Friday, 30 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड १९ प्रतिबंधासाठी केंद्र सरकारनं घालून दिलेले नियम ३१ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. राज्य सरकारांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत परिस्थितीचा आढवा घेऊन विविध उपाययोजना लागू कराव्या, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

देशातल्या कोविड १९ च्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक होत आहे. आरोग्य सचिवांनी काल महाराष्ट्रासह सर्वाधिक प्रभावित नऊ राज्यांचा कोविड स्थितीचा अहवाल गृह सचिवांना सादर केला.

****

राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश काल राज्य सरकारनं जारी केले. कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीने तोडण्यासाठी सद्य निर्बंध आणि उपाययोजनांची मुदत दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी वाजेपासून ते १५ मे २०२१ रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

****

मुंबईत कोविड लसीचा तुटवडा असल्यामुळे आजपासून तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे, मात्र लसीचा योग्य पुरवठा होत नसल्याचं लसीकरण मोहीम थांबली असल्याचं, पालिका प्रशासनानं सांगितलं.

****

भारत बायोटेक आणि सिरम या लस उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांसाठी लसीच्या एका मात्रेची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीच्या किमतीत २०० रुपये कपात करुन, ती आता ४०० रुपये निश्चित केली आहे. तर सीरम कंपनीनं कोव्हिशिल्ड लसीच्या एका मात्रेची किंमत शंभर रुपये कमी करुन, ३०० रुपये निर्धारित केली आहे.

****

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातला आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला काल धारणी न्यायालयात हजर करण्यात आलं असून, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

****

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वस्तुसंग्रहालयं स्थापन करण्यासाठीच्या, सल्लागार समितीच्या सदस्यपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, पर्यटन प्रशासन विभागाचे संचालक, डॉ.राजेश रगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

No comments: