Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 September 2021
Time 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील
सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की,
त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं
काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
शाळा उघडण्याबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
·
मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर
कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप
तर हा राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचं, हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
·
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रजनी पाटील यांना तर भारतीय जनता पक्षाची
संजय उपाध्याय यांना उमेदवारी
·
राज्यात दोन हजार, ५८३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात पाच रुग्णांचा मृत्यू
तर १२१ बाधित
·
कोविड लसीची एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रवेशाला मनाई
आणि
·
मराठवाड्यात अनेक भागात पाऊस
कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेतील, त्यांच्या
निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड महामारीमुळे
बंद असलेल्या देशभरातल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत राज्यांनी विशिष्ठ कालावधीत
निर्णय घ्यावा, याबाबत न्यायालयानं आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतल्या
एका विद्यार्थ्यानं केली आहे. त्यावर न्यायालयानं आपलं मत मांडलं. कोविडची स्थिती प्रत्येक
राज्यात वेगळी आहे, रुग्णवाढ विचारात घेऊन त्यानुसार खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं
असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विद्यार्थ्याने जनहित याचिका दाखल करण्याऐवजी स्वत:च्या
अभ्यासावर लक्ष द्यावं, असा सल्लाही खंडपीठानं यावेळी दिला.
****
स्वातंत्र्यदिनाच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबई इथं दोन दिवसीय
राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सव' परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसंच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या परिषदेत राज्यातली निर्यात संधी,
पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य या शिवाय खाद्य, कापड, इंजिनिअरिंग, केमिकल
आणि औषध निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी या विषयातल्या संधी, यावर चर्चासत्रे घेण्यात
येणार आहे. विविध क्षेत्रातले २०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
राज्यातल्या
महिलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष कार्यक्रम राबवणार
असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुढच्या दोन वर्षांत यासंदर्भात
मोठा बदल घडवून येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. सध्याचं केंद्र सरकार दडपशाही करणारं
सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा राजकीय सूडबुद्धीने
होणारा वापर लोकशाहीसाठी घातक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्य सरकारमधले
मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटी
रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोल्हापूरला
जाणाऱ्या सोमय्या यांना सातारा जिल्ह्यात कराड इथं पोलिसांनी रोखलं, त्यावेळी कराड
इथं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुश्रीफ यांच्या विरोधातले सर्व पुरावे
सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाला देणार असून, त्यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस
आणणार असल्याचं सोमय्या म्हणाले.
दरम्यान, सोमय्या
यांचे आरोप पूर्णत: खोटे असून, हा राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचं, हसन मुश्रीफ यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
****
काँग्रेसनं राज्यसभा
निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी या नावाला मंजुरी दिल्याचं सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी प्रसिद्धीस
दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तर भारतीय जनता पक्षानं मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय
यांना उमेदवारी दिली आहे. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक
होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करायचा उद्या अखेरचा दिवस असून ४ ऑक्टोबरला मतदान आणि
मतमोजणी होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १२वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन
कार्यपद्धतीनुसार, २४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी या निकालावरील
आक्षेप अथवा तक्रारी, २५ सप्टेंबर पर्यंत विहित अर्जाच्या नमुन्यात दाखल कराव्या, असं
मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
राज्यात काल
दोन हजार, ५८३ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ६५ लाख, २४ हजार, ४९८ झाली आहे. काल २८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३८ हजार ५४६
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ८३६ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ४१
हजार, ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल १२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात
काल ४९ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ३५, औरंगाबाद १६, लातूर १५, परभणी तीन, नांदेड
दोन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
कोविड लसीची
एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाला मनाई
करण्याचा निर्णय, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव वाढू नये, आणि लसीकरणासाठीच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळावा,
या हेतूनं हा निर्णय घेतल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयानुसार आता परभणी जिल्हाधिकारी
कार्यालयात प्रवेशासासाठी लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.
****
महाराष्ट्र विद्युत
मंडळाकडून सक्तीनं होणारी वीज बिल वसुली थांबवावी, तसंच वीज पुरवठा खंडित करू नये,
यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे काल हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं,
तहसील कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला. सेनगाव तालुक्यातल्या उपकेंद्रातून
विदर्भात जाणारा वीजपुरवठा तातडीनं बंद करावा, नव्यानं मंजूर झालेल्या ३३ उपकेंद्रांचं
काम तातडीनं सुरू करावं, यासह इतर मागण्यांचं निवेदन, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी
यांच्याकडे यावेळी सादर करण्यात आलं.
****
महाराष्ट्राच्या
समृद्ध इतिहासानं भारताला अनेक आयाम दिले आहेत. आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,
शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक विभुतींनी हा इतिहास समृद्ध
केला असल्याचं मत, मुंबईतल्या एसएनडीटी विद्यापीठातल्या इतिहास विभागाच्या प्रमुख,
प्राध्यापक डॉ मेहेरज्योती सांगळे यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या
प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, आज डॉ सांगळे यांचं, ‘१८५७ च्या पूर्वी महाराष्ट्रातील सशस्त्र उठावांची
माहिती’, या विषयावर व्याख्यान होणार आहेत. या व्याख्यानात त्या म्हणाल्या..
महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो अत्यंत
दैदिप्यमान आहे.आणि कुठल्याही अन्यायी, अत्याचारी शासनकर्त्यांना प्रखरतेने समर्थपणे
तोंड देण्याचं सार्मथ्य महाराष्ट्रातील जनतेने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील
१८५७ चे जे सशस्त्र उठाव झाले. त्या उठावांचं स्वरुप पाहता आपल्याला हे लक्षात येईल
की हे उठाव अत्यंत प्रखर होते. बीड, खान्देश, विजयापूर , सावंतवाडी, येथून सशस्त्र
आणि छोट्या छोट्या मोठ्या निरंतन उठाव झालेले आपल्याला आढळतात
आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी हे व्याख्यान प्रसारित केले जाणार
आहे.
****
आरोग्य विभागातर्फे
२१ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळण्यात येतो. या अंतर्गत परभणी
जिल्ह्यात एकूण तीन लाख सहा हजार ३७३ बालकांना, जंतनाशक गोळी देण्याचं उद्दीष्ट ठरवण्यात
आलं असल्याचं, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या ज्या बालकांना
आज जंतनाशक गोळी घेता आली नाही, तर त्यांना २८ तारखेला गोळी देण्यात येईल, अशी माहितीही
त्यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही जिल्ह्यात २१ ते २८ सप्टेंबर
पर्यंत जंतनाशक मोहिम राबवण्याचं जाहीर केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात
नवीन क्रीडा संकुलासाठी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातली २५ एकर एवढी जागा
देण्याची मागणी, खासदार संजय जाधव यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
****
मराठवाड्यात
अनेक भागात काल पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल सायंकाळनंतर
पावसानं हजेरी लावली. बदनापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या
रवना, राणी उंचेगाव, निपाणी पिंपळगाव, दर्गा, अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव, शेवगा,
आलमगाव या भागात पावसाने दोन तास हजेरी लावली. मंठा तालुक्यातल्या काही भागातही मध्यम
स्वरुपाचा पाऊस झाला.
परभणी, पूर्णा
आणि जिंतूर तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद शहर
परिसरातही काल सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. उस्मानाबाद शहरातही मुसळधार
पाऊस झाला.
****
हवामान : येत्या
दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, याच काळात
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज
आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसंच मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
आहे.
****
No comments:
Post a Comment