Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी
साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
** कोविडच्या सौम्य लक्षणांसाठी केंद्र सरकारच्या शास्त्रीय
सल्लागार कार्यालयाकडून उपाय योजना जारी
** माजी महाधिवक्ता सोली सोराबजी, ज्येष्ठ पत्रकार रोहित
सरदाना यांचं निधन
** जालना जिल्ह्यात १० तर औरंगाबाद जिल्ह्यात आज १४ कोविडग्रस्तांचा
मृत्यू
आणि
** राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री
सहायता निधीस दोन कोटी रुपये मदत
****
कोविडची सौम्य लक्षणं असल्यास घरीच योग्य खबरदारी घेऊन
संसर्गावर मात करणं सहज शक्य असल्याचं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या
शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून कोविड व्यवस्थापनाबाबत उपाय योजना जारी केल्या आहेत,
त्यात सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी या कार्यालयानं आवश्यक उपाय
सांगितले आहेत. कोविडची प्राथमिक लक्षणं आढळताच, रुग्णांनी विलगीकरण करून घ्यावं, आराम
करावा, पाणी तसंच पेय पदार्थांचं सेवन करत राहावं, खोलीमध्ये हवा खेळती ठेवावी, रक्तातलं
प्राणवायूचं प्रमाण तसंच शरीराचं तापमान सतत तपासत राहावं, मात्र प्राणवायूचं प्रमाण
९२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास, किंवा ताप उतरत नसल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
असं यात म्हटलं आहे.
****
देशाचे माजी महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं
आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. सोराबजी यांनी अनेक प्रतिष्ठीत
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं होतं. १९९७
साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं
होतं.
****
आजतक या हिंदी वृत्तवाहिनीचे
ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं दिल्ली
इथं निधन झालं. ते ४२ वर्षांचे होते. गेल्या २४ तारखेपासून ते कोविड संसर्गानं आजारी
होते. उपचारादरम्यान, आज त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन, त्यात त्यांचं निधन झालं.
२०१८ साली सरदाना यांना पत्रकारितेतल्या मानाच्या गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने
सन्मानित करण्यात आलं होतं.
सोराबजी, तसंच सरदाना यांच्या
निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारण
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मिस्टर इंडिया किताब पटकवलेले
शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड यांचं आज बडोद्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ३४ वर्षांचे
होते. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड हे नुकतेच नवी मुंबईतून
बडोदा इथं स्थायिक झाले होते. मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, तसंच महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग
असोसिएशनने लाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
उस्मानाबाद इथंले ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार तिलोकचंद
बेदमुथा यांचं हैदराबाद इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने
त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही
त्यांनी काम केलं होतं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त
आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा
या शासकीय निवासस्थानी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या
माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला असून समाजाला एकसंध ठेवण्याचे त्यांचे
विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत असं ठाकरे यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही तुकडोजी महाराजांना अभिवादन करताना, स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्योतर
काळात त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी
संतोष राऊत यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराजांना आदरांजली वाहिली.
****
नांदेड इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक
प्रमोद शेवाळे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी
संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १० कोविड बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ७५८
झाली आहे. दरम्यान, आज ६८३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता
४६ हजार ४८८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ७५२ रुग्णांना
आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ३८ हजार ८८१ रुग्ण या आजारातून बरे झाले
आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौदा कोविड बाधितांचा आज शासकीय
वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यत
दोन हजार ४९८ रुग्ण दगावले आहेत. आजच्या मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या आठ, जालना
जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि नाशिक इथल्या प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा समावेश
आहे.
दरम्यान, घाटीचा बाह्यरुग्ण विभाग उद्या एक मे रोजी महाराष्ट्र
दिनानिमित्त बंद राहणार असून रविवारी नेहमी प्रमाणे विभाग सुरु राहणार असल्याचं कळवण्यात
आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार ५२० नवे कोविड बाधित रुग्ण आढळून
आले. यामध्ये सर्वाधिक २९८ रुग्ण हे बीड तालुक्यातील असून अंबाजोगाई २३६, केज १९८,
आष्टी १८७, गेवराई १५५, परळी ११६, धारुर ८६, शिरुर ८०, माजलगाव आणि पाटोदा प्रत्येकी
६५ आणि वडवणी इथल्या ३४ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा
पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातल्या ३८ पैकी १३ कैद्यांना कोविडची लागण झाली आहे. मंगळवेढा
पोलीस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी या बाबतची माहिती दिली. या बाधित कैद्यांवर
मंगळवेढा तहसील उपकारागृहात उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री
सहाय्यता निधीस दोन कोटी रुपये मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे
एक कोटी रुपये तर राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं एक महिन्याचं वेतन
असे एकूण दोन कोटी रुपये मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील
नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवर
अधिक भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला
सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात
म्हटलं आहे.
****
ठाणे महानगर पालिकेतल्या राष्ट्रवादी
काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा
निर्णय घेतला आहे, पालिकेतले विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी ही माहिती दिली
आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १५ लाख रुपये जमा होणार असल्याचं,
पठाण यांनी सांगितलं आहे.
****
परभणी शहरात सर्व स्मशानभूमीमध्ये
विद्युतदाहिनी बसवण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे पाटील
यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरासह जिल्ह्यात कोविडबाधित
रुग्ण तसंच मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी
प्रतिक्षा करावी लागत असल्याचं म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात एका महिलेस
डांबून ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेख शौकत शेख शरीफोद्दिन या आरोपीस तिसरे
सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची
शिक्षा ठोठावली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-केदारखेडा
रोडवर आज दुपारी विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या
अपघातात दुचाकीस्वार १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली.
//**********//
No comments:
Post a Comment