Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
April 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी
साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
**
`पीएम केअर्स` निधीतून एक लाख प्राणवायू यंत्र खरेदीला पंतप्रधानांची मंजुरी
**
राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना
**
औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे २३ रुग्णांचा मृत्यू
आणि
**
मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांचं एक महिन्याचं वेतन
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी `पी एम केअर्स` निधीतून एक लाख हाताळण्यायोग्य प्राणवायू यंत्र
खरेदीला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय प्राणवायू पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. याची लवकरात
लवकर पूर्तता करून रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा अशी सूचना
पंतप्रधानांनी केली आहे. देशातल्या कोरोना विषाणू संसर्ग स्थितीविरोधात लढा देण्यासाठी
भारताच्या लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचाही पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काल आढावा घेतला. यासंदर्भात पंतप्रधानांनी सैन्य दलाचे प्रमुख जनरल मनोज
नरवणे यांच्यासोबत चर्चा केली. सैन्य दलाच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी तात्पुरती
रुग्णालयं उभारली जात असल्याची माहिती जनरल नरवणे यांनी यावेळी पंतप्रधानांना दिली.
****
राज्याचं
उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसंच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी
`महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक` या `वेब पोर्टल`चा निश्चितच उपयोग
होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा
कल लक्षात येईल, असंही त्यांनी या `वेब पोर्टल`चं लोकार्पण करताना आज नमुद केलं. नियोजन
विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी महासंचालनालय आणि उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीनं
याची निर्मीती करण्यात आली आहे. राज्यातली कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी
निर्बंध लावण्यात आले असल्यानं या कालावधीत सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य
सरकारनं साडे पाच हजार कोटी रुपयांच्या मदतीची तरतुद केली असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
या पोर्टलच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातलं राज्याचं निश्चित स्थान आपल्याला समजणार
असल्याचं तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे उद्योग विभागाचे अधिकारी यावर आवश्यक
माहिती देतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.
****
परवा-
शनिवारी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन समारंभ
कोरोना संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्यात यावा, अशा सूचना
सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेनं केल्या आहेत. या संबंधी कार्यक्रमात
सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश यात आहेत.
जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी आठ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावं. औरंगाबाद
तसंच अन्य विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभाकरता योग्य ती व्यवस्था करावी.
तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये, अशा सूचनाही
देण्यात आल्या आहेत. दरम्यान, परभणी इथं मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री
नवाब मलिक यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या २३ रुग्णांचा
मृत्यू झाला. यामध्ये १६ रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यातले असून बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातले
प्रत्येकी दोन तर अहमदनगर इथल्या तीन रुग्णांचा मृतांत समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात
आतापर्यंत दोन हजार ४८० रुग्ण या विषाणू संसर्गानं दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण
रुग्णांची संख्या एक लाख २१ हजार ८८० झाली आहे.
****
माजी
मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणुच्या संसर्गाची
लागण झाली आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून याची माहिती देताना त्यांनी त्यांच्यावर
घरीच उपचार सुरू असल्याचं नमुद केलं आहे. अलिकडच्या काळात संपर्कात आलेल्यांनी संसर्गासाठी
चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.
****
मुंबईचे
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यात सिटी
कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमासह
विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना
परमबीर सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक
भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडे
केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रारही घाडगे यांनी दिली
आहे.
****
राज्यात
मोफत लसीकरणाला मदत म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता
निधीसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे. विधानसभा आणि
विधानपरिषद
या दोन्ही सभागृहांमधले काँग्रेसचे सदस्य एक महिन्याचं वेतन देणार आहेत. तर, काँग्रेस
विधीमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं एक वर्षाचं
मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सहकारी उपक्रमांमधे
काम करणाऱ्या ५ हजार कर्मचाऱ्याचं लसीकरण शुल्क द्यायचंही थोरात यांनी ठरवलं आहे. प्रदेश
काँग्रेस ५ लाख रुपयांची देणगी देणार आहे. तर, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या
कुटुंबियांच्या लसीकरणाचं शुल्कं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत.
****
खासदार
इम्तियाज जलील यांनी आज आपल्या निधीतून चार हजार सलाईन बाटल्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय
रुग्णालय- घाटीच्या प्रशासनाला दिल्या आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या गोर गरिब रुग्णांना
याचा लाभ होईल असं जलील यांनी म्हटलं आहे.
****
नांदेडचे
माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आणि लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मित्रांनो,
कोरोना या रोगावर अद्याप गुणकारी असं कोणतचं प्रभावी औषध नाहीये. महत्वाचं काम असल्याशिवाय
आपण घराच्या बाहेर पडू नका, आणि बाहेर जाण्याची वेळ आलीचं तर किमान सहा फुटापेक्षा
जास्त अंतर हे समोरच्या व्यक्तीपासून ठेवा आणि नेहमी आपण योग्य प्रकारच्या मास्कचा
वापर करा, आणि वारंवार आपले हात आणि तोंड साबणाने धुवा आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या
जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्या. इतकीच माझी आपल्याला विनंती
आहे.
****
परभणी
महापालिकेचे कर्मचारी कोविड प्रादुर्भावाच्या कार्यकाळात आघाडीवर राहून कार्यरत असल्यामुळे
या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांचं विमा कवच देण्यात यावं, अशी मागणी महापालिका
अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे यांनी
महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. कार्यरत कर्मचाऱ्याला
हा संसर्ग झाल्यास त्याला तात्काळ २५ हजार रुपये मदत देण्यात यावी आणि त्याला प्राणवायू,
रेमडीसिव्हीर इंजेक्शन आदी उपचारांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात यावं असंही संघटनेनं
म्हटलं आहे.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित पदवी आणि पदव्युत्तर `ऑनलाईन` परीक्षेसाठी
आज झालेल्या चाचणीला ६५ हजार ४९४ विद्यार्थी उपस्थित राहिले. येत्या २ मेपर्यंत ही
चाचणी घेण्यात येणार आहे. पदवीची उर्वरित मुख्य परीक्षा तीन मे पासून तर पदव्यूत्तर
अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संदर्भात महाविद्यालय
समन्वयकांशी संपर्क साधण्याचं आवाहन परीक्षा आणि मुल्यमापण मंडळाचे संचालक डॉ.योगेश
पाटील यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उद्या वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात दुपारी तीन
वाजेच्या सुमारास काही काळ पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही ढगाळ वातावरण होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बोरी या गावी जिल्हा परिषद शाळे शेजारी होणाऱ्या
अंगणवाडी खोलीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार आमदार मेघना बोर्डीकर
यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित अंगणवाडी बांधकामासाठी वर्ग केलेला निधी
अधिकाऱ्यांनी उचलला असून बांधकाम मात्र सुरु केलं नाही, असं त्यांनी निदर्शनास आणून
दिलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment