Monday, 26 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविड लसीकरण मोहिमेला १०० दिवस पूर्ण; १४ कोटी १९ लाखावर नागरिकांचं लसीकरण

** सर्व पात्र व्यक्तींचं कोविड लसीकरण मोफत - भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट

** औरंगाबाद इथं आज २७ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार ८६ रुग्ण 

आणि

** परभणी जिल्ह्या राणीसावरगाव इथला श्री रेणुका देवीचा उद्यापासून सुरु होणारा यात्रा उत्सव रद्द

****

देशातल्या कोविड लसीकरण मोहिमेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसात १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ नागरिकांना कोविड लसींच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत. कोविड लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. यामध्ये १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी परवा २८ एप्रिल पासून नोंदणी सुरु होणार आहे.

****

सर्व पात्र व्यक्तींना केंद्र सरकारकडून कोविड लस मोफत दिली जाणार असून, राज्य सरकारवर लसीकरणाचा काहीही भार नसल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत अंधेरी इथं कोविड केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. येत्या एक मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचं धोरण सुनिश्चित करण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले..

मन की बात मध्ये माननीय प्रंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे. प्रत्येक एलिजिबल व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही आहे. आपली व्हॅक्सीनेशन स्टॅटर्जी जी आहे, एक तारखेपासून ती आपल्याला ठरवली पाहिजे. कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इनव्हॉल्व होतोय आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे, म्हणून आपली स्टॅटर्जी त्यासंदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे.

एखाद्या राज्य सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल, किंवा सामाजिक संस्था संघटनांना आपल्या खर्चाने लसीकरण करायचं असेल, तर त्यांच्यासाठी बाजारात लस उपलब्ध असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

****

राज्यभर ठिकठिकाणी कोविड ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग सुरू करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सौम्य लक्षणं असलेले रुग्णही भीतीपोटी मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी बाह्य रुग्ण विभागातून डॉक्टर उपलब्ध असल्याचा विश्वास रुग्णांमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता, कुळकर्णी यांनी व्यक्त केली.

****

सध्या कोविड प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. राज्य सरकारकडून जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. मात्र राज्य सरकारला अधिकार नसताना, रेमडेसिवीर औषध आयात करण्याची घोषणा पवार यांनी कोणत्या अधिकाराने केली, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने सर्वांना कोविड लस मोफतच द्यायला हवी, आपल्याच देशात उत्पादित होणारी कोविड लस आपल्यासाठीच महाग कशी काय, असा प्रश्नही आंबेडकर यांनी विचारला.

****

केंद्र तसंच राज्य सरकारने सर्व औषधं करमुक्त' करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा वैद्यकीय उपचारांचा खर्च सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर औषधं करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे.

****

विडी विक्रीवर बंदी घालावी अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत ४ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विडी उद्योग टिकावा, आणि त्यावर अवलंबून असलेल्या राज्यातल्या साडेचार लाख विडी कामगारांचा रोजगार वाचवण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारने  न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे, सिटू या कामगारांच्या संघटनेनं केली आहे. सिटू संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीनं या प्रकरणी हस्तक्षेप नोंदवत, ४ मे रोजी सुनावणीला न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ पूर्णांक ५२ शतांश टक्के असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या जादा रकमेच्या देयकांची तातडीने तपासणी करुन त्यावर कारवाई करण्याची सूचना सर्व लोकप्रतिनिधींनी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या वीस, जालना तसंच अहमदनगर इथल्या प्रत्येकी तीन, आणि नाशिक इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता दोन हजार ३९३ झाली आहे. घाटीत आज १०० नवे रुग्ण दाखल झाले तर २३ जणांना सुटी देण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८६ रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक २४६ रुग्ण बीड तालुक्यात आढळले, त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात २०३, केज १०९, परळी १०६, गेवराई ९९, आष्टी ९८, धारूर ६२, माजलगाव ४९, वडवणी ५२, पाटोदा ४१, तर शिरूर तालुक्यात आज २१ रुग्ण आढळले

****

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव इथला श्री रेणुका देवीचा उद्यापासून सुरु होणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं, मंदीर विश्वस्थांकडून कळवण्यात आलं आहे.

 

दरम्यान, धुळे शहराचं ग्रामदैवत एकवीरा देवीची यात्रा यंदाही कोविड प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदीर प्रवेशही बंद असतांना, आज चैत्र चतुर्दशीनिमित्त भाविकांनी बालकांचं जाकाढणं आणि नैवद्य आरतीसाठी एकविरा देवी मंदिर पसिरात मोठ्या संख्येनं हजेरी लावल्याचं दिसून आलं.

****

गेल्या १३ महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी शिकवणीचालकांना सरकारनं आर्थिक मदत करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाच्या कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. यासंबंधीचं एक निवदेन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष पांडुरंग मांडकीकर यांनी सांगितलं. खाजगी शिकवणी व्यावसायिकांना आपत्ती व्यवस्थापन कायदा - २००५ आपत्ती प्रतिसाद निधी मदत आणि पुनर्वसन अंतर्गत आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे. १० मे २०२१ पासून एका बाकावर एक विद्यार्थी बसवून खाजगी शिकवणी सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. यासह अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

****

कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या बारा बलुतेदारांना राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या परभणी शाखेने एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या निवेदनातून बारा बलुतेदारांसाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य करावं, अशी मागणी ओबीसी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे

****

परभणी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेशी निगडित कार्यालयं तसंच कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक कामांशी संबंधित कार्यालयं वगळता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये उद्या २७ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले

****

लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहर बससेवेचा लगतच्या १५ किलोमीटर परिघा विस्तार करण्यास, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परवानगी दिली आहे. लगतच्या गावातील विद्यार्थी, महिला, आणि ज्येष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी, ही शहर बस सेवा बाभळगाव, सोनवती, धनेगाव, गंगापूर, हरंगुळ, नांदगांव - साई, कासारगाव या गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

//***********//

 

No comments: