Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
·
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींची किंमत कमी करण्याचं केंद्र
सरकारचे उत्पादक कंपन्यांना आवाहन.
·
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सोयी
सुविधा पुरवण्यासाठी केलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे राज्याच्या
आरोग्य सचिवांना उच्च न्यायालयाचे आदेश.
·
घरामध्येही मास्क लावण्याची आणि पाहुण्यांना घरी न बोलावण्याची
नीति आयोगाची सूचना.
·
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या
वर्षाच्या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
·
राज्यात ४८ हजार ७०० कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४६
जणांचा मृत्यू तर सहा हजार ३९३ बाधित.
आणि
·
केंद्र तसंच राज्य सरकारनं सर्व औषधं करमुक्त करण्याची संभाजी
ब्रिगेडची मागणी.
****
देशात
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना जगभरातल्या खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत,
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसींची किंमत भारतात अधिक असल्याचं दिसून आलं आहे. या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं, सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याचं आवाहन
केलं आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांना ६०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना
१२०० रुपये, तर सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशिल्ड लसीचे दर राज्यांना ४००
रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये केले आहेत. लसीची भारतातली किंमत आणि इतर देशातल्या
लसींच्या किमती यांची तुलना करणं अन्याकारक होईल, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं होतं. भारत बायोटेकनं किमतीचे स्पष्टपणे
समर्थन केलं नसलं, तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किंमत ठेवल्याचं म्हटले आहे.
****
कोविड
रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला प्राणवायु, रेमडेसिवीर इंजेक्शन, अँटिजेन किट
आदींसह आवश्यक त्या वैद्यकीय सोयी सुविधा पुरवण्यासाठी काय व्यवस्था केली, याबाबत सविस्तर
शपथपत्र दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याच्या
आरोग्य सचिवांना दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि बी यू देबादवार यांच्या खंडपीठानं,
कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढलेली संख्या आणि रुग्णांच्या उपाचारातील विविध
त्रुटींसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्ताची स्वतः दखल घेतली. औरंगाबाद खंडपीठाच्या
कार्यक्षेत्रातल्या १२ जिल्ह्यातले पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक आणि जिल्ह्याधिकाऱ्यांनाही
तीन मे रोजी अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठानं दिले आहेत. जिल्ह्यांच्या प्राथमिक
आरोग्य सेवा केंद्रांना जलद अँटीजेन चाचणी किट्स पुरवण्याचं, आणि त्याबाबतीत झालेली
प्रगती तीन मेपर्यंत निवेदनाद्वारे सादर करण्याचे निर्देश, खंडपीठानं, राज्य शासनाच्या
संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारात लोकसेवक अथवा शासकीय
अधिकारी सापडला, तर त्याची तत्काळ खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेशही खंडपीठानं दिले
आहेत.
****
कोरोना
विषाणूच्या वाढत्या संसर्गासमोर सरकार आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली असताना नीति आयोगानेही
नागरीकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. आता घरामध्येही मास्क लावण्याची वेळ आली
असून, पाहुण्यांनाही घरी बोलावता कामा नये, असं नीति आयोगाचे आरोग्य मंत्रालयातले सदस्य
व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे. शारीरिक अंतर न पाळणारी एखादी व्यक्ती ३० दिवसांमध्ये
४०६ लोकांना बाधित करु शकते, असं संशोधनातून समोर आलं असल्याचं, त्यांनी सांगितलं.
लोकांनी केवळ भीतीपोटी रुग्णालयांमध्ये भरती होणं टाळावं, औषधे देखील डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसारच घ्यावी, असं पॉल यांनी सांगितलं.
****
कोविड
लसीकरणात महाराष्ट्राने विक्रमी नोंद केली आहे. काल सायंकाळपर्यंत एका दिवसांत पाच
लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते.
या आधी तीन एप्रिल रोजी चार लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचं एका दिवसात लसीकरण करून, महाराष्ट्राने
राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. काल राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे.
आतापर्यंत राज्यभरात एक कोटी ४८ लाखावर नागरिकांचं लसीकरण झालं असून, आज सायंकाळपर्यंत
महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पार करेल, असं आरोग्य विभागाचे प्रधान
सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे.
****
सर्व
पात्र व्यक्तींना केंद्र सरकारकडून कोविड लस मोफत दिली जाणार असून, राज्य सरकारवर लसीकरणाचा
काहीही भार नसल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं
आहे. ते काल मुंबईत अंधेरी इथं कोविड केंद्राचं उद्घाटन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत
होते. येत्या एक मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाचं धोरण सुनिश्चित
करण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
‘मन
की बात’ मध्ये माननीय प्रंतप्रधान महोदयांनी हे स्पष्ट केलं आहे, प्रत्येक एलिजिबल
व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा
भार नाही आहे. आपली व्हॅक्सीनेशन स्ट्रॅटेजी जी आहे, एक तारखेपासून ती आपल्याला ठरवली
पाहिजे. कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इनव्हॉल्व होतोय आणि त्याच्यामुळे थोडी
अव्यवस्था होण्याची शक्यता आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे.
एखाद्या
राज्य सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा असेल किंवा सामाजिक संस्था संघटनांना आपल्या
खर्चाने लसीकरण करायचं असेल, तर त्यांच्यासाठी बाजारात लस उपलब्ध असेल, अशी माहिती
फडणवीस यांनी दिली.
****
वैद्यकीय
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जून महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल
ही माहिती दिली. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या परिक्षा पुढे ढकलण्यात
आल्या होत्या. राज्यातल्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी
डॉक्टर, आणि त्यांच्या संपर्कातले ३५० जण कोविड बाधित आहेत, त्यामुळे या परीक्षा पुढे
ढकलण्याची मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती.
****
राज्यात
काल ४८ हजार ७०० कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ झाली आहे. काल ५२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६५ हजार २८४ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ७१ हजार ७३६ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३६ लाख एक हजार ७९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक ९२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ७४ हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सहा हजार ३९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४६ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २८, परभणी २७, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातल्या
प्रत्येकी २४, उस्मानाबाद १७, जालना ११, बीड आठ तर हिंगोली जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा
समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एक हजार ३९ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ६९, बीड एक हजार ८६,
नांदेड ८७३, उस्मानाबाद ७२०, परभणी ६८४, जालना ६८३, तर हिंगोली जिल्ह्यात २३९ नवे रुग्ण
आढळून आले.
****
राज्यभर
ठिकठिकाणी कोविड ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग सुरू करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश
प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सौम्य लक्षणं असलेले रुग्णही भीतीपोटी मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत. यासाठी
बाह्य रुग्ण विभागातून डॉक्टर उपलब्ध असल्याचा विश्वास रुग्णांमध्ये निर्माण होण्याची
आवश्यकता, कुळकर्णी यांनी व्यक्त केली
****
केंद्र
तसंच राज्य सरकारनं सर्व औषधं करमुक्त करण्याची मागणी, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र
प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा वैद्यकीय उपचारांचा
खर्च सहन करावा लागत आहे, या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर औषधं करमुक्त करण्याचा निर्णय
घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असून, तो सुरळीत ठेवण्याची खबरदारी प्रशासन
घेत असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत, ते काल बोलत होते. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे
प्रमाण, ८६ पूर्णांक ५२ शतांश टक्के असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. खासगी रुग्णालयांकडून
आकारण्यात येत असलेल्या जादा रकमेच्या देयकांची तातडीने तपासणी करुन, त्यावर कारवाई
करण्याची सूचना, सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.
औरंगाबाद
जिल्ह्याच्या पैठण इथं आरोग्य प्रशिक्षण केंद्रात, कोविड रुग्णांसाठी डिसीएचसी उपचार
सुविधा तातडीने सुरु करण्याचे निर्देश, रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपान
भुमरे यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र असल्याशिवाय गृह विलगीकरणाला परवानगी मिळणार
नाही, असं जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात
काल झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, कळंब आणि
परांडा या चार तालुक्यांमध्ये, प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्यातला
पहिला साखर उद्योगातून प्राणवायू उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्प, उस्मानाबाद जिल्ह्यात
चोराखळीच्या साखर कारखान्यावर उभारणार असल्याचंही, पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
जिल्ह्याला
दररोज १४ मेट्रीक टन प्राणवायूची गरज असून, सध्या आठ ते नऊ मेट्रीक टनाचा पुरवठा होत
असल्याचं, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं.
****
हिंगोली
शहरातल्या दिवेश मेडीकल या औषधी दुकानात रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणि विक्रीचा ताळमेळ
आढळून आला नसल्यानं, या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द शिफारस, प्रभारी जिल्हा पुरवठा
अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली
आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं औषधी
दुकानावर छापा टाकून ही कारवाई केली.
****
परभणी
जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात राणीसावरगाव इथला श्री रेणुका देवीचा आजपासून सुरु
होणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
हा निर्णय घेतला असल्याचं, मंदीर विश्वस्थांकडून कळवण्यात आलं आहे.
****
गॅस
वेल्डिंगचा स्वतःचा व्यवसाय बंद ठेवत लोकांचे प्राण वाचावेत यासाठी बीड जिल्ह्याच्या
कडा इथल्या फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर हे कोरोना विषाणू
बाधित रूग्णांना दिले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत फॅब्रिकेशन व्यावसायिक संतोष
ओव्हाळ –
कडा येथे वेल्डिंग वर्क्स, शेती
अवजारे दुकानं असून आम्हाला तहसीलदार साहेबांनी ऑक्सिजनची मागणी केली असता आम्ही सर्व
ऑक्सिजन सिलेंडर्स तहसिलदारसाहेबांना आणि कडा ग्राम पंचायत यांना सुपूर्द केले असून
त्यांनी ते ज्या हॉस्पिटलला पाहिजे त्या हॉस्पिटलला त्यांनी ते दिलेले आहेत.
****
कोविडमुळे
टाळेबंदीच्या काळात आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या बारा बलुतेदारांना, राज्य
सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी
मोर्चाच्या परभणी शाखेनं, एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना
पाठवलेल्या या निवेदनातून, बारा बलुतेदारांसाठी पाच हजार रुपये अर्थसहाय्य करावं, अशी
मागणी करण्यात आली आहे
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरात तीन कोविड केंद्र उभारण्यात आले, या तीनही केंद्रांचं
काल खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्धाटन झालं. या नवीन तीन
उपचार केंद्रामुळे परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
****
परभणी
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेशी निगडित कार्यालयं तसंच कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक कामांशी
संबंधित कार्यालयं वगळता, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, आजपासून ३० एप्रिलपर्यंत
बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना
म्हणून, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश जारी केले.
****
लातूर
शहर महानगरपालिकेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहर बससेवेचा, लगतच्या १५ किलोमीटर परिघात
विस्तार करण्यास, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परवानगी दिली आहे. लगतच्या गावातील
विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी, ही शहर बस सेवा बाभळगाव, सोनवती,
धनेगाव, गंगापूर, हरंगुळ, नांदगांव - साई, कासारगाव या गावांमध्ये सुरू करण्यात येणार
आहे.
****
जालना
जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या दोन तरुणांचा पद्मावती धरणात बुडून
मृत्यू झाला. अभिषेक श्रीवास्तव आणि महेश काटोले असं या तरुणांची नावं असून, धरणार
पोहण्यासाठी गेले असता, काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
लातूर
जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. औराद शहाजानी
आणि निटूर परिसरातही पाऊस पडल्यानं, आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. नांदेड जिल्ह्याच्या
नायगाव आणि किनवट तालुक्यातही काल अवकाळी पाऊस झाला. नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथं
वीज पडून म्हैस आणि वगार दगावली. उस्मानाबाद जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
पडला. वाशी तालुक्यातल्या दसमेगाव परिसरात गारपीट झाली असून, फळबागांचं मोठं नुकसान
झालं.
****
कमी
प्रवासी संख्येमुळे रेल्वे मंडळानं अनेक गाड्या पुढच्या काही दिवसांसाठी रद्द केल्या
आहेत. यामध्ये मुंबई-लातूर-मुंबई, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी, नागपूर-कोल्हापूर-नागपूर
तसंच मुंबई-बिदर-मुंबई त्रिसाप्ताहिक रेल्वे, या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या येत्या
१० मे पर्यंत धावणार नसल्याचं, रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment