आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
ठाणे जिल्ह्यातल्या
मुंब्रा इथल्या प्राईम क्रिटिकेअर या रुग्णालयाला आज पहाटे आग लागली. या आगीनंतर अतिदक्षता
विभागात दाखल असलेल्या सहा रुग्णांना, तसंच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात
आल्यानंतर, चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र या चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला
नसून, रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचं प्रशासनाच्या
वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
आसामसह पूर्वेकडील
काही राज्यांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर
पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६ पूर्णांक
४ रिश्टर स्केल इतकी होती. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी नागरिकांना सावध
राहण्याचं आवाहन केलं आहे.
****
१८ वर्षांवरील
नागरिकांना लसीकरण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. कोविन डॉट जीओव्ही
डॉट इन या पोर्टलवर किंवा कोविन ॲप वर ही नोंदणी दुपारी चार वाजेपासून सुरु होणार आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांनी स्पष्ट केलं आहे.
****
देशातल्या वाढत्या
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी गुरुवार २९ एप्रिल पर्यंत त्यांच्याकडील
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अहवाल सदार करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
दिले आहेत. न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी
करताना हे निर्देश दिले आहेत.
****
मराठवाड्याच्या
सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट
होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात
घेऊन सर्व जिल्ह्यातील शेतकरी तसंच नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून
करण्यात आलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
विविध कारागृहात कोरोना विषाणू बाधित झालेल्या कैद्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी
शहरातल्या सैनिक लॉन इथं ८० कैद्यांसाठी कोविड केंद्र उभारण्यात आलं आहे. आजपासून हे
केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथं
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ११७ नागरिकांची काल अँटीजन चाचणी करण्यात आली, यामध्ये
सात जणांना कोविड संसर्ग झाल्याचं आढळून आलं.
****
No comments:
Post a Comment