Tuesday, 27 April 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 April 2021 Time 18.10 to 18.20

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविन ॲपवर नोंदणी केलेल्यांच कोविड लस - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट

** अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात देऊ नयेत - मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

** रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात विकणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांकडून अटक

आणि

** औरंगाबाद इथं आज ३६ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार २९७ रुग्ण 

****

कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोविड लस दिली जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ ते ४४ वर्ष वयोगटाच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर टोपे बोलत होते. लसीच्या पुरेशा मात्रांची उपलब्धता, हा मोठा प्रश्न असल्यानं, सर्व राज्यांमध्ये एक तारेखपासून लसीकरण सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले.....

 

 लसीकरण हे जे काही केलं जाईल १८ ते ४४ हे आयटीचं डिजीटल मॉडल आहे. कोविन नावाचं त्याच्यावरच केलं जणार आहे. त्यामुळे डायरेक्ट सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही. आणि ऑनलाईन बुकींग तुमचं ॲकस्पेट झाल्यानंतर टाईम स्लॉटप्रमाणे तुम्हाला जावं लागेल. झुंबड करु नका. आणि त्यामुळे अव्हॅबिलीटीच्या संदर्भानं निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत. आणि जोपर्यंत निर्णंय त्याअनुषंगानं घेत नाही आपण तोपर्यंतची अडचण आहे. त्यामुळे घिसडघाई करु नका. सर्वच राज्यांमध्ये एक मे ला लगेच सुरु होईल हा अजून माझ्यासमोर प्रश्नचिन्ह यासाठी वाटतो की अव्हॅबिलीटीचा मोठा प्रश्न आहे.

 

****

दरम्यान,  रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’या कोविड लसीची पहिली खेप येत्या एक मे रोजी भारतात पोहचणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड - आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीव यांनी ही माहिती दिली. आरडीआयएफने पाच मोठ्या भारतीय लस उत्पादकांसोबत स्पुटनिक या लसीच्या दरवर्षी ८५ कोटीहून अधिक मात्रा तयार करण्याचा करार केला आहे. सुरुवातील पाच कोटी मात्रा प्रत्येक महिन्याला तयार होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतात येत्या १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरू होणार आहे.

****

कोविड प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करण्याचं आवाहन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन, सामाजिक भान जपत रक्तदान करण्याचं आवाहन वडेट्टीवार यांनी तरुणांना केलं आहे.

****

१८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावं, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सध्याचं लसीकरण आणि १ मे पासून होणारे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पाहता, प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

****

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाऊ नयेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. कोविड काळातल्या समस्यांबाबत दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. राज्यभरातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर राज्यभरातल्या शवगृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही न्यायालयानं व्यक्त केली आहे.

****

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी तसंच अन्य कर विवरणपत्रं आणि कर भरणा करण्यास मुदतवाढ देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. कोविड काळात टाळेबंदी तसंच निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची पूर्ण जाणीव आहे. या अडचणी सोडवून उद्योग क्षेत्राला सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र कोविड संसर्ग रोखणं तसंच आरोग्य सुविधा वाढवण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं गोयल यांनी सांगितलं. उद्योगांच्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुमच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधत, तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं गोयल यांनी सांगितलं. रेल्वे मंत्रालयाकडून नवी सेवा देतानाच पूर्वीचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देत असल्याची माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली.

****

कोविड उपचारासाठीचे रेमडेसिवीर औषध काळ्या बाजारात चढ्या भावानं २० हजार रुपयांमध्ये विकणाऱ्या एका टोळीला औरंगाबाद शहर पोलिसांनी आज अटक केली. गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून आरोपी दिनेश नवगिरे याला सापळा रचून आज औरंगाबाद इथं अटक करण्यात आली. या औषधाविषयी विचारणा केली असता त्यानं जालना इथल्या कोविड केंद्रातले कर्मचारी मित्रांकडून हे औषध घेतल्याचं सांगितलं. यात जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं राहणाऱ्या संदीप रगडे, प्रविण बोर्डे, नरेंद्र साबळे, साईनाथ वाहुळ, अफरोज खान यांच्यासह औरंगाबाद इथल्या भाग्यनगरात राहणाऱ्या रवि डोंगरे याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या औषधांसह अन्य पाच लाख ६४ हजार ५८७ रुपयांचा मुद्देमाल पोलिस आणि अन्न औषधी प्रशासन विभागानं ताब्यात घेतला आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, यांच्यासह अनेकांनी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज ३६ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये अहमदनगर इथल्या सहा, जालना चार तसंच लातूर, परभणी, नांदेड, बीड आणि बुलढाणा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उरर्वरित २१ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता दोन हजार ४२२ झाली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २९७ रुग्ण आढळले. यापैकी सर्वाधिक ३१३ रुग्ण बीड तालुक्यात आढळले, त्या खालोखाल अंबाजोगाई तालुक्यात २०६, केज १७१, आष्टी १३८, परळी ८५, गेवराई ८४, पाटोदा ७७, धारूर ५२, माजलगाव ४४, शिरूर ८२ तर वडवणी तालुक्यात आज ४५ रुग्ण आढळले

****

वीज वितरण कंपनीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांचं आज पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गावर उपचार सुरू होते.

****

हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि नांदेड - औंढा मार्गावर गेल्या वर्षभरापासून वाहनांमधील मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास हिंगोली पोलिसांनी आज अटक केली आहे. ढाब्यावर थांबलेल्या वाहनांमधून चोरलेले मोबाईल हा भामटा कमी किमतीत नागरिकांना विकत होता. चोरी केलेले एकूण ३३ मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत ३ लाख ८९ हजार रुपये असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बारा बलुतेदारांना शासनाने पाच हजार रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन ओबीसी मोर्चाच्या नांदेड शाखेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं. ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष व्यंकटेश जिंदम, आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असं या निवेदनात म्हटल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//**************//

 

 

 

 

 

 

 

No comments: