Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक
नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा,
एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
· राज्यात १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या
सर्वांनाच कोविड प्रतिबंधात्मक
लस मोफत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; मात्र एक मे पासून लसीकरणाला प्रारंभ नाही.
· टाळेबंदीची मुदत १५ मे पर्यंत वाढण्याची
शक्यता.
· राज्यात ६३ हजार ३०९ नविन
कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १७१ जणांचा मृत्यू तर सात हजार ४९७ बाधित.
· काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोविड संसर्गानं निधन.
· ‘महाराष्ट्र दिन’ साधेपणानं साजरा करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना.
· जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीचा तसंच बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील प्राणवायू
निर्मिती प्रकल्प कार्यान्वित.
· नांदेड जिल्ह्यात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते संभाजी ढवळे यांची जाळून घेऊन
आत्महत्या.
आणि
· मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस.
****
१८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याच्या निर्णयावर,
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत
असून, नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक
गर्दी करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या
कंपन्यांच्या लस उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्यानं जास्तीत
जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या मोफत लसीकरणासाठी सुमारे दोन कोटी लसीच्या मात्रा खरेदी कराव्या लागणार
असून, त्यासाठीच्या खर्चाला राज्यशासनानं मंजूरी दिली असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
महाराष्ट्राच्या
५ कोटी ७१ लाख जो काही १८ ते ४४ वयोगटातला घटक आहे, त्यांना फ्री व्हॅक्सीनेशन करायचं,
शंभर टक्के लोकांना फ्री व्हॅक्सीनेशन करायचं अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण निर्णय या
ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे अंदाजे दोन कोटी व्हॅक्सीन डोसेस हे राज्य
शासनाला विकत घ्यावे लागतील ज्याचा अंदाजे खर्च ६५०० कोटी रुपये असेल, ६५०० कोटी रुपये
खर्चाला राज्य शासनाने मंजूरी दिली.
****
दरम्यान, सध्या लसीच्या मात्रा उपलब्ध नसल्यानं, परवा एक मे पासून नियोजित १८ ते
४४ वयोगाटातल्या लसीकरणाला प्रारंभ होणार नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. कोविन
ॲपवर नोंदणी, तारीख आणि वेळ निश्चित करूनच लस घेता येईल, थेट केंद्रावर जाऊन लस घेता
येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. सध्या लसीकरण सुरू असलेल्या केंद्रांवर फक्त ४५
वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण होईल. १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन
केली जातील, अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था
असून, प्रत्येक संस्थेत दररोज १०० जणांचं लसीकरण झालं, तरी एका दिवसात १३ लाख लोकांचं लसीकरण होऊ शकतं, या गतीनं सहा महिन्यांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचं,
टोपे यांनी सांगितलं.
****
राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत सध्या सुरू असलेली अंशत: टाळेबंदी, येत्या १५ मे पर्यंत
वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, एका
खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, ही माहिती दिली. कोविड संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी आवश्यक
असल्याचं सांगताना, थोरात म्हणाले –
आपले
जे नागरिक आहेत, ते एकत्र आले की, संसर्ग वाढतो आणि संसर्ग वाढू नये याकरता लॉकडाऊन
अत्यंत महत्वाचा आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कोणी लक्षणे दिसतील त्यांना बाहेर काढून
त्यांना औषधोपचार करणं, लवकर बरं करणं हा धोरणाचा भाग आहे. आणि म्हणून लॉकडाऊन हा काही
काळाकरता वाढवावा लागेल. मला असं वाटत की, माननीय मुख्यमंत्री स्वत: याबतीत निवेदन
करणार असतील, पण १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढू शकतो.
****
राज्यातल्या बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार, महाराष्ट्र इमारत तसंच इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळामार्फत, नोंदणीकृत १३ लाख बांधकाम कामगारांना, प्रत्येकी दीड हजार
रुपये अर्थसहाय्य, त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्यानुसार राज्यातल्या १३ लाख कामगारांपैकी, नऊ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. एकूण १३७ कोटी ६१ लाख रुपये निधी थेट बांधकाम मजुरांच्या
खात्यात झाला जमा करण्यात आल्याचं, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
रेमडेसीविर या औषधाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसंच त्याचं उत्पादन कसं वाढवता येईल
याची पाहणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी, विविध
औषध निर्मिती कंपन्यांना प्रत्यक्ष भेट दिली आहे. कंपन्यांनी उत्पादनात वाढ करावी,
असं आवाहन डॉ.शिंगणे यांनी केलं आहे.
****
राज्यात काल ६३ हजार ३०९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४४ लाख ७३ हजार ३९४ झाली आहे.
काल ९८५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६७ हजार २१४ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला
आहे. काल ६१ हजार १८१ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३७ लाख ३० हजार ७२९ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ७३ हजार ४८१ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सात हजार ४९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १७१
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या ३७, लातूर २९, नांदेड २४, जालना २२, बीड १९, परभणी १८, तर हिंगोली
आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी ११ रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार
३१४ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ३४६, लातूर एक हजार २०३,
परभणी एक हजार ३७, उस्मानाबाद ८७२, जालना ८१६,
नांदेड ७६९, तर हिंगोली जिल्ह्यात १४० नवे रुग्ण आढळून आले.
****
कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना,
कोविड-सुश्रुषा केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहकार आणि पणन मंत्री
बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या भांडवली खर्चास
मंजूरी देण्याचे अधिकार, जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले असून, १० लाख रुपयांच्या
वरील प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार, पणन संचालकांना देण्यात
आले आहेत.
****
ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथल्या एका खासगी रुग्णालयात काल पहाटे आग लागली. या
आगीनंतर अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांसह, इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात
हलवण्यात आल्यानंतर, अतिदक्षता विभागातल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला. गृहनिर्माण
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमींना
प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, या चार रुग्णांचा मृत्यू आगीत
होरपळून झाला नाही तर, दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर, हे रुग्ण दगावले असल्याचं,
स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं काल मुंबईत कोविड संसर्गानं
निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. तीन वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले
गायकवाड यांनी, राज्य सरकारमध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार,
उच्च आणि तंत्रशिक्षण, अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला. २००४ साली झालेल्या
लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांनी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव केला
होता. २०१७ ते २०२० या काळात, ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. शालेय शिक्षण मंत्री
वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मुख्यमंत्री
तसंच उपमुख्यमंत्र्यांसह, मंत्रिमंडळ सदस्यांनी गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिन साधेपणानं साजरा
करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत. जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी
आठ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त
पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरता योग्य ती व्यवस्था
करावी, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये, इतर
सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात
यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला प्राणवायू प्रकल्प,
काल कार्यान्वित करण्यात आला. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री राजेश
टोपे यांनी, या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रकल्पातून दररोज १२ जंबो सिलिंडर प्राणवायू
निर्मिती होणार असून, एका सिलिंडरमध्ये सात हजार लीटर प्राणवायू साठवण्याची क्षमता
असल्याची माहिती, टोपे यांनी दिली. या रुग्णालयातल्या ३० खाटांना या प्रकल्पातून प्राणवायू
पुरवला जाणार असून, टप्प्याटप्प्यानं प्रकल्पाची क्षमता वाढण्यात येणार असल्याचंही
ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात,
प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. परळीच्या औष्णिक विद्युत निर्मिती
या प्रकल्पामुळे, रुग्णालयाची प्राणवायूची ४० टक्के मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती,
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी दिली. ते म्हणाले –
परळीमधून जो एक प्रकल्प आलेला आहे ऑक्सिजन जनरेशनचा
तो कार्यान्वित झालेला आहे. आणि या प्रकल्पातून दिवसाला साधारणतः २८० ते नव्वद जम्बो
या ठिकाणी जनरेट होणार आहेत. आणि सुरवातीमधील आमचा जो लोड आहे, ऑक्सिजनची जी डिमांड
आहे, ती साधारण ६०० ते ६५० जम्बो आम्हाला २४ तासांमधे लागतात. पण त्यातील ४० टक्क साधारणतः
ऑक्सिजनची डिमांड यामधे पूर्ण व्हायला मदत होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी, पोलिस
अधीक्षक राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून, स्वतंत्र ४० खाटांचं कोविड सुश्रुषा केंद्र
कालपासून सुरु करण्यात आलं. कोरोना झालेल्या मात्र लक्षणं नसलेल्या रुग्णांवर या ठिकाणी
उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतलेल्या रक्तदान शिबिरात,
काल १०१ दात्यांनी रक्तदान केलं. परभणी शहरात काल रामकृष्णनगरात वाकोडकर मित्रमंडळाच्या
वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात, ७५ जणांनी रक्तदान केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी या गावानं, कोविड १९ लसीकरण
मोहिमेत, ४५ वर्षावरील पात्र १०० टक्के नागरीकांचं लसीकरण करून, जिल्ह्यात प्रथम येण्याचा
मान पटकावला आहे. या विषयी आधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
१०० टक्के उद्दिष्ट पूर्ण
केले आहे. त्यानंतर दिनांक १९ ते २३ एप्रिल दरम्यान लसीकरणाचे शिबीर आयोजित करून गावातील
४५ वर्षवरील ५७० पैकी ५७० व्यक्तिंचे लसीकरण करण्यात आले आहे. या गावास नांदेडचे जिल्हाधिकारी
डॉ.विपिन ईटनकर यांनी भेट देऊन संबंधित यंत्रणेतील लोकांचे आणि गावकऱ्यांचे अभिनंदन
केले आहे. राज्यातील अन्य गावांनी शेलगाव गौरी या गावाचा आदर्श घेऊन आपल्या गावचे कोरोना
लसीकरण १०० टक्के करावे या अपेक्षांसह - आनंद कल्याणकर, आकाशवाणी वार्ताहर, औरंगाबाद
****
शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख, माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी,
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयास, स्वनिधीतून पाच जम्बो ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर
उपलब्ध करून दिले आहेत. हे सिलेंडर उस्मानाबाद शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज, गंगापूर, वैजापूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या
कोविड शुश्रुषा केंद्रामध्ये, उपचार सुविधांमध्ये वाढ करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करुन गुन्हे
दाखल करावेत, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. ग्रामीण भागातला कोरोना संसर्ग
रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या दृष्टीनं, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काल ग्रामीण
भागातल्या तपासणी नाक्यांना भेट दिली. नागरिकांनी जिल्हा सीमा बंदीच्या नियमांचं कटाक्षानं
पालन करत, स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या चोंडी इथले सामाजिक तथा माहिती अधिकार
कार्यकर्ते संभाजी ढवळे यांनी काल जाळून घेऊन आत्महत्या केली. बंधाऱ्याच्या कामासह हरीण, मोरांच्या हत्येची चौकशी करावी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी
दिला होता. अनेकदा मागणी करुनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई
केली नसल्यानं, त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी
सदस्य देविदास गीते यांच्यासह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
झाला.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पाचोड, सानपवाडी,
कोडी बोळखा या भागात गारपीट झाली.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जडगाव
इथं वीड पडून एक म्हैस दगावली.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दुनगाव आणि टाका इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे काढणी केलेली हळद आणि आंब्याच्या पिकाचं नुकसान
झालं.
दरम्यान, मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या
वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment