Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड-१९ ची
सौम्य लक्षणं असलेले किंवा लक्षण रहित रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठी, केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं, सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरातली
ऑक्सिजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, आणि कोविडची कोणतीही लक्षणं नाहीत, मात्र
चाचणीत कोविड झाल्याचं दिसून आलं, अशा रुग्णांना लक्षणरहीत रुग्ण म्हणावं. अशा रुग्णांचा
गृह विलगीरकणात ठेवण्यासाठी, रुग्णाच्या घरात विलगीकरणाची सोय असणं, रुग्णाची देखभाल
करण्यासाठी एक व्यक्ती घरात असणं, आवश्यक आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना,
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसीवीर इंजेक्शन देऊ नये, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं
आहे.
****
देशाचे माजी
महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे
होते. सोराबजी हे अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्वपूर्ण
पदावर होते. १९९७ साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी
म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं होतं.
****
देशात ऑक्सिजन
पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत, असे निर्देश, दिल्ली उच्च
न्यायालयानं दिले आहेत. दिल्लीतल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या मुद्यावर सुनावणी करताना
काल न्यायालयानं हे निर्देश दिले. केंद्र सरकार ऑक्सिजनचा पुरवठ्यात अडथळा आणण्याचा
प्रयत्न करत आहे, असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं, तर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी
आम्ही काम करत आहोत, असं उत्तर केंद्र सरकारनं दिलं आहे. दिल्ली मुंबईसह इतर अनेक शहरांमध्ये,
ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, सध्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन प्लांट
उभारण्याबरोबर, ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून वेगानं वाहतूक करण्याला प्राधान्य
दिलं जात असल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
कोविड-19 प्रतिबंधासाठी
केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम ३१ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. राज्य सरकारांनी
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत, परिस्थितीचा आढवा घेऊन, विविध उपाययोजना लागू कराव्या,
असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दहा टक्क्यांहून अधिक बाधित
रुग्ण आहेत, किंवा ज्याठिकाणी रुग्णालयांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत,
अशा जिल्ह्यांची यादी तयार करुन, त्याठिकाणी जनजागृती अभियान राबवावं, असं केंद्र सरकारनं
सांगितलं आहे.
****
सरकारी तपासात
हस्तक्षेप केल्याप्रकरणी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची,
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप
यांनी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून,
पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला ताब्यात घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण
दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, सामाजिक माध्यमातून यावर गदारोळ माजताच, त्यांनी
सारवासारव केली. मात्र एखाद्याची चौकशी चालू असताना पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं
हा अपराध असल्यानं, फडणवीस आणि दरेकर यांची चौकशी करावी, अशा मागणीचं पत्र, आपण गृहमंत्री
दिलीप वळसे-पाटील यांना दिल्याचं, भाई जगताप यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या
किनवट तालुक्यातल्या मांडवी इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश पाटील राठोड यांचं काल
नांदेड इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. प्रकाश राठोड यांच्या न्यायदानाच्या भूमिकेमुळे
अनेकांचे संसार जुळले, त्यामुळे त्यांना बंजारा समाजात मानाचं स्थान होतं. माजी खासदार
उत्तमराव राठोड यांचे ते बंधू होत.
****
राज्यात सध्या
कडक निर्बंध लागू असून, निवृत्ती वेतन धारक, दिव्यांग आणि निराधारांना बँकेच्या वतीनं
रक्कम घरपोच देण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. पक्षाच्या वतीनं
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. ज्या बँकांना
घरपोच पगार मोफत देणं शक्य नसेल, त्यांनी नाममात्र शुल्कावर संबंधीत पगारी घरपोच देण्याबाबत,
जिल्ह्यातल्या सर्व बँकांना सूचित करावं, जेणेकरुन जेष्ठ नागरीक आणि दिव्यांगांना कोविड
संक्रमणापासून सुरक्षित ठेवता येईल, आणि त्यांची फरफट होणार नाही, असं या निवेदनात
म्हंटलं आहे.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या
वतीनं शहरातल्या सर्वच आरोग्य केंद्रावर आजपासून लसीकरण सुरु झालं. शासनाकडून कोविड-19
ची लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती, मनपाचे आयुक्त देविदास पवार यांनी
दिली. सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
तामसा इथं पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीनं, काल रक्तदान शिबिर
घेण्यात आलं, यावेळी ६० जणांनी रक्तदान केलं. तर घुंगराळा इथं राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या
वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं, यात ५६ जणांनी रक्तदान केलं.
****
No comments:
Post a Comment