Saturday, 24 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.

****

नव्या संधींचा अभ्यास आणि उपयोग करुन आपापल्या गावांचा विकास करायला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशाच्या विकासात ग्रामपंचायतींनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करण्याचा, आजचा दिवस असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ग्रामीण भागाच्या नवनिर्माणासाठी हा दिवस म्हणजे उत्तम संधी असल्याचं, त्यांनी नमूद केलं. पंतप्रधानांनी यावेळी स्वामित्व योजनेची देशभरात अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली, तसंच सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतींना पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्याचाही शुभारंभ केला.

****

न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी आज देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश रमणा यांची १६ महिन्यांसाठी नियुक्ती असेल. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, देशमुख यांच्या मुंबईत आणि नागपूर मधल्या विविध मालमत्तांवर सीबीआयनं आज छापे मारले.

****

ज्येष्ठ भारूडकार निरंजन भाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंतास आपण मुकलो आहोत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाकरे यांचं काल कोविड संसर्गानं निधन झालं, ते ५६ वर्षांचे होते.

****

नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडीसीवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन ऑडीटही करावं, असं त्यांनी सांगितलं. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून, पोलिस संरक्षणात त्याची वाहतुक करावी, आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या. 

****

कोविड संसर्गामुळे मरण पावलेले महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक तसंच बाह्यस्रोत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेला महावितरणने मुदतवाढ दिली आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच होती. ती आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आलं.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेरीस आज नाशिक जिल्ह्याला विशाखापट्टणम इथून आलेल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ च्या माध्यमातून २५ के.एल. चे दोन टँकर प्राप्त झाले आहेत. देवळाली मालधक्का इथं आज सकाळी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल झाली. जिल्ह्यात ऑक्सिजनची असलेली गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारा साठा यातील तफावत उद्या येणाऱ्या अधिकच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे, असं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात संचारबंदीच्या काळात कपड्याचं दुकान सुरु ठेवणाऱ्या दुकानदाराला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. येलदरी रोडवरील कापड दुकानातून कपडे खरेदी सुरु असल्याची बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

अकोला पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना अटक केली. आरोपी एक इंजेक्शन २५ हजार रुपयांना विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचून ही कारवाई केली.

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून १८ ऑक्सिजन सिलिंडर भेट देण्यात आले आहेत. शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल, तहसिलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी युवराज शिंदे, यांनी तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीचं आवाहन केलं होतं, त्यानुसार सर्व शिक्षकांनी ही मदत केली.

****

दारू मिळाली नाही म्हणून व्यसनाची पूर्तता करण्याकरता सॅनिटायझर पिल्यानं यवतमाळच्या वणी इथल्या सात जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून, सॅनिटायझर पिलेल्या आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: