Monday, 26 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात काल दोन लाख १९ हजार २७२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाले. देशभरात आतापर्यंत एक कोटी ४३ लाख चार हजार ३८२ रुग्ण बरे झाले असून, सध्या २८ लाख १३ हजार ६५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल नव्या तीन लाख ५२ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ८१२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी ७३ लाख १३ हजार १६३ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ९५ हजार १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीमही देशात वेगानं सुरु आहे. देशात लसींच्या आता पर्यंत १४ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल देशात लसीच्या २५ लाख ३६ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या एक मे पासून १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस दिली जाणार आहे; या टप्प्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

****

नाशिक शहरातल्या महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी ऑक्सिजन टाकीची गळती होऊन २४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या ३१ मार्चला नव्याने बसवण्यात आलेल्या या टाकीची गळती सुरू झाल्याने महापालिकेनं बुधवारीच तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली असली, तरी आता या ठिकाणी या टाकीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आज पर्यायी व्यवस्था म्हणून एक किलो लिटरच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये दहा कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नऊ रुग्णालयांमधल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लाख रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

****

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या रूग्णालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बेठकीत ते बोलत होते. यापुढे अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे

****

यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या बेलोरा इथल्या कोविड सुश्रुषा केंद्रातून, कोरोना विषाणू बाधित २० रुग्णांनी पलायन केल्याचं उघडकीस आलं आहे. केंद्रांवर असुविधा आहे, अशी तक्रार या रुग्णांची होती, यामध्ये १९ रुग्ण आमोडीचे तर एक रुग्ण वागदा इथला आहे. काही रुग्ण गुन्हा दाखल होण्याच्या भीतीनं परत आले मात्र, आमोडी इथले रुग्ण परत आले नाहीत, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी संजय पुराम यांनी शासकीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, गुन्हा दाखल केला आहे.

****

हिंगोली शहरातल्या दिवेश मेडीकल या औषधी दुकानात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणि विक्रीचा ताळमेळ आढळून आला नसल्यानं, या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द शिफारस, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी दुकानावर छापा टाकून ही कारवाई केली.

****

गॅस वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय बंद ठेवत लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी बीड जिल्ह्यातल्या कडा इथल्या फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर, हे कोविड बाधित रूग्णांना दिले आहेत. आष्टी तालुक्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत असून, अत्यावस्थ रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, अशावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी, खाजगी व्यावसायिकांना ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत कडा इथल्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवत तालुका प्रशासनास २५ पेक्षा जास्त ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर दिले आहेत.

****

नवी मुंबईतल्या तुर्भे औद्योगिक क्षेत्रात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अमोनिया वायूची गळती झाली. तुर्भे इंदिरानगर असणाऱ्या अमूल कंपनी च्या प्लांट मध्ये वायू गळती झाली होती, मात्र काही वेळातच ही गळती नियंत्रणात आणण्यात आली. वायू गळतीमुळे परिसरातल्या काही नागरिकांना श्वसनाचा त्रास होवू लागला होता. त्यांना पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात मेडपल्ली-तुमीरकसा रस्त्यावर असलेली काही अज्ञात वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. नक्षल्यांनी घटनास्थळी बॅनर बांधून पत्रकेही टाकली आहेत. शासनाने ‘समाधान’ योजना बंद करावी, अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

****

ग्वाटेमाला इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व संघानं मेक्सिकोच्या संघाला हरवत सुवर्ण पदक पटकावलं. तर अतनु दास आणि अंकिता भक्त यांच्या जोडीनं मिश्र रिकर्व प्रकारात कांस्य पदक जिंकलं.

****

No comments: