गानं निधन
आणि
**
औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात आज ३१ कोविडबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
****
१८
ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याच्या निर्णयावर आज
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी एका ट्वीट संदेशातून ही माहिती दिली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य
विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण
केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लस उपलब्ध
असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून
देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या मोफत लसीकरणासाठी सुमारे दोन
कोटी लसीच्या मात्रा खरेदी कराव्या लागणार असून, त्यासाठीच्या खर्चाला राज्यशासनानं
मंजूरी दिली असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
महाराष्ट्राच्या ५ कोटी ७१
लाख जो काही १८ ते ४४ वयोगटातला घटक आहे. त्यांना फ्री व्हॅक्सीनेशन करायचं, शंभर टक्के
लोकांना फ्री व्हॅक्सीनेशन करायचं अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात
आलेला आहे. आणि त्यामुळे अंदाजे दोन कोटी व्हॅक्सीन डोसेस हे राज्य शासनाला विकत घ्यावे
लागतील ज्याचा अंदाजे खर्च ६५०० कोटी रुपये असेल, ६५०० कोटी रुपये खर्चाला राज्यशासनाने
मंजूरी दिली.
****
राज्यात
ब्रेक द चेन अंतर्गत सध्या सुरू असलेली अंशत: टाळेबंदी येत्या १५ मे पर्यंत वाढण्याची
शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी
बोलताना, ही माहिती दिली. कोविड संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी आवश्यक असल्याचं सांगताना
थोरात म्हणाले..
आपले जे नागरिक आहेत, ते
एकत्र आले की, संसर्ग वाढतो आणि संसर्ग वाढू नये याकरता लॉकडाऊन अत्यंत महत्वाचा आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कोणी लक्षणे दिसतील त्यांना बाहेर काढून त्यांना औषधोपचार
करण, लवकर बर करण हा धोरणाचा भाग आहे. आणि म्हणून लॉकडाऊन हा काही काळाकरता वाढवावा
लागेल. मला असं वाटत की, माननीय मुख्यमंत्री स्वत: याबतीत निवेदन करणार असतील, पण १५
मे पर्यंत लॉकडाऊन वाढू शकतो.
****
राज्यातल्या
बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला
आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत तसंच इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत
नोंदणीकृत १३ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये अर्थसहाय्य त्यांच्या
बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाख
कामगारांपैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आलं आहे.
एकूण १३७ कोटी ६१ लाख रुपये निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं,
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं आज मुंबईत कोविड संसर्गानं
निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. तीन वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले
गायवाड यांनी, राज्य सरकारमध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च
आणि तंत्रशिक्षण, अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला. २००४ साली झालेल्या लोकसभा
निवडणुकीत गायकवाड यांनी, तत्कालिन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.
२०१७ ते २०२० या काळात, ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा
गायकवाड यांचे ते वडील होत. गायकवाड यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री तसंच
उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांनी गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
रेमडेसीविर
या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा तसंच त्याचे उत्पादन कसं वाढवता येईल याची पाहणी करण्यासाठी
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी विविध औषध निर्मिती कंपन्यांना
प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपन्यांनी उत्पादनात वाढ करावी, असं आवाहन डॉ. शिंगणे यांनी
या कंपन्यांना केलं आहे.
****
इयत्ता
पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने राज्यातल्या शाळांना उन्हाळी सुटी
जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. शालेय शिक्षण विभागाने
गेल्या वर्षी १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करुन ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य दिलं
होतं. विद्यार्थ्यांना दरवर्षी ३० एप्रिलपासून आणि शिक्षकांना १ मे रोजीचा महाराष्ट्र
दिनाचा कार्यक्रम साजरा केल्यानंतर २ मे ते १५ जून अशी उन्हाळी सुट्टी जाहीर केली जाते.
यंदा परीक्षा रद्द केल्यानं, आता शैक्षणिक सत्रही संपल्यात जमा आहे. परंतु शासनाने
उन्हाळी सुट्टीसंदर्भात अजून तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सुटी मिळणार
की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज ३१ कोविडबाधितांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. यापैकी चार रुग्ण जालना जिल्ह्यातले, दोन अहमदनगर जिल्ह्यातले, एक रुग्ण
नाशिकचा तर उर्वरित २४ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत. दरम्यान घाटी रुग्णालयात आज
सकाळच्या सत्रात कोविड संसर्ग झालेले ६६ नवे रुग्ण दाखल झाले, तर ३० जणांना कोविड संसर्गातून
मुक्त झाल्यानं, सुटी देण्यात आली.
****
जालना
जिल्ह्यातल्या घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला प्राणवायू प्रकल्प आज कार्यान्वित
करण्यात आला. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकल्पाचं उदघाटन
केलं. या प्रकल्पातून दररोज १२ जंबो सिलिंडर प्राणवायू निर्मिती होणार असून, एका सिलिंडरमध्ये
सात हजार लीटर प्राणवायू साठवण्याची क्षमता असल्याची माहिती टोपे यांनी दिली. या रुग्णालयातल्या
३० खाटांना या प्रकल्पातून प्राणवायू पुरवला जाणार असून, टप्प्याटप्प्यानं प्रकल्पाची
क्षमता वाढण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
हिंगोली
जिल्हयात मागील एक वर्षापासून चोवीस तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या
आरोग्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून स्वतंत्र ४० खाटांचं कोविड
सुश्रुषा केंद्र आजपासून सुरु करण्यात आलं आहे.
कोरोना झालेल्या मात्र लक्षणं नसलेल्या
रुग्णांवर या ठिकाणी उपचार
केले जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं राष्ट्रीय
स्वयंसेवक संघानं घेतलेल्या रक्तदान शिबीरात आज १०१ दात्यांनी
रक्तदान केलं. परभणी शहरात आज रामकृष्णनगरात वाकोडकर मित्रमंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ७५ जणांनी
रक्तदान केलं.
****
औरंगाबाद
ग्रामीण जिल्हा पोलीस दलात कार्यरत ४५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच त्यांच्या कुटूंबीयांसाठी आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत औरंगाबाद इथं विशेष लसीकरण शिबीर
आयोजित करण्यात आलं आहे. आज या शिबीरात ७० जणांना कोविड लस देण्यात आली.
****
नांदेड इथल्या भाग्यलक्ष्मी
महिला सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक मधुकर कुलकर्णी यांचं आज
अल्पशा आजारामुळे निधन
झालं. ते ६९ वर्षे वयाचे
होते. ते सहकार भारती चे कार्यवाह
आणि राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात कवठा इथल्या कोविड केंद्रात आज एका ६० वर्षाच्या रुग्णाचा
मृत्यू झाला. त्यानंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर नगर
पंचायतीचे मुख्याधिकारी शेलैश फडसे यांनी या मृतदेहावर
अंत्यसंस्कार केले.
//**********//
No comments:
Post a Comment