Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा
अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि
तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना राज्य सरकार कोविड लस मोफत
देणार
**
माजी मंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचं हदयविकाराच्या धक्क्यानं निधन
**
औरंगाबाद इथं आज २३ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार २३७ रुग्ण
आणि
**
औरंगाबाद महानगर पालिकेची कोविड लसीकरण मोहीम उद्यापासून
सुरळीत होणार
****
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोविड लस मोफत देण्यात येणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक
विकासमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. या लसीकरणासाठी स्वस्त दरात, चांगली लस
उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक निविदा काढण्यात येणार आहे, राज्यसरकारच्या तिजोरीतून
हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली. ते म्हणाले...
मागच्या कॅबिनेटमध्ये विषयावर चर्चा झाली होती. सर्वांमध्ये
एकमत झाल होत की, कुठेतरी आपण आपल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत लवकरात
लवकर व्हॅक्सीन द्यायचं आहे. त्याबाबतीत मुख्यमंत्री यांचा होकार होता. उपमुख्यमंत्री
महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की, लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलावून जी चांगली
लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करुन देईल, महाराष्ट्र सरकार आपल्या तिजारीतून
हा कार्यक्रम हाती घेणारच आहे. लवकरात लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार आहे.
****
माजी
मंत्री भाजप नेते संजय देवतळे यांचं आज दुपारी नागपूर इथं हदयविकाराच्या धक्क्यानं
निधन झालं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर इथं कोविडसंसर्गावर उपचार सुरु
होते. त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
केलं. आमदार, पालकमंत्री यापदांसह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाची जबाबदारी देवतळे
यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून तर २०१९ मध्ये शिवसेनेकडून
निवडणूक लढवली होती, मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. नुकताच
त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून
शोकभवना व्यक्त होत आहे.
****
मुंबई
महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४
प्रकल्पांच्या उभारणीस सुरूवात करण्यात येणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी
यासाठी पुढाकार घेतला असून ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर,
मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये
हे प्रकल्प कार्यान्वित होतील, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
नांदेड
शहरात गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाविषाणू बाधित रुग्णाला हवेतला प्राणवायू उपलब्ध
करून देणारं संयत्र, निःशुल्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी
९४ २१ १७ ११ ९१ किंवा ९८ ९० ९६ ६० ६२ या क्रमांकावर संपर्क साधल्यास मदत मिळू शकते
असं आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी कळवलं आहे.
****
परभणी
शहरासह जिल्ह्यातील कोविड बाधितांचा उपचार सुरु असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना
काल मध्यरात्री जिल्हा प्रशासनाने प्राणवायूचा पुरवठा केला. पुणे जिल्ह्यातल्या चाकण
इथून आलेला प्राणवायूचा टँकर पोलिस बंदोबस्तात औद्योगिक वसाहतीतल्या साठवणुकीच्या ठिकाणी
नेला गेला. त्या टँकरमधून १८ किलो लीटर एवढा प्राणवायू उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यात
सध्या प्राणवायूचा तुटवडा नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीवर मात करणं याला
आज आपलं सर्वात प्रथम प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी आज त्यांनी
संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणू
संसर्गाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये
खूप मोठी आशा निर्माण झाली होती, आत्मविश्वासानं देश भारलेला होता, मात्र या दुसऱ्या लाटेनं पुन्हा देशाला हादरवून टाकल्याचं ते म्हणाले. आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ञ आणि वैज्ञानिकांच्या सल्ल्याला प्राधान्य
द्यायचं आहे. राज्य सरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, केंद्र सरकार पूर्ण शक्तीनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही
आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या भागात देशातल्या डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णवाहिका चालक यांच्याशी थेट संवाद
साधला. मुंबईच्या भारतीय डॉक्टर्स महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शशांक जोशी यांचे विविध अनुभव जाणून घेतले. डॉ जोशींनी आकाशवाणीशी बोलताना
आपला अनुभव या शब्दांत कथन केला.
कोविडची दुसरी लाट आलेली आहे. या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला ही
लाट सामोरे जाऊन याच्यातून आपल्याला सुरक्षित बाहेर यायचं आहे. आपल्या कुटुंबाची आपल्याला
काळची घ्यायची आहे. आपल्याला स्वत: जबाबदारीने
कोविडच्या बाहेर पडायचं आहे. याच्यासाठीच आपण सगळे प्रयत्नशील आहोत. मला खूप
आनंद झाला की, आज माननीय प्रधानमंत्री बरोबर मला बोलायची एक संधी मिळाली आणि याच्या
बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
****
औरंगाबाद
इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज २३ कोविडग्रस्तांच्या मृत्यूची
नोंद झाली. यामध्ये नाशिक तसंच बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर जालना तसंच
हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्शेकी एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित १७ मृत रुग्ण औरंगाबाद
जिल्ह्यातले आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळच्या सत्रात ७४ नवे कोविड रुग्ण
दाखल झाले.
****
बीड
जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २३७ रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २३२
रुग्ण बीड जिल्ह्यात, त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात २२५ रुग्ण, आष्टी १३०, केज
१२९, गेवराई ११७, परळी ७४, धारूर ७२, शिरूर ६९, पाटोदा ६८, माजलगाव ६२, तर वडवणी तालुक्यात
५९ रुग्ण आढळले.
****
परभणी जिल्ह्यात शासकीय कोविड केंद्रावर खासगी डॉक्टरांचं
पथक रुग्णांच्या सेवेत दाखल झालं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआय तसंच जिल्हा
परिषद नूतन इमारतीसह अन्य शासकीय कोविड केंद्रातली मनुष्यबळाची कमतरता ओळखून खासदार
संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी खासगी डॉक्टरांबरोबर
घेतलेल्या बैठकांमधून वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचे आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला
खाजगी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे.
****
राज्यात
रक्ताचा तुटवडा पाहता, विविध संस्था संघटनांकडून रक्तदान शिबीरांचं आयोजन केलं जात
आहे.
यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्र, आणि औरंगाबाद इथल्या गजानन महाराज
संस्थानच्या विशेष सहकार्याने आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं, या शिबिरात ११५ जणांनी
रक्तदान केलं. शासकीय रक्तपेढीनं रक्तसंकलन केलं.
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं, भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात
३१ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. भारतीय जैन संघटनेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला.
लातूर
महानगरपालिकेनं रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांना कोविड लसीकरणात प्राधान्य
देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातल्या कोणत्याही रक्तपेढीत रक्तदान करण्याचं आवाहन
लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्व ११५ प्रभागातली
लसीकरण मोहीम उद्यापासून सुरळीत सुरू होणार आहे. लसीचा तुटवडा असल्यानं, काल फक्त आठ
केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं. मात्र आता मनपाला कोविड लसीच्या २५ हजार मात्रा प्राप्त
झाल्या आहेत, त्यामुळे उद्या सोमवारपासून सर्व केंद्रावर लसीकरण पूर्ववत सुरू राहणार
असल्याचं, उपायुक्त तथा कृतीदल प्रमुख अपर्णा थेटे तसंच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ
नीता पाडळकर यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरटीपिसीआर तसंच
अँटीजन चाचणी प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यासाठीच्या अभियानाला शिवसेनेच्या वतीने
सुरुवात करण्यात आली आहे. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. आज झरी,
बोबडे टाकळी, जोड परळी तसंच पिंगळी कोथाळा इथं कोरोना विषयक जनजागृती अभियानाचा प्रारंभ
आमदार पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला
****
जैन धर्मियांचे २४ वे अखेरचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज भक्तिभावानं
साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त जनतेला
शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य आणि अहिंसेला समर्पित भगवान महावीर यांचं जीवन आपल्याला
विचारांची समृद्धता देते. त्यांचा शांतता, अहिंसा, बंधुत्वाचा विचार आचरणात आणण्याचा
प्रयत्न करू या, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.
//**********//
No comments:
Post a Comment