आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
१८ ते ४४ या
वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याच्या निर्णयावर, राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
ही माहिती दिली.
दरम्यान, सध्या
लसीच्या मात्रा उपलब्ध नसल्यानं, परवा एक मे पासून नियोजित १८ ते ४४ वयोगाटातल्या लसीकरणाला
प्रारंभ होणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. कोविन ॲपवर नोंदणी,
तारीख आणि वेळ निश्चित करूनच लस घेता येईल, थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार नाही,
असंही त्यांनी सांगितलं.
****
देशात अठरा वर्षांवरील
सर्वांचं कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी कालपासून नोंदणी सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर
८० लाखांहून अधिक लोकांनी काल अवघ्या तीन तासात नोंदणी केली आहे. या दरम्यान कोणतीही
तांत्रिक अडचण आली नाही असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
पश्चिम बंगाल
विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात
चार जिल्ह्यातल्या ३५ विधानसभा मतदरासंघांचा समावेश आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यातली
विधानसभा निवडणूक तसंच विविध राज्यातल्या पोटनिवडणुकांचा निकाल दोन मे रोजी लागणार
आहे.
****
नांदेड इथल्या
भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक मधुकर कुलकर्णी यांचं काल
अल्पशा आजारामुळे निधन झालं, ते ६९ वर्षांचे होते. सहकार भारती चे कार्यवाह आणि राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणूनही ते कार्यरत होते.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
सेनगाव तालुक्यात कवठा इथल्या कोविड केंद्रात, काल एका ६० वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू
झाला. त्यानंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर,
नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शेलैश फडसे यांनी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
****
परभणी इथल्या
जिल्हा नियोजन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत. त्यात विधीमंडळासह अन्य अशा एकूण
नऊ सदस्यांचा समावेश आहे.
****
औरंगाबादसह हिंगोली
आणि जालना जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोड, सानपवाडी,
कोडी बोळखा या भागात आणि जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दुनगाव आणि टाका इथं
वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment