Monday, 26 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६    एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान आज सकाळी सात वाजता सुरु झालं. या टप्प्यात पाच जिल्ह्यातल्या ३४ मतदारसंघांचा समावेश आहे.

****

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अग्निकांड प्रकरणी, दोन जणांना पोलिसांनी काल अटक केली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शाह आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी शैलेश पाठक यांचा यात समावेश आहे.

****

वैद्यकीय वापराशिवाय इतर कोणत्याही उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा न करण्याचे निर्देश केंद्रीय गृह विभागानं दिले आहेत. देशात वाढता कोरोना विषाणू संसर्ग आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असून, गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला.

****

औरंगाबाद जिल्ह्यासाठी काल कोव्हिशिल्ड लसीचे ४० हजार डोस प्राप्त झाले. यात ग्रामीण भागासाठी १५ हजार, तर महानहरपालिका क्षेत्रासाठी २५ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्व ११५ प्रभागातली लसीकरण मोहीम आज सुरळीत सुरु झाली.

****

जळगाव जिल्ह्याच्या भडभाव तालुक्यातल्या कजगाव पोस्ट इथं सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना, पंतप्रधान सुरक्षा विम्याची, दोन लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. असा लाभ जळगाव जिल्ह्यात प्रथमच विमाधारकास मिळाला आहे. पंतप्रधान सुरक्षा बिमा योजनेत वार्षिक फक्त १२ रुपये भरून अपघाती संरक्षण प्राप्त होतं.

****

रेल्वे आरक्षण तिकीटाचा काळा बाजार करणारी एक टोळी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड टपाल कार्यालयातून या टोळीनं रेल्वे तिकीट आरक्षण प्रणालीची लिंक चोरली होती. रेल्वेचे बनावट आरक्षित तिकीट बनवून ते विक्री करत होते, या आरोपींना मुद्दे मालासह रंगेहाथ पकडण्यात आलं.

****

मराठवाड्यात काल सहा हजार ९९९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४४ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी २७, लातूर २५, बीड २०, उस्मानाबाद १६, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दहा, तर जालना जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांची समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ८१ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ५२२, बीड एक हजार २३७, नांदेड एक हजार १०५, जालना ७५६, परभणी ६३९, उस्मानाबाद ५६९, तर हिंगोली जिल्ह्यात ९० नवे रुग्ण आढळून आले.

****

No comments: