Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
·
कोविड उपचारासाठीच्या रेमडेसिवीर औषधाचा काळा बाजार करणाऱ्या
टोळीला औरंगाबादमध्ये अटक.
·
१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून
सुरु; पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस देणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे.
·
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा २९ एप्रिलपर्यंत अहवाल दाखल करण्याचे
सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश.
·
अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह कुटुंबियांच्या
ताब्यात न देण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना.
·
राज्यात ६६ हजार ३५८ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
१४३ जणांचा मृत्यू तर सात हजार ४३८ बाधित.
आणि
·
मराठवाड्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
आणि गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत.
****
कोविड
उपचारासाठीचं रेमडेसिवीर औषध, काळ्या बाजारात चढ्या भावानं २० हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या
एका टोळीला, औरंगाबाद शहर पोलिसांनी काल अटक केली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला बनावट
ग्राहक बनवून, आरोपी दिनेश नवगिरे याला सापळा रचून, औरंगाबाद इथं अटक करण्यात आली.
या औषधाविषयी विचारणा केली असता, त्यानं जालना इथल्या कोविड केंद्रातले कर्मचारी मित्रांकडून
हे औषध घेतल्याचं सांगितलं. यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं राहणाऱ्या संदीप रगडे,
प्रविण बोर्डे, नरेंद्र साबळे, साईनाथ वाहुळ, अफरोज खान यांच्यासह, औरंगाबाद इथल्या
भाग्यनगर भागात राहणाऱ्या रवि डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या
औषधांसह अन्य पाच लाख ६४ हजार ५८७ रुपयांचा मुद्देमाल, पोलिस आणि अन्न औषधी प्रशासन
विभागानं ताब्यात घेतला आहे.
****
१८
वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. कोविन
डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. या ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच
कोविड लस दिली जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या एक
मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वर्ष वयोगटाच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर, ते काल
बोलत होते. लसीच्या पुरेशा मात्रांची उपलब्धता, हा मोठा प्रश्न असल्यानं, सर्व राज्यांमध्ये
एक तारेखपासून लसीकरण सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
लसीकरण हे जे काही
केलं जाईल १८ ते ४४ हे आयटीचं डिजीटल मॉडल आहे. कोविन नावाचं त्याच्यावरच केलं जणार
आहे. त्यामुळे डायरेक्ट सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही. आणि ऑनलाईन बुकींग तुमचं
ॲकस्पेट झाल्यानंतर टाईम स्लॉटप्रमाणे तुम्हाला जावं लागेल. झुंबड करु नका. आणि त्यामुळे
अव्हॅबिलीटीच्या संदर्भानं निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत. आणि जोपर्यंत
निर्णंय त्याअनुषंगानं घेत नाही आपण तोपर्यंतची अडचण आहे. त्यामुळे घिसडघाई करु नका.
सर्वच राज्यांमध्ये एक मे ला लगेच सुरु होईल हा अजून माझ्यासमोर प्रश्नचिन्ह यासाठी
वाटतो की अव्हॅबिलीटीचा मोठा प्रश्न आहे.
ही
लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतल्या नागरिकांनाच मोफत द्यायची, याबाबतचा
अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असं टोपे यांनी सांगितलं. दररोज आठ लाख
लसीकरणाचं उद्दिष्ट राज्यानं ठेवलं असून, लसीचा
पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. सिरम
आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना, लसीच्या मुबलक मात्रा उपलब्ध करून
द्याव्यात, यासाठी पत्र पाठवलं आहे, त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नसल्याचं टोपे यांनी
सांगितलं.
दरम्यान,
राज्य सरकारनं ४० हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २७ ऑक्सिजन टँक, २५ हजार मेट्रीक टन
द्रवरूप ऑक्सिजन, आणि रेमडीसीवीरच्या १० लाख कुप्या या साहित्यासाठी, जागतिक निविदा
काढली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात सध्या एक हजार ६१५ मेट्रीक टन प्राणवायू
वापरला जातो. त्याचा काटकसरीनं वापर व्हावा यासाठी, नंदूरबार जिल्ह्यात ऑक्सिजन नर्स
ही संकल्पना राबवण्यात आली आहे. ५० रुग्णांसाठी एक परिचारिका नेमून तिच्या माध्यमातून
प्राणवायू वापरावर लक्ष ठेवलं जातं. नंदूरबार जिल्ह्यात ही संकल्पना यशस्वी झाल्याचं
दिसत असून, अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा, असं टोपे यांनी सांगितलं.
****
देशातल्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी गुरुवार २९ एप्रिल पर्यंत त्यांच्याकडील
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा अहवाल दाखल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
दिले आहेत. न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी
करताना हे निर्देश दिले आहेत. लसींच्या किमतीबाबत आणि इतर महत्त्वांच्या बाबतीत तर्कसंगत
स्पष्टीकरण द्यावं, असंही खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यांना
सांगितलं आहे. संकटाचा सामना करताना तुम्ही कशा प्रकारे राष्ट्रीय नियोजन केलं आहे,
असा प्रश्न न्यायमूर्ती ए. रविंद्र भट यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला
होता, त्यावर मेहता यांनी, हा मुद्दा अत्यंत उच्चस्तरीय कार्यकारी पातळीवर घेण्यात
येत असल्याचं सांगितलं.
****
स्मशानभूमीत
अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाऊ नयेत,
असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. कोविड काळातल्या समस्यांबाबत
दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. राज्यभरातील
अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,
त्याचबरोबर राज्यभरातल्या शवगृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही
न्यायालयानं व्यक्त केली.
कोविड-19
वर उपचारासाठी वापरली जाणारी रेमडेसीवीर सारखी औषधं किंवा इंजक्शन, खाजगी व्यक्ती थेट
औषध कंपन्यांकडून कशी खरेदी करू शकतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे.
राज्याला रेमेडिसीवीरचा आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात दिशानिर्देश द्यावेत, यासाठी
दाखल जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी एका खासदारानं रेमडेसीवीर इंजक्शनच्या
१० हजार मात्रा वितरित केल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर, न्यायालयानं याबाबत विचारणा
केली.
****
कोविड
प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करण्याचं आवाहन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा
तुटवडा लक्षात घेऊन, सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचं आवाहन, वडेट्टीवार यांनी तरुणांना
केलं आहे.
****
राज्यात
काल ६६ हजार ३५८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४४ लाख १० हजार ८५ झाली आहे. काल ८९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६६ हजार १७९ झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ६७ हजार ७५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले. राज्यात आतापर्यंत ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक २१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सात हजार ४३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४३ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, लातूर ३०, नांदेड २९, परभणी २०,
जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी १३, हिंगोली सात, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
पाच रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल ९५८ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ३०३, बीड एक हजार २९७, परभणी
एक हजार ३३, नांदेड एक हजार चार, जालना ८७९, उस्मानाबाद ७२८, तर हिंगोली जिल्ह्यात
२३६ नवे रुग्ण आढळून आले.
****
महाराष्ट्र
पत्रकार कल्याण निधीचे २०२० साठीचे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार’ जाहीर
झाले. मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांना ‘ज्येष्ठ पत्रकार दर्पण पुरस्कार’,
तर पत्रकार मंगेश चिवटे यांना, ‘कोविड योद्धा दर्पण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. नांदेडचे
आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर, रत्नागिरीचे प्रमोद कोणकर, अहमदनगरचे पत्रकार मिलिंद
चवंडके यांच्यासह बारा जणांना, विभागीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला आहे. जांभेकरांच्या
जन्मगावी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावी, शासनाच्या निर्देशानुसार या पुरस्कारांचं
वितरण केलं जाणार असल्याचं, संघटनेकडून सांगण्यात आलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या भूम तालुक्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आमदार तानाजी सावंत यांनी
आढावा घेतला. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णाखाटांची संख्या वाढवण्याबरोबरच, प्राणवायू
पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना, त्यांनी यावेळी केली. वाशी इथंही
ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन त्यांनी तालुक्यात केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा
घेतला.
दरम्यान,
जिल्ह्यात उमरगा इथं १०० रुग्णखाटांचं, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कोविड सुश्रुषा
केंद्र सुरु करण्यात आलं आहे. माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या सूचनेनुसार, सौम्य
लक्षणं असलेल्या आणि गृह विलगिकरणाची सुविधा उपलब्ध नसलेल्या रुग्णांसाठी, हे कोविड
केंद्र उभारण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उमरगा इथल्या माऊली प्रतिष्ठान
या संघटनेच्या कोविड केंद्राचंही काल उद्घाटन करण्यात आलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांवर उपचारासाठी सुविधा उपलब्ध
करण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात
एकूण २४ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ साध्या
रुग्णखाटा, तसंच १० प्राणवायूसह रुग्णखाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चार केंद्रांचं
काम सुरू झालं असून, उर्वरित वीस प्राथमिक आरोग्य केंद्रातही या सुविधा लवकरच उपलब्ध
होणार असल्याचं, डॉ.पवार यांनी सांगितलं.
****
परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातलं ईटोली गाव कोविडचं हॉटस्पॉट बनलं आहे. नागरिकांमध्ये
कोविडबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी, आणि लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी, आमदार
मेघना बोर्डीकर यांनी काल ईटोली गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी
सर्दी, ताप, खोकला असा कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब आरटीपीसीआर चाचणी करून
घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येनं लसीकरण करावं, असं आवाहन बोर्डीकर यांनी ग्रामस्थांना
केलं.
****
बारा
बलुतेदारांना शासनानं पाच हजार रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या
ओबीसी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन ओबीसी मोर्चाच्या नांदेड
शाखेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व्यंकटेश
जिंदम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू
टाळेबंदीमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असं या निवेदनात म्हटल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात तसंच उदगीर परिसरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन
आणि अन्य औषधाची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं
आहे. उदगीर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा आणि उपाय योजना बैठकीत
काल ते बोलत होते. उदगीर इथं प्रस्तावित द्रवरूप प्राणवायू साठवण टाकीचं काम लवकरात
लवकर पूर्ण करण्याची सूचना बनसोडे यांनी संबंधितांना केली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात भूम इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या कोविड केंद्राला, जिल्ह्याचे पालकमंत्री
शंकरराव गडाख यांच्या समवेत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल भेट दिली. रुग्णांची
भेट घेत आरोग्य सुविधा, भोजन, स्वच्छता आदी सोयीसुविधांबाबत त्यांनी चौकशी केल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाड्याच्या
सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या ३० एप्रिलपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट
होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात
घेऊन सर्व जिल्ह्यातील शेतकरी तसंच नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून
करण्यात आलं आहे.
****
मध्ययुगीन
मराठी वाङ्मयाचे अभ्यासक डॉ.सुग्राम पुल्ले यांचं काल नांदेड इथं कोविड संसर्गानं निधन
झालं, ते ९० वर्षांचे होते. देगलूर इथल्या देगलूर महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.
त्यांची महानुभाव आणि वारकरी साहित्य, 'महानुभाव आणि वारकरी साहित्याचे अंतरंग' ही
पुस्तके प्रसिद्ध आहेत.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष
डॉ.अनिल कठारे यांचं काल निधन झालं. डॉ.कठारे यांनी ११० पुस्तकांचं लेखन केलं आहे.
डॉ. कठारे यांनी लिहिलेलं “आधुनिक भारताचा इतिहास” हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते आनंद इनामदार यांच काल अल्पशा आजारानं औरंगाबाद
इथं निधन झालं, ते ६८ वर्षे वयाचे होते. इनामदार हे नांदेडच्या भाग्यलक्ष्मी सहकारी
बँकेचे काही काळ अध्यक्ष होते.
****
हिंगोली
जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीसांनी अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर काल कारवाई
केली. देशी दारूचे १५ खोके आणि वाहन असा एकूण पाच लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी
जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातील वसमत आणि नांदेड - औंढा मार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहनांमधील मोबाईल
चोरणाऱ्या चोरट्यास हिंगोली पोलिसांनी काल अटक केली. ढाब्यावर थांबलेल्या वाहनांमधून
चोरलेले मोबाईल हा भामटा कमी किमतीत नागरिकांना विकत होता. चोरी केलेले एकूण ३३ मोबाईल
पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत ३ लाख ८९ हजार रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
यवतमाळच्या
पोलीस अधीक्षकांच्या नावाने फेसबुकवर एसपी यवतमाळ हे बनावट अकाऊंट तयार करून, मित्र
यादीतल्या अनेकांना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातल्या एका
पत्रकाराकडे या व्यक्तीनं पैशांची मागणी केल्यानंतर, याबाबत पोलिसांच्या सायबर सेलकडे
तक्रार दाखल झाली. त्यानंतर सदर बनावट अकाउंट डिलीट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment