Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या
नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं
पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
· कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध कायम ठेवण्याचे
आदेश.
· कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करण्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश.
· ‘पी एम केअर्स’ निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला मंजुरी.
· मोफत लसीकरण मोहिमेसाठी काँग्रेसच्या आमदारांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री
सहाय्यता निधीत जमा.
· राज्यात ६६ हजार १५९ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १३४ जणांचा मृत्यू
तर सात हजार ४०३ बाधित.
आणि
· मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध,
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल; राज्य
सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप करणारी परमवीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात
याचिका.
****
राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश काल
राज्य सरकारनं जारी केले. कोरोना विषाणूच्या फैलावाची साखळी परिणामकारक पद्धतीनं तोडण्यासाठी
हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत. या काळात सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद राहील,
तसंच अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद राहील. किराणा दुकान, भाजी, फळ विक्री
सकाळी सात ते ११ या वेळेतच सुरु राहतील.
दरम्यान, हे सर्व निर्बंध जनतेच्या आरोग्यासाठीच लावण्यात आले असून, जनतेनं सहकार्य
करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. एक मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असली तरीही
लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम सुरु करता येत नाही, एकत्रित २० ते २५ लाख मात्रा जेव्हा
राज्याला प्राप्त होतील, तेव्हाच १८ ते ४४ वयोगटाला लस देता येईल, असं टोपे यांनी सांगितलं.
ते म्हणाले –
पर्चेस ऑर्डर ही तीन लाख लसींची फक्त ती कोविशिनची
आलेली आहे. आणि त्यामुळे आता तीन लाख लस म्हणजे महाराष्ट्रासाठी एका दिवसाचा विषय आहे.
मग आपण एक मे रोजी सुरू करायची आणि परत थांबून टाकायचं का हा महत्वाचा विषय आहे. म्हणून
त्याच्यामधे सातत्य असलं पाहिजे. आणि त्यामधे सुध्दा मॉडेलिटीज ठरवाव्या लागतील की
एकदम १८ ते ४४ एकाच वेळेस सगळ्यांना जाऊ द्यायचं का? एक व्यवस्थित नियमावली खऱ्या अर्थाने
निर्गमित करण्यात येईल. त्यानंतर एक अतिशय शिस्तबध्द पद्धतीनं १८ ते ४४ वयोगटासाठी
लसीकरण करण्याचा मानस हा सरकारचा आहे.
****
राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी
काल कोविड परिस्थितीसंदर्भात राज्यातले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त
यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांनी
कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक
औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, निर्बंधाच्या काळात दुर्बल
घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे त्यांना तात्काळ लाभ द्यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता, आवश्यक औषधी आणि संसाधनांचा साठा जिल्ह्यातल्या
कानाकोपऱ्यात होईल, याचंही चांगलं नियोजन करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केल्या.
****
भारत बायोटेक आणि सिरम या लस उत्पादक कंपन्यांनी राज्य सरकारांसाठी लसीच्या एका
मात्रेची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीच्या किमतीत
२०० रुपये कपात करुन, ती आता ४०० रुपये निश्चित केली आहे. तर सीरम कंपनीनं कोव्हिशिल्ड
लसीच्या एका मात्रेची किंमत शंभर रुपये कमी करुन, ३०० रुपये निर्धारित केली आहे. सार्वजनिक
आरोग्य व्यवस्थेचा विचार करता दरात घट केल्याचं, भारत बायोटेकनं म्हटलं आहे. या दोन्ही
कंपन्यांनी खासगी रुग्णालयांसाठीच्या दरात कोणतेही बदल केले नाही.
****
‘पी एम केअर्स’ निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. याची
लवकरात लवकर पूर्तता करून, रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा,
अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे.
****
उद्या साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ
कोरोना विषाणू संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्यात यावा,
अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेनं केल्या आहेत. या संबंधी
कार्यक्रमात सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश
यात आहेत.
****
राज्यात मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री
सहाय्यता निधीसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमधले
काँग्रेसचे सदस्य, एक महिन्याचं वेतन देणार आहेत. तर, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते
आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, त्यांचं एक वर्षाचं मानधन, असा सुमारे दोन
कोटी रुपयांचा निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे. तसंच यांच्या
सहकारी उपक्रमांमधे काम करणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्याचं लसीकरण शुल्क द्यायचंही थोरात
यांनी ठरवलं आहे. प्रदेश काँग्रेस पाच लाख रुपयांची देणगी देणार आहे, तर काँग्रेसचे
अनेक कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरणाचं शुल्क, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
जमा करणार आहेत.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा
झाली असून त्यांना दिल्लीतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच आलं असल्याचं त्यांची
नात रुद्राली पाटील चाकूरकर यांनी सांगितली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री
पंकजा मुंडे यांनाही या संसर्गाची लागण झाली आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती
देताना त्यांनी, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचं नमूद केलं. काँग्रेसचे राज्यसभा
खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गावर
उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं राज्यमंत्री
विश्र्वजित कदम यांनी काल सांगितलं. त्यांना गेल्या पंचवीस तारखेला प्राणवायुची पातळी
खालावल्यानं जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
राज्यात काल ६६ हजार १५९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली आहे. काल ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६७ हजार ९८५ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ६८ हजार ५३७ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८३ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ७० हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सात हजार ४०३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३४
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी
२१, लातूर ३१, नांदेड २४, उस्मानाबाद १८, जालना आठ, हिंगोली सहा, तर बीड जिल्ह्यातल्या
पाच रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ६१ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ४७०, परभणी
एक हजार २६५, लातूर एक हजार १३४, नांदेड ८१६, उस्मानाबाद ७८३, जालना ६७७, तर हिंगोली
जिल्ह्यात १९७ नवे रुग्ण आढळून आले.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध,
अकोला शहरातल्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात
आला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह विविध २२ कलमान्वये, हा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी कोट्यवधी
रुपयांचा भ्रष्टाचार केला, तसंच जातीवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
भिमराज घाडगे यांनी, पोलिस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे
केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्य शासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या
विरोधात, सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार आपली
मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप, त्यांनी या याचिकेत केला आहे. १९ एप्रिलला आपण पोलीस
महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली होती, त्यावेळी सरकार आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या
तक्रारी दाखल करणार असल्याचं, त्यांनी आपल्याला सांगितलं, तसंच माजी गृहमंत्री अनिल
देशमुख यांच्यावर आरोप करणारं आपलं पत्र मागे घ्यावं, असा सल्ला पांडे यांनी दिला होता,
असंही सिंग या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर मागितलं
असून, या याचिकेची सुनावणी येत्या चार मे रोजी होणार आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित पदवी आणि पदव्युत्तर
‘ऑनलाईन’ परीक्षेसाठी, काल झालेल्या पहिल्या चाचणी परीक्षेला, ६५ हजार ४९४ विद्यार्थी
उपस्थित राहिले. येत्या दोन मे पर्यंत ही चाचणी घेण्यात येणार आहे. पदवीची उर्वरित
मुख्य परीक्षा तीन मे पासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा पाच मे पासून सुरु
होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात महाविद्यालय समन्वयकांशी संपर्क साधण्याचं
आवाहन, परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज,
हवामान विभागानं व्यक्त केला आहे. काल उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी तीन वाजेच्या सुमारास
काही काळ पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही काल ढगाळ वातावरण होतं.
****
परभणी महापालिकेचे कर्मचारी कोविड प्रादुर्भावाच्या कार्यकाळात आघाडीवर राहून कार्यरत
असल्यामुळे, या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांचं विमा कवच देण्यात यावं, अशी मागणी
महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.
के. आंधळे यांनी, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांना, या मागणीचं निवेदन सादर
केलं. कार्यरत कर्मचाऱ्याला हा संसर्ग झाल्यास त्याला तात्काळ २५ हजार रुपये मदत देण्यात
यावी, आणि त्याला प्राणवायू, रेमडीसिव्हीर इंजेक्शन आदी उपचारांसाठी, दहा टक्के आरक्षण
देण्यात यावं, असंही संघटनेनं म्हटलं आहे.
****
नांदेडचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी
त्रिसुत्रीचं पालन करण्याचं, आणि लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मित्रांनो, कोरोना या रोगावर अद्याप गुणकारी असं कोणतचं
प्रभावी औषध नाहीये. महत्वाचं काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नका आणि बाहेर
जाण्याची वेळ आलीचं तर किमान सहा फुटापेक्षा जास्त अंतर हे समोरच्या व्यक्तीपासून ठेवा
आणि नेहमी आपण योग्य प्रकारच्या मास्कचा वापर करा. आणि वारंवार आपले हात आणि तोंड साबणाने
धुवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण
करुन घ्या, इतकीच माझी आपल्याला विनंती आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारनं आगामी खरीप हंगामाची
पूर्व तयारी लवकर करावी अशी मागणी, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. आगामी खरीप
हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून, राज्य शासनाने वेळेवर
पेरणी होण्याच्या दृष्टीनं, पिक कर्ज वाटप, दर्जेदार बियाणे, खते बाजारात उपलब्ध करून
द्यावेत, पिक विमा नोंदणी, मागील पिक विम्याची नुकसान भरपाईचे पैसे, शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावेत, आदी मागण्या चिखलीकर यांनी एका निवेदनाद्वारे
केल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्णांचा वाढता मृत्यूदर, तज्ञांची कमतरता लक्षात घेऊन,
टेली आयसीयू सुविधा पुन्हा कार्यान्वित करावी अशी मागणी, आमदार राणा जगजितसिंह पाटील
यांनी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे. गतवर्षी कोविडच्या पहिल्या
लाटेदरम्यान, रुग्णांसाठी क्लाऊड फिजिशियन हेल्थकेअर या कंपनीच्या माध्यमातून, आणि
कंपनी दायित्व निधी-सीएसआरच्या मदतीनं, जिल्हा सामान्य रूग्णालयात ही सेवा कार्यान्वित
करण्यात आली होती, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथंल्या कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात जनरेटर सुविधा
तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी
केली आहे. पालकमंत्री नवाब मलीक, आमदार सुरेश वरपुडकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक
मुगळीकर यांच्याकडे त्यांनी हा मागणी केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी या गावी, जिल्हा परिषद शाळे शेजारी
होणाऱ्या अंगणवाडी खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार, आमदार मेघना
बोर्डीकर यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित अंगणवाडी बांधकामासाठी
वर्ग केलेला निधी अधिकाऱ्यांनी उचलला असून, बांधकाम मात्र सुरु केलं नाही, असं त्यांनी
तक्रारीत नमूद केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या काजळा इथल्या सरपंचाचा पती आणि ग्रामपंचायत
सदस्य रंगनाथ सुभाष देवकाते याला, पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या अनुदानाचा हप्ता
लाभार्थाच्या खात्यावर जमा करण्यासाठी, २० हजार रुपयांची लाच घेतांना, लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं अटक केली. तक्रारदाराच्या एक लाख २० हजार रुपयांपैकी, १५ हजार रुपयांचा पहिला
हप्ता जमा झाला होता. दुसरा हप्ता ४५ हजार रुपये खात्यावर जमा करण्यासाठी, ३० हजार
रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीनं केली होती.
****
मध्य रेल्वे विभागात कल्याण-कसारा दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे, नांदेड
विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामधे सिकंदराबाद
- मुंबई आणि मुंबई - सिकंदराबाद धावणारी देवगिरी विशेष गाडी एक मे रोजी रद्द करण्यात
आली आहे, तर आदिलाबाद - मुंबई आणि मुंबई - आदिलाबाद विशेष गाडी आज रद्द करण्यात आली
आहे. नांदेड - मुंबई तपोवन विशेष गाडी दोन मे रोजी रद्द करण्यात आल्याची माहिती, दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment