Sunday, 25 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 April 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीवर मात करणं याला आज आपलं सर्वात प्रथम प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी आज त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये खूप मोठी आशा निर्माण झाली होती, आत्मविश्वासानं देश भारलेला होता, मात्र  या  दुसऱ्या लाटेनं पुन्हा देशाला हादरवून टाकल्याचं ते म्हणाले. पण असं असलं तरी आरोग्य क्षेत्रातले लोक, सामाजिक संस्था हे एकजुटीनं या संकटाचा धैर्यानं सामना करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी आजच्या भागात देशातल्या डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद साधला. मुंबईच्या भारतीय डॉक्टर्स महाविद्यालयाचे  अधिष्ठाता डॉक्टर शशांक जोशी यांचे विविध अनुभव जाणून घेतले. याशिवाय श्रीनगरचे डॉक्टर नाविद शाह, रायपूरच्या परिचारिका भावना ध्रु, बंगळुरूच्या वरिष्ठ परिचारिका सुरेखा तसंच रुग्ण्वाहिका चालक प्रेम वर्मा यांच्याशी चर्चारत पंतप्रधानांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली. कोरोना विषाणू संसर्गावर मात केलेल्या गुरुग्राममधील प्रिती चतुर्वेदी यांनी त्यांचे अनुभव विशद केले. या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात आपली, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ञांबरोबर दिर्घ चर्चा झाली आहे, औषध उत्पादन क्षेत्र, लस उत्पादनाशी संबंधित लोक, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित तसंच वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार या सर्वांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी, पल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्य सरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले.

****

देशभरात काल दिवसभरात कोरोना विषाणू बाधित तीन लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले, तर २ हजार ७६७ जण या संसर्गाने मरण पावले. दरम्यान, देशात आतापर्यंत १४ कोटी ९ लाख १६ हजार ४१७ नागरिकांचं लसीकरण झालं आल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या बेलोरा इथल्या कोविड सुश्रुषा केंद्रातून कोरोना विषाणू बाधित २० रुग्णांनी पलायन केल्याचं उघडकीस आलं आहे. केंद्रांवर असुविधा आहे, अशी तक्रार या रुग्णांची होती, यामध्ये १९ रुग्ण आमोडीचे तर एक रुग्ण वागदा इथला आहे. काही रुग्ण गुन्हा दाखल होण्याच्या भितीनं परत आले मात्र, आमडीचे रुग्ण न परतल्यानं वैद्यकीय अधिकारी संजय पुराम यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० रुग्णांविरुद्ध पळून गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र साधेपणाने साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्म, जगा आणि जगू द्या या आदर्शांमधून लोकांना जगण्याचा मार्ग दाखवला आहे, सध्याच्या कोविडच्या काळात महावीरांच्या संदेशांचं पालन करत एकजुटीनं कोरोना महामारीवर मात करु या असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

सांगलीत कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यामध्ये  मिरज शासकीय कोव्हिड रुग्णालयातला अधिपरीचारक असून अन्य एक जण खासगी प्रयोगशाळेतला तंत्रज्ञ आहे. या दोघांनी ३० हजार रुपयाला एक तसंच ६० हजार रुपयांना दोन इंजेक्शन विकल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देणारे, जलसाकार, लोककवी हरेंद्र जाधव यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर, यासारखी जवळपास दहा हजार लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली. गेल्या काही वर्षांपासून ते पक्षाघाताने आजारी होते. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यात ते ३३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते. फुले, शाहू, आंबेडकरवादी, विचारांची मशाल सदैव प्रज्वलित ठेवत, चौफेर लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ निस्वार्थीपणे त्यांनी खेड्यापाड्यात पोहोचविली. १९४७ पासून अनेक स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली.  तमाशा, जलसा, कव्वाली, जयंतीचे कार्यक्रम, तबकड्या, कॅसेट, सीडी, व्ही-सीडी ऑडिओ-सीडी, आकाशवाणी, दूरदर्शन, आणि अलीकडच्या काळात नुकत्याच एका ई बुक साठीही त्यांनी काही गझल लिहिल्या.

//**************//

No comments: