Sunday, 25 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 April 2021 Time 7.10AM to 7.25AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** राज्याला चार लाख ३५ हजार रेमडेसिविरच्या मात्रांचं केंद्र सरकारकडून वाटप

** देशात वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचं उत्पादन आणि उपलब्धता वाढवण्याचा केंद्रीय उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

** भारत बायोटेकच्या कोवैक्सिन लसीच्या दरांची घोषणा; राज्य सरकारांसाठी ६०० रुपये तर खाजगी रुग्णालकरता १२०० रुपये प्रतिमात्रा दर निश्चित

** स खरेदीसाठी राज्य सरकार जागतिक निविदा काढणार

** राज्यात ६७ हजार १६० कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १५९ जणांचा मृत्यू तर ८ हजार सहाशे एकोणपन्नास बाधित

** माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाचे छापे; भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

णि

** मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर

****

विषाणूजन्य आजारावर उपचार करण्यासाठी वापरायच्या रेमडेसिविर या औषधाच्या राज्यांच्या कोट्यात केंद्र सरकारनं वाढ केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक चार लाख ३५ हजार मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गुजरातला एक लाख ६५ हजार, उत्तरप्रदेशला एक लाख ६१ हजार आणि कर्नाटकला एक लाख २२ हजार मात्रा उपलब्ध होणार आहेत. दिल्लीला ७२ हजार, छत्तीसगडला ७५ हजार आणि मध्य प्रदेशला ९५ हजार रेमडेसिविरच्या मात्रा मिळणार आहेत. येत्या ३० एप्रिलपर्यंतचं हे वाटप आहे.

****

रेमडीसीविर इंजेक्शनच्या राज्यातील तुटवड्यामुळे ते पुरवण्याबाबत राज्य शासनानं केलेल्या आवाहनास काही देशांनी संमती दर्शवली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रकाशित जाहिरातीला सिंगापूर, बांगलादेश आणि इजिप्त या देशांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, रेमडीसीविर परदेशातून आयात करण्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीस केंद्राची लवकरच परवानगीही मिळणार असल्याचं राज्य शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे. रेमडीसीविरचा तुटवडा दूर करून कोरोनाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

देशात वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूचं उत्पादन आणि उपलब्धता वाढवण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ऑक्सिजन आणि संबंधीत उपकरणांच्या आयातीवरील मुभू सीमा शुल्क आणि आरोग्य उपकरात पूर्णत: सूट देण्याचा तसंच त्यांची तातडीनं आयात करण्याचा  निर्णय सरकारनं घेतला आहे. यासह केंद्रानं येत्या तीन महिन्यांपर्यंत कोविड लसीवरील  मुलभूत आयात शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेतला आहे. सर्व मंत्रालयांनी प्राणवायूसह आरोग्य सुविधांसाठी परस्पर समन्वय राखण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

भारत बायोटेक या औषध कंपनीनं राज्य सरकारं आणि खाजगी रुग्णालयांसाठी कोवैक्सिन लसीच्या किमतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारांसाठी याची किंमत ६०० रुपये प्रति मात्रा, खाजगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये तर परदेशात निर्यातीसाठी या लसीची मात्रा १५ ते २० डॉलर एवढी राहील असं कंपनीनं सांगितलं.

****

येत्या १ मे पासून सुरू होणाऱ्या कोविड - १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेशांनी अतिरिक्त खासगी लसीकरण केंद्र स्थापन करावीत, असं केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड विरुध्दच्या लढ्यासाठीच्या उच्चाधिकार गटाचे अध्यक्ष डॉक्टर आर. एस. शर्मा यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत लसीकरणासंदर्भात अनेक सूचना करण्यात आल्या. लसीकरणासाठी खाजगी, औद्योगिक आणि इतर क्षेत्राकडून चालवल्या जात असलेल्या रुग्णालयांना सोबत जोडणं, नोंदणी अर्ज, अर्जांवरची प्रक्रिया आणि प्रलंबित नोंदणीसाठी नियुक्त केलेल्या यंत्रणांसोबत समन्वय राखणं या बाबत केंद्र सरकारनं निर्देश जारी केले.

****

राज्याला अन्य विविध कंपन्यांकडून लस घेण्याचाही पर्याय खुला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुणे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. लसींच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकार लवकरच जागतिक निविदा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मोफत लसीबाबत येत्या १ मे रोजी निर्णय होणार असून पुण्याचं सिरम इन्स्टिट्यूट हे क्षमतेएवढी लस राज्याला देणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

****

राज्यात काल ६७ हजार १६० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली आहे. काल ६७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६३ हजार ९२८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. काल ६३ हजार ८१८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ९४ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ८ हजार सहाशे एकोणपन्नास कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४४, बीड चार, नांदेड २६, लातूर २७, परभणी २२, उस्मानाबाद २०, जालना १२, तर हिंगोली जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १ हजार ४९७ रुग्ण आढळले. लातूर १ हजार ४००, नांदेड ८५०, बीड एक हजार १९५, परभणी ८०४, जालना ९८४, उस्मानाबाद ८१०, तर हिंगोली जिल्ह्यात ३२३ नवे रुग्ण आढळून आले.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं विविध करांचा भरणा करण्यासाठी दोन महिने मुदतवाढ दिली आहे. विवाद से विश्वास तक योजनेत तसंच आयकरांतर्गत करनिर्धारणाची मुदतही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोविड पार्श्वभूमीवर करदाते, विशेषज्ञ तसंच संबंधित घटकांकडून केली जाणारी मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ दिली आहे.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर काल केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं छापे घातले. देशमुख यांच्या नागपूर, काटोल तसंच मुंबईतल्या घरी सीबीआयनं छापे घालून पाहणी केली. देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम सात आणि भारतीय दंड विधानाच्या कलम १२० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी याचिका माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिल. गेल्या पाच एप्रिलला अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांच्या या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य केल्याचं, देशमुख यांनी काल नागपूर इथं बातमीदारांना सांगितलं.

****

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार काल जाहीर झाले. वैद्यकीय क्षेत्रासाठीचे पुरस्कार डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना जाहीर झाला. अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा आणि नाना पाटेकर यांना, संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ कवी - गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडीकर, तसंच ज्येष्ठ गायिका - संगीतकार उषा मंगेशकर यांना, तर पत्रकारितेसाठीचा पुरस्कार सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना जाहीर झाला आहे.

****

परभणी इथं कोविड लसीकरण काल बंद होतं. शासनस्तरावरून लसीचा साठा उपलब्ध न झाल्यानं लसीकरण थांबवावं लागलं. आजही महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

लातूर इथंही कोविड लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानं काल लसीकरण बंद होतं. आजही लसीकरण बंद राहणार आहे. असं लातूर महापालिकतर्फे सांगण्यात आलं आहे.

औरंगाबाद इथंही काल फक्त आठ केंद्रांवर लसीकरण सुरू होतं. त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. तीन हजार २५२ नागरिकांना काल या केंद्रांवर लस देण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यात एक मेपर्यंत संपूर्ण टाळेबंदी लावण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल याबाबत सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार जिल्हाभरात किराणा दुकानं, भाजीपाला विक्री, फळ विक्री अशी सर्वच दुकानं आज दुपारी एक वाजेपासून ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. या काळात घरपोच सेवा देण्यासही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातही येत्या ३० एप्रिलपर्यंत किराणा, भाजीपाला, भाजीबाजार, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई, आणि सर्व प्रकारचे खाद्य दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोविड प्रादुर्भावाबाबत काल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. ग्रामीण भागात कोविड सुश्रुषा केंद्र उभारण गरजेचं असून, दहा हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या, गावांनी किमान २० खाटांच्या कोविड सुश्रुषा केंद्राचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा असं आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केलं.

दरम्यान, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात ३१५ रुग्णखाटा वाढवण्यास मंजूरी दिली, त्यासाठी दोन रुग्णालयांना समर्पित कोविड केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. भूम, तुळजापूर, उमरगा, कळंब तसंच उस्मानाबाद इथं खासगी रुग्णालयं, मंगल कार्यालय, वसतीगृहं आदी ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

लातूर जिल्ह्यातील रुग्णालयं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सध्याच्या कोविड प्रादुर्भावावर मात करण्यासाठी एकमेकांसोबत समन्वय राखत काम करण्याची आवश्यकता असल्याचं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नमूद केलं आहे. ते काल उदगीर इथं पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीरसह जळकोट तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाच्या सद्य - स्थितीचा आढावा - उपाय योजना संदर्भातल्या बैठकीत बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यासमोर दोन चारचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं तीन जण ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. काल रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये गल्लेबोरगावच्या तिघांचा समावेश असून दोन जखमींपैकी एक औरंगाबादचा असून अन्य एक जण कसाबखेडा इथला रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

नगरिकांना आरोग्याच्या तक्रारींवर घरबसल्या मोफत सल्ला घेण्यासाठी केंद्र शासनानं संजीवनी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या महावितरणच्या वीजग्राहकांना त्यांच्या वीज वापराची नोंद अर्थात मीटर रीडिंग महावितरणला स्वत:हून पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेले निर्बंध आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता महावितरणला मीटर रीडिंग घेणं अवघड आहे. त्यामुळे महावितरण मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे मीटर रीडिंग पाठवावी असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या क्रीडा-भारती संस्थेद्वारे ऑनलाईन क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. दोरी उडी, बास्केटबॉल ड्रिब्लिंग, कुस्तीच्या सपाट्या मारणे, जिम्नॅस्टिक, महिलांसाठी सीट-अप, लाठी-काठी, कराटे-काटा, गदा चक्र, सूर्यनमस्कार, बुद्धिबळ, ल्युडो आदी प्रकारात या ऑनलाईन क्रीडा स्पर्धा होणार आहेत. सहभागासाठी गुगल फॉर्म द्वारे नोंदणी झाल्यावर खेळानुसार सहभागी खेळाडूंना व्हाट्सॲपद्वारे खेळाचे नियम - अटी कळवल्या जाणार आहेत. २७ तारखेला हनुमान जयंतीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धांमध्ये हनुमान चालिसा पठणाचीही स्पर्धा होणार आहे.

****

हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असं आवाहन गृह विभागानं केलं आहे. यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, मिरवणुका वगैरे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचं सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये, असं गृहविभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथलं भद्रा मारुती मंदीर हनुमान जयंतीला भाविकांसाठी बंद राहणार आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असं मंदीर व्यवस्थापनानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद नजिकच्या एकूण सहा प्राणवायू निर्मिती प्रकल्पांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल भेटी दिल्या. यात, वाळूज औद्योगिक वसाहत, गेवराई, चितेगाव आणि शेंद्रा या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व प्राणवायू प्रकल्पांमधून एकूण दहा मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. यात वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून या प्रकल्पांना मदत आणि सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली.

//*************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments: