Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 April 2021
Time 7.10AM to 7.25AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ एप्रिल २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा
उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण
करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब
करा आणि सुरक्षित रहा.
****
·
प्राणवायू तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी
राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.
·
कोविड लसींचा राज्याला शाश्वत तसंच नियमित पुरवठा होण्याची गरज
मुख्यमंत्र्याकडून व्यक्त.
·
राज्यातल्या सुमारे १९० साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती
आणि पुरवठा करण्याचे वसंतदादा साखर संस्थेचे निर्देश.
·
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर तसंच प्रसिद्ध भारुडकार
निरंजन भाकरे यांचं निधन.
·
राज्यात नवे ६६ हजार ८३६ कोविडरुग्ण; मराठवाड्यात १७३ रुग्णांचा
मृत्यू तर नव्या आठ हजार ९३ रुग्णांची नोंद.
·
लातूर तसंच औरंगाबाद इथली बहुतांश कोविड लसीकरण केंद्र आज बंद.
आणि
·
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा
तीन मेपासून, तर पदव्युत्तर परीक्षा पाच मेपासून सुरू होणार.
****
प्राणवायू
तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी ठोस पावलं उचलण्याचे
निर्देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. कोविड संसर्ग अत्याधिक असलेल्या
दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून
संवाद साधला, त्यावेळी हे निर्देश दिले. या चर्चेत महाराष्ट्रासह, दहा राज्यांचे मुख्यमंत्री
सहभागी झाले होते. सर्व राज्यांमध्ये प्राणवायूची वाहतुक विनाव्यत्यय, तसंच कमीत कमी
वेळेत होत असल्याचं राज्य सरकारांनी सुनिश्चित करावं, या टँकर्सना रस्त्यात कुठेही
अडवलं जाऊ नये, असं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करेल,
असं आश्वासन, त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिलं. सर्व राज्यांनी एकत्र येवून काम
केल्यास, कोणत्याही संसाधनाचा तुटवडा भासणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ऑक्सिजनची
निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही, पंतप्रधानांनी चर्चा केली. वैद्यकीय
वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धतेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
दरम्यान,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बोलताना, महाराष्ट्राला अधिक प्राणवायूची
गरज असून, रेमडीसीवीरचा पुरेसा पुरवठा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशात कोविड
लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर असून, कोविड लसींचा राज्याला शाश्वत तसंच नियमित पुरवठा
होण्याची गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी, राज्याला बाहेरील देशातून लस आयात करून
लसीकरण करता येईल का, असा प्रश्न विचारला. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्रात दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे, मात्र अर्थचक्राला झळ
बसू नये याची देखील काळजी घेत आहोत, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.
****
पालघर
जिल्ह्यात विरार इथल्या, विजय वल्लभ रुग्णालयातल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख, आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये
मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण
निधीतून, मृतांच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये
मदत जाहीर केली आहे.
****
नाशिकमधल्या
प्राणवायु गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयानं स्वत:हून दखल घेत,
राज्य सरकारकडून घटनेची माहिती देणारा अहवाल मागवला आहे. चार मे पर्यंत हा अहवाल सादर
करायचा असून, त्यात या दुर्घटनेमागील कारणांचं स्पष्टीकरण असावं, असे आदेश न्यायालयानं
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना दिले आहेत.
****
अहमदाबाद
इथल्या झायडस कॅडिला कंपनीच्या विराफीन या कोविडवरील औषधाच्या आपत्कालीन वापराला राष्ट्रीय
औषध महानियंत्रक - डीजीसीआयनं परवानगी दिली आहे. या औषधाची एक मात्रा घेतल्यानंतर कोविडबाधित
रुग्ण सात दिवसांत कोविडमुक्त होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
****
रुग्णालयात
उपचार घेत असलेल्या १८ वर्षांवरील कोविड बाधित रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी, आरोग्य
मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लक्षणं दिसू लागल्यावर दहा
दिवसांच्या आत, प्राणवायूची आवश्यकता भासणाऱ्या, मध्यम ते गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांनाच,
रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचा विचार करावा, असं या सूचनेत म्हटलं आहे. मूत्राशय किंवा
यकृताचे गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना, तसंच प्राणवायू पुरवठ्याची आवश्यकता नसलेल्या
रुग्णांना, हे इंजेक्शन दिलं जाऊ नये, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.
****
केंद्र
सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पुढच्या दोन महिन्यांसाठी, गरीबांना मोफत
धान्य मिळणार आहे. मे आणि जून महिन्यात या लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो धान्य
मिळेल, सुमारे ८० कोटी नागरिकांना याचा लाभ होईल.
****
राज्यातल्या
सुमारे १९० साखर कारखान्यांना प्राणवायू निर्मिती आणि पुरवठा करण्याचे निर्देश, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा वसंतदादा साखर संस्थेचे अध्यक्ष, शरद पवार यांनी दिले
आहेत. यासंदर्भात साखर संस्थेच्या वतीनं सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं
आहे. ज्या कारखान्यांचे सहवीजनिर्मिती तसंच आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत, अशा प्रकल्पांमध्ये,
वैद्यकीय प्राणवायूचं उत्पादन करावं, ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे, अशा
कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी प्राणवायू संचाचा पुरवठा, रुग्णांना अथवा
कोविड केंद्राला करावा, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य
सरकारांनाही केंद्राच्याच दरानं कोविड लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. कोविडची लस केंद्र सरकारला अवघ्या १५०
रूपयांत मिळत असून, हीच लस राज्यांना ४०० रूपयांत खरेदी करावी लागणार आहे. १८ ते ४५
या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं राज्यांवर टाकली
आहे, त्यामुळे राज्यांना स्वस्त किंवा किमान केंद्र सरकारच्याच दरात लस मिळणं आवश्यक
आहे, असं चव्हाण यांनी नमूद केलं.
****
ज्येष्ठ
शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.अरुण निगवेकर यांचं काल
पुण्यात मेंदूविकारानं निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. निगवेकर हे सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि नॅकचे संस्थापक अध्यक्ष होते.
****
मराठवाड्याचे
प्रसिद्ध लोककलावंत भारुडकार निरंजन भाकरे यांचं काल कोविड संसर्गानं निधन झालं, ते
५६ वर्षांचे होते. ‘बुरगुंडा’ हे त्यांचं भारुड विशेष लोकप्रिय होतं. भाकरेंनी आपल्या
भारुड सादरीकरणातून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसं मिळवली. मुंबई
विद्यापीठाच्या लोककला अकादमीतल्या विद्यार्थ्यांनाही, त्यांनी भारुडाचं प्रशिक्षणही
दिलं होतं.
****
राज्यात
काल ६६ हजार ८३६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६ झाली आहे. काल ७७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६३ हजार २५२ झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. काल ७४ हजार ४५ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ८१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
सहा लाख ९१ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल आठ हजार ९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १७३ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २७, बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या
प्रत्येकी २८, लातूर २६, परभणी २५, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी १६,
तर हिंगोली जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एक हजार ४९६ रुग्ण आढळले. लातूर एक हजार ४७८, नांदेड आणि बीड जिल्ह्यात
प्रत्येकी एक हजार २१०, परभणी ९४३, जालना ८०९, उस्मानाबाद ७१९, तर हिंगोली जिल्ह्यात
२२८ नवे रुग्ण आढळून आले.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या दुसऱ्या आवृत्ती कार्यक्रम शृंखलेचा हा २३ वा
भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी च्या सर्व वाहिन्यांवरुन हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
उस्मानाबादचे खासदार ओमराजे
निंबाळकर यांनी, काल तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास
भेट दिली. तपासणीस येणाऱ्या रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा, औषधोपचार याचा त्यांनी
आढावा घेतला. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात
सुरु करण्यात यावी, घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे रुग्णांवर लवकर
उपचार करता येतील, असं ते म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्याला दहा हजार
रेमडेसीविर इंजेक्शनाचा साठा उपलब्ध झाला आहे. त्या पैकी ९६० इंजेक्शन काल मिळाले असून,
उर्वरीत टप्याटप्यानं मिळणार असल्याचं, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलं.
जिल्ह्यात सद्यस्थितीत प्राणवायूचा मुबलक साठा उपलब्ध असून, यापुढेही त्यात कमतरता
भासणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन तसंच पालकमंत्री वर्षा गायकवाड पूर्ण क्षमतेनं
काम करत असल्याची माहिती, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री
अमित देशमुख यांनी काल लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या, २७ गावांचे सरपंच आणि सदस्य,
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार, गटविकास अधिकारी, यांच्याशी दुरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दक्ष
रहावं, गावात स्वयंशिस्त पाळावी, कोरोना विषाणू विरोधी पथकाच्या माध्यमातून मार्गदर्शन
सूचनांचं पालन करावं, गृहविलगीकरण शास्त्रोक्त पध्दतीने राबवावं, असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं.
****
लातूर जिल्ह्यात कोविड बाधित
रुग्णांस पुरवठा करण्यात येत असलेल्या प्राणवायूबाबत, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी
काल आढावा बैठक घेऊन, संबधितांना आवश्यक सूचना केल्या. जिल्ह्यात विजया, शारदा तसंच
नाना एजेन्सी मार्फत प्राणवायू पुरवठा होत आहे. बनसोडे यांनी या प्रकल्पांना प्रत्यक्ष
भेट देऊन पाहणी केली
****
दरम्यान, लातूर महापालिकेकडच्या
कोविड लसीच्या सर्व मात्रा संपल्यामुळे आज महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार
आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
आता
आपण ‘बीट द व्हायरस’ या कँपेनअंतर्गत लातूरमधे अनेक ठिकाणी लसीकरणाची केंद्र सुरू केलेली
आहेत. कालपर्यंत ५० हजार लातूरकरांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. शहरातील सर्वच लसीकरण
केंद्र ही आपल्याला नाईलाजाने बंद ठेवावी लागली आहेत. कारण केवळ २८० लस आपल्याकडे उपलब्ध
होत्या आणि एका सेंटरवरतीच आपण हे काम करतोय. आणि आत्ता तो सुध्दा साठा हा संपलेला
आहे. त्यामुळे आज लातूर महापालिकेकडे कुठलाही लसीचा साठा नाहीये. माझी अपेक्षा आहे
की लवकरात लवकर आपल्याला लस उपलब्ध होईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नागरिकांना
या लसीकरणाचा लाभ घेऊन देता येईल.
****
औरंगाबाद महापालिकेच्या ११५
प्रभागातल्या लसीकरण केंद्रांपैकी आज फक्त आठ केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार आहे. लसींचा
साठा संपत आल्यानं, उर्वरित केंद्रं आज बंद राहतील. महापालिकेने सरकारकडे कोविड लसीच्या
सुमारे पावणे दोन लाख मात्रांची मागणी केली आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागानं
दिली आहे.
****
आंतरजिल्हा
आणि आंतरराज्य प्रवास बंदीच्या आदेशानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या सातही प्रवेश सीमा
पोलिस विभागानं बंद केल्या आहेत. तसंच अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची
कसून तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्हयात
प्रवासासाठी नागरिकांसाठी, ई - पासची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोविड
१९ डॉट एम एच पोलिस डॉट इन या संकतेस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचं आवाहन, पोलिस
आयुक्त आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
*****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात येत
आहे. यामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या भराडी इथले दोन, पैठण इथं पाच आणि बिडकीन इथं चार,
असे अकरा जण कोविड बाधित आढळून आले. विनामास्क फिरणाऱ्या १८८ नागरिकांना ४९ हजार २००
रूपये, आणि वाहनधारकांना ३२ हजार २०० रुपये दंड ठोठावल्याचं, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या
वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
परभणी
इथं काल विनामास्क फिरणाऱ्या १६७ नागरिकांना, ३३ हजार ४०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
विनामास्क ये-जा करणाऱ्या कार, दुचाकी, जीप आदी वाहनधारकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात
आली.
*****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उर्वरित परीक्षा
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. पदवी परीक्षा तीन मेपासून, तर पदव्युत्तर परीक्षा
पाच मेपासून सुरू होतील. विद्यापीठानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. या ऑनलाईन परीक्षांसाठी
आयटी कोऑर्डिनेटरची संख्या दुपटीनं वाढवण्यात येणार आहे. कोणीही विद्यार्थी ऑनलाइन
परीक्षेपासून वंचित राहणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याचं तांत्रिक अडचणीमुळे शैक्षणिक
नुकसान होणार नाही, याची काळजी संबधित महाविद्यालयांनी घ्यावी, असं आवाहन कुलगुरू डॉ
प्रमोद येवले यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद
शहरानजिक असलेल्या शेंद्रा इथल्या श्री मांगीरबाबाची यात्रा, सलग दुसऱ्या वर्षी रद्द
करण्यात आली आहे. श्री क्षेत्र मांगीरबाबा देवस्थान समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे
ही माहिती देण्यात आली. मंदीर बंद असल्यानं भाविकांनी दर्शनासाठी येवू नये, असं आवाहनही
देवस्थान समितीनं केलं आहे.
****
हनुमान
जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा करावा, असं आवाहन गृह विभागानं
केलं आहे. यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, मिरवणुका वगैरे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक
कार्यक्रमांचं सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये, असं गृहविभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक
सूचनांमध्ये म्हटलं आहे. शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी,
असंही या आदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात खुलताबाद इथलं भद्रा मारुती मंदीर हनुमान जयंतीला भाविकांसाठी बंद राहणार
आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असं मंदीर व्यवस्थापनानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment