Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
विविध
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या, एक कोटी सहा
लाख मात्रा उपलब्ध असून, पुढच्या तीन दिवसात २० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या
जातील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्राला आतापर्यंत, एक कोटी
६३ लाखाहून अधिक मात्रा दिल्या असल्याचं, मंत्रालयानं, राज्यातल्या लसीच्या कमतरतेविषयी
बोलताना स्पष्ट केलं. यापैकी एक कोटी ५६ लाख मात्रा वापरल्या गेल्या असून, अजूनही सात
लाख ४९ हजार ९६० मात्रा शिल्लक असल्याचं, मंत्रालयानं नमूद केलं आहे.
****
देशात
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, आवश्यक वैद्यकीय उपकरणांची आयात करण्याची
प्रक्रिया, सरकारनं पूर्ण केली आहे. नेब्यूलायझर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, द्रवरुप ऑक्सिजन,
ऑक्सिजन प्लांट, व्हेंटिलेटर सह ऑक्सिजन सिलिंडर, यासारख्या उपकरणांची आयात करण्यास
सरकारनं परवानगी दिली आहे.
****
देशात
काल नव्या तीन लाख ७९ हजार २५७ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
तीन हजार ६४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या
एक कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत दोन लाख चार हजार ८३२
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दोन लाख ६९ हजार ५०७ नागरीक बरे झाले, देशात आतापर्यंत,
एक कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ३० लाख ८४
हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
दरम्यान,
देशात आतापर्यंत १५ कोटी २० हजार ६४८ नागरिकांना कोविड लस देण्यात आल्याचं, केंद्रीय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं.
****
भविष्य
निर्वाह निधी आणि बिगर सरकारी भविष्य निधीवर सात पूर्णांक एक टक्का व्याजदरात सरकारनं
कोणताही बदल केलेला नाही. हा व्याजदर एप्रिल ते जून या तिमाहीत कायम राहणार असल्याचं
आर्थिक कार्य विभागानं सांगितलं.
****
चित्रमहर्षी
दादासाहेब फाळके यांच्या १५१ जयंतीनिमित्तानं, चित्रपट प्रभागानं दोन दिवसांचा माहितीपट
आणि ऍनिमेनश पटांचा महोत्साव, ऑनलाईन आयोजित केला आहे. फाळके यांची उद्या ३० एप्रिल
रोजी जयंती आहे. फाळके यांच्यावरील पाच चित्रपट यात दाखवण्यात येतील. त्यामध्ये ड्रीम
टेक्स विंग्ज, फाळके चिल्ड्रेन, द पी प्लांट लिगॅसी, ट्रेसिंग फाळके आणि रंगभूमी, या
चित्रपटांचा समावेश आहे. फिल्म्स डिवीजन डॉट ओ आर जी आणि प्रभागाच्या अधिकृत युट्युब
चॅनलवर, हे चित्रपट मोफत पाहता येतील.
****
रिपब्लिकन
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या
एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून, आपल्या एक महिन्याच्या
वेतनातून राज्यातल्या आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. राज्यात अजून टाळेबंदी
वाढण्याची शक्यता असून, या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना
आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना ही मदत करत असल्याचं
आठवले यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
कोविड-19 च्या खर्चासाठी आपलं वेतन देण्यात यावं, यांसंबधी पत्र मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना लिहिलं आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून हे वेतन देता यावं,
अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी देखील या
कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकार्य करणं, ही काळाची गरज असल्याचं नांदगावकर
यांनी म्हटलं आहे.
****
एका
राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थानांतर केल्यानंतर वाहनांची नोंदणी पुन्हा करणं अधिक
सोयीचं व्हावं, म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयानं मसुदा नियमांची एक अधिसूचना जारी केली
आहे. सरकारनं वाहनांच्या नोंदणीसंदर्भात नागरिक-केंद्रित अनेक उपाय आणि माहिती तंत्रज्ञानावर
आधारित सुविधा केल्याच्या संदर्भात ही अधिसूचना आहे. हे मसुदा नियम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या
संकेतस्थळावर देण्यात आले असून, त्यावर पुढील ३० दिवसात सर्वसामान्य लोक, आणि राज्य
सरकारांनी आपलं मत नोंदवायचं आहे, त्यानंतर या नियमांना अंतिम रुप दिलं जाईल.
****
परभणी
इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या प्राणवायू प्रकल्पातून काल वायूगळती झाल्यानं,
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसंच
प्रशासनाने तत्परता दाखवून युद्धपातळीवर काम केल्यानं, कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
रुग्णालयातला प्राणवायू पुरवठाही काही वेळातच सुरळीत झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद
ग्रामीण जिल्हा पोलीस दलात कार्यरत ४५ वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसंच
त्यांच्या कुटुंबियांसाठी, येत्या ३० तारखेपर्यंत औरंगाबाद इथं विशेष लसीकरण शिबीर
आयोजित करण्यात आलं आहे. काल या शिबीरात ७० जणांना कोविड लस देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment