Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01
April 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय रस्ते
वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसंच
राज्य महामार्गांच्या कामांसाठी, दोन हजार ७८० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
त्यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग
७५३ जे च्या विस्तारीकरणासाठी, २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या
येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी, १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात
आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल. तसंच राष्ट्रीय महामार्ग ३६१
एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी, २२२ कोटी ४४ लाख रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग
७५२ वर जालना परभणी दरम्यान वाटूर ते चारठाणा रस्त्याच्या दुहेरीकरणासाठी २२८ कोटी
मंजूर करण्यात आले असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
अभिनय क्षेत्रातला
प्रतिष्ठीत ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रसिद्ध सिने अभिनेते रजनीकांत यांना जाहीर
झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ही घोषणा केली.
रजनीकांत यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं असल्याचं,
जावडेकर यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. रजनीकांत यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी,
बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे.
****
४५ वर्षांवरील सर्व
नागरिकांना आजपासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. यासाठी नागरिकांनी
कोविन ॲप वर नोंदणी करावी, किंवा दुपारी तीन वाजेनंतर नजिकच्या लसीकरण केंद्रावर ओळखपत्र
दाखवूनही नागरीकांना लसीकरणासाठी नोंदणी करून, लस घेता येणार आहे.
****
देशात आतापर्यंत
सहा कोटी ४३ लाख नागरिकांचं कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं. देशव्यापी लसीकरणाच्या
७५ व्या दिवशी काल १३ लाख चार हजार ४१२ जणांचं लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान, देशात
काल नव्या ७२ हजार ३३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४५९ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी
२२ लाख २१ हजार ६६५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ६२ हजार ९२७ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. काल ४० हजार ३८२ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी १४ लाख
७४ हजार ६८३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या पाच लाख ८४ हजार ५५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
अमरनाथ यात्रेसाठी
आजपासून नोंदणी सुरु झाली. सरकारनं जाहीर केलेल्या कोविड - 19 नियमवालीनुसार ही यात्रा
पार पडणार आहे. नोंदणी करताना यात्रेकरुंना आरोग्य दाखला जोडणं बंधनकारक आहे. या यात्रेत
१३ वर्षांखालील मुले, तसंच ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि सहा
आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गर्भवतींना सहभागी होता येणार नाही. २८ जून ते २२
ऑगस्ट दरम्यान ही यात्रा चालणार आहे.
****
२०२६ पर्यंत अर्थात
पुढील पाच वर्षे देशातला किरकोळ महागाईचा दर चार टक्के ठेवावा, असं केंद्र सरकारनं
काल भारतीय रिझर्व्ह बँकेला सांगितलं आहे. किरकोळ बाजारातल्या महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी,
२०१६ मध्ये केंद्र सरकारनं हेच दर राखणं आरबीआयला अनिवार्य केलं होतं, ही मुदत काल
संपली. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी याबाबत काल माहिती दिली. २०२१ - २२ या
आर्थिक वर्षांत कोरोना संकटकाळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी पहिल्या
सहा महिन्यांत केंद्र सरकार सात पूर्णांक २४ लाख कोटी रुपयांचं कर्ज घेणार आहे, असंही
बजाज यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेडच्या प्रसाद
वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे २०१९ - २० चे पुरस्कार काल जाहीर झाले. सर्वोत्कृष्ट
पुस्तकाकरता देण्यात येणाऱ्या प्रसाद बन वांङमय पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत
सासणे यांच्या 'दाट काळा पाऊस' या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. मातुश्री पद्मिनीबाई
बन साधना सन्मान पुरस्कार कथाकार भास्कर चंदनशिव यांना, प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय
पुरस्कार 'गंध आणि काटे' या कथासंग्रहाला, स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार डॉ. श्रीनिवास
पांडे यांच्या 'मराठीतील हरिश्चंद्राख्याने : एक अभ्यास' या संशोधनपर ग्रंथाला, प्रसाद
बन ग्रंथगौरव पुरस्कार नायगाव इथले कवी वीरभद्र मिरेवाड यांच्या 'माती शाबूत राहावी
म्हणून...' ह्या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष
डॉ. अच्युत बन आणि वाङमय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी काल नांदेड
इथं या पुरस्कारांची घोषणा केली. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार घरपोच पाठवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मध्य रेल्वेच्या
भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं कार्य पूर्ण करण्याकरता ब्लॉक
घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष गाडीच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात
आल्या आहेत. ही गाडी आठ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment