Wednesday, 28 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

१८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. कोविन डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर किंवा कोविन ॲप वर ही नोंदणी दुपारी चार वाजेपासून सुरु होणार आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं आज मुंबईत कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. तीन वेळा धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले गायकवाड यांनी, राज्य सरकारमध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च आणि तंत्रशिक्षण अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांनी, तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. २०१७ ते २०२० या काळात, ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत.

****

ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथल्या एका खासगी रुग्णालयात आज पहाटे आग लागली. या आगीनंतर अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांना, तसंच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर, अतिदक्षता विभागातल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख, तर तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही आग मीटर बॉक्स मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, या चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून, रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर, झाला असल्याचं, प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. या रुग्णालयाला यापूर्वी देखील ठाणे अग्निशमन विभागाच्या वतीनं, फायर ऑडिटची नोटीस देण्यात आली होती, मात्र तरीही याकडे रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं, निदर्शनास आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असं आभासी चित्र तयार करणं योग्य होणार नाही, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितलं आहे. कोरोनाचं भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच, आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही, त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक मृत्यू संख्या, यातूनच कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

व्हॉटसऍप ग्रुपवर जर एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट केली, तर त्यासाठी ग्रुप ऍडमिन जबाबदार नसल्याचा निर्वाळा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. गोंदिया इथल्या एका व्हॉटसऍप ग्रुपवरील एका सदस्याने, त्याच ग्रुपमधल्या महिला सदस्याच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याप्रकरणी पिडीत महिलेने ग्रुप ॲडमिन विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली होती, याला ॲडमिनने न्यायालयात आव्हान दिलं होतं. अन्य सदस्याने टाकलेली पोस्ट ॲडमिनच्या अपरोक्ष टाकली असेल, तर त्या पोस्टसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असं न्ययालयानं म्हटलं आहे.  

****

हिंगोली शहरातल्या नगरपालिकेच्या कल्याण मंडप इथं लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असला, तरी या ठिकाणी मोठी गर्दी होत असून, सामाजिक अंतरही पाळलं जात नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत, झारेवाडा-गोरगट्टा जंगलात झालेल्या चकमकीत, दोन नक्षलवादी ठार झाले. आज सकाळी सी-६० पथकाचे जवान गोरगट्टा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना, दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्यूत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले.

****

अतिरिक्त देयक आकारल्याप्रकरणी यवतमाळ इथल्या सहा कोविड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक कोविड रुग्णालयं मनमानी पद्धतीनं देयक आकारत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानं, जिल्हा प्रशासनानं या रुग्णालयांमध्ये ऑडीटर नियुक्त केले आहेत. या ऑडीटरनी देयकांच्या तपासण्या करून, जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला, त्यानुसार अतिरिक्त देयक आकारलेल्या सहा रुग्णालयांना नोटीस बजावत, ४८ तासात उत्तर देण्यास सांगितलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध कारागृहात कोरोना विषाणू बाधित झालेल्या कैद्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शहरातल्या सैनिक लॉन इथं ८० कैद्यांसाठी कोविड केंद्र उभारण्यात आलं आहे. आजपासून हे केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे.

****

परभणी महानगरपालिकेनं काल शहरात विनामास्क फिरणाऱ्या १८ जणांविरोधात कारवाई केली. या नागरिकांकडून एकूण तीन हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

No comments: