आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंह यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी
देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, देशमुख यांच्या मुंबईतल्या
विविध मालमत्तांवर सीबीआयनं आज छापे मारले.
****
ज्येष्ठ भारूडकार निरंजन
भाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राच्या
भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा
लोककलावंतास आपण मुकलो आहोत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाकरे
यांचं काल कोविड संसर्गानं निधन झालं, ते ५६ वर्षांचे होते.
****
राष्ट्रीय पंचायत राज दिवस आज साजरा होत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंचायती राज दिवसाच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. भारतासारख्या विशाल देशात पंचायत राज संस्था गरजु आणि गरीबांपर्यंत
पोहोचण्यासाठी उत्तम माध्यम असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
पोलँड
इथं झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या अल्फिया पठाण हिनं
सुवर्णपदक पटकावलं. अल्फियानं देशाची मान उंचावली असल्याचं सांगून, क्रीडा आणि युवक
कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तिचं अभिनंदन केलं. अल्फियाला शासनाकडून तीन लाख रोख
रक्कम पुरस्कार देण्याकरता प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना विभागाला दिल्या असून, भावी
स्पर्धांच्या सरावासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं, केदार यांनी
सांगितलं.
****
येत्या
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी असलेलं सोयाबीन बियाणे उगवणशक्ती तपासूनच
पेरणीसाठी वापरण्याचं आवाहन उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलं
आहे. लोहारा तहसील कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
मराठवाड्यात काल आठ हजार ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर १७३ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४९६ रुग्ण आढळले.
****
No comments:
Post a Comment