Tuesday, 27 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

हनुमान जयंती आज साजरी होत आहे. ठिकठिकाणच्या हनुमान मंदीरांमध्ये सकाळी सहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदीरांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथलं भद्रा मारुती मंदीर आज भाविकांसाठी बंद राहणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असं मंदीर व्यवस्थापनानं कळवलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

जम्मू काश्मीरमधल्या बारामूला जिल्ह्यात पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. पोलिसांना या दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

****

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला प्राणवायु, रेमडेसिवीर इंजेक्शन, अँटिजेन किट आदींसह आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यासाठी काय व्यवस्था केली, याबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याच्या आरोग्य सचिवांना दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बीयू देबादवार यांच्या खंडपीठानं, कोविडच्या दुसर्या लाटेत रुग्णांची वाढलेली संख्या आणि रुग्णांच्या उपाचारातील विविध त्रुटींसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताची स्वतः दखल घेतली आहे.

****

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना जगभरातल्या खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत, कोरोना प्रतिबंधात्मक लसींची किंमत भारतात अधिक असल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने, सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

****

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणारे उपचार, वैद्यकीय सुविधा, कर्मचारी व्यवस्थापन, तसंच अन्य सर्व बाबींवर नियंत्रणाकरता ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

****

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी सहा लाख ३१ हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करून, कोविड सेंटरसाठी मदत निधी उभारला आहे. त्यांनी हा निधी तालुक्याचे आमदार नितीन पवार यांना सुपूर्द केला.

****

No comments: