Tuesday, 27 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात काल नव्या तीन लाख २३ हजार १४४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ९७ हजार ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दोन लाख ५१ हजार ८२७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, एक कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या २८ लाख ८२ हजार २०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना सभा आणि मोर्चांसाठी परवानगी दिली, त्यामुळे कोरोना लाटेला निवडणूक आयोग जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संतप्त टीप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसंभामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं दिसून आल्यानं, न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली.

****

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव असून, व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी सोडवून सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका असल्याचं, केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. टाळेबंदीमुळे व्यापार-उद्योग आणि सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचं सांगून, कर्जाची पुनर्रचना, व्याजात सवलत, कमी व्याजाने कर्जपुरवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी यावेळी केली.

****

कोविड रुग्णांवरील प्रभावी उपचारासाठी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे, ती भागवण्यासाठी, विभागीय मंडळांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतल्या सर्व पदांची तात्काळ भरती करावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं बोलत होते. कोविड रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर, परिचारिका, यासह अन्य कर्मचारी वर्गाच्या भरतीसाठी, राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना पदभरतीचे निर्देश दिल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचं निरीक्षण करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. शॉर्टसर्किटमूळे आणि चुकीच्या विद्युत संच मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात ऊर्जा विभागाने एक परिपत्रक जारी केलं असून, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सर्व रुग्णालयातल्या विद्युत यंत्रणेचं निरीक्षण करून त्याबाबतचा अभिप्रायासह अहवाल संबंधित आस्थापनेस कळवून त्याचं निराकरण केल्यास, विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणं शक्य होईल, असं ऊर्जा विभागानं म्हटलं आहे. 

****

क्रीडा विश्वातील दोष दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत प्रचारक रामानंद काळे यांनी केलं आहे. क्रीडा भारतीच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आयोजित ऑनलाईन तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेळ ही चल समाधी आहे. खेळांमधून युवकांमधे एक उत्तम चारित्र्य निर्माण करण्याचं कार्य क्रीडा भारती करत असल्याचं ते म्हणाले. या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये १२ विविध प्रकारच्या खेळांची ऑनलाईन स्पर्धा होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापुर तालुक्यातल्या लाडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं लसीकरण बंद करण्यात आलं होतं. यासंदर्भात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांची नियुक्ती केली आहे. तर शासकीय कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा आणि व्यवस्थापनाकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी सहा लाख ३१ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करून, कोविड सेंटरसाठी मदत निधी उभारला आहे. त्यांनी हा निधी तालुक्याचे आमदार नितीन पवार यांना सुपूर्द केला.

****

वाशिम जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने केलेल्या कारवाईत काळ्या बाजारात विक्रीला जाणारे ६४ सिलेंडर जप्त करण्यात आले. पोलिसांनी एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

****

No comments: