Wednesday, 23 March 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य परीवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भातील शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ.

·      २०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत ग्वाही.

·      हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार करणार.

·      पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीवरुन काँग्रेसची भारतीय जनता पक्षावर टीका.

आणि

·      महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ११० धावांनी विजय.

****

राज्य परीवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं अलिकडेच आपला अहवाल राज्य सरकारला दिला होता. या अहवालावर राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयाकडे १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयानं आज राज्य सरकारला मुदतवाढ दिली. यावेळी न्यायालयानं सरकारला समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी ही अखेरची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी न्यायालयानं संपकरी संघटनेलाही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे? अशी विचारणा केली.

दरम्यान, या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळं आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत दिली. एसटी कर्मचारी आणि ग्रामीण जनतेसाठी हा संप मिटणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात विधानपरिषदेत आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळं सदनाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा यावेळी दिला.

****

२०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. रस्ते, परिवहन आणि महामार्गांच्या अनुदानावरील चर्चेला ते उत्तर देत होते. देशात दरदिवशी ३८ किलोमीटर रस्त्यांची बांधणी केली जात आहे. सुंदर रस्त्यांमुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. अटल आणि जोजिला या बोगद्यांमुळे लडाखचं अंतर कमी झालं आहे. सरकार रस्ते निर्मिती करताना पर्यावरणाचाही समतोल साधत आहे. रस्त्यांवरील दुर्घटना कमी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. हरित महामार्गांमुळे वाहनांची वाहतूक ठप्प होणार नाही, असंही ते म्हणाले. भविष्यात हायड्रोजनवर आधारित वाहन निर्मितीला चालना दिली जाईल तसंच इलेक्ट्रीक वाहनांमुळे खर्चात मोठी बचत होईल, असंही ते म्हणाले.

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले. विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला शिंदे उत्तर देत होते. नागपूर ते मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं १६ बांधकाम पॅकेज अंतर्गत काम प्रगतीपथावर असून निविदा कालावधीनुसार हा महामार्ग येत्या सप्टेंबर पर्यंत जनतेसाठी खुला करण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईची जनतेला भेट दिल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपनं महागाईच्या गर्तेत लोटलं असल्याचं ते म्हणाले. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादक आणि मॉल्स यांच्यासाठीचं डिझेल २५ रुपये प्रति लिटरनं महाग केलं आहे. यामुळं महागाई वाढून त्याचा फटका शेवटी सामान्य माणसांनाच बसणार असल्याचं ते म्हणाले.

****

जागतिक जलदिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जल स्रोत स्वच्छ ठेऊन त्यांच संवर्धन करण्याचं आवाहन केलं आहे. जीवनदायी नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग काळजीपूर्वक करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. तसंच जल हा जीवनाचा पर्याय असल्यानं त्याचा योग्य वापर करण्याचं आवाहन नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे.

****

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यामधील बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन महापालिकेनं निकाल द्यावा, तो पर्यंत बंगल्यावर कोणतीही कारवाई करण्यास उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला मनाई केली आहे. महापालिकेनं राणे यांना अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीशीला राणे यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. पालिकेचा निकाल राणे यांच्याविरोधात गेल्यास त्यांना तीन आठवडे न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी वेळ देण्याचा आदेशही न्यायालयानं यावेळी दिला.

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशचा ११० धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकांत सात बाद २२९ धावा केल्या. उत्तरादाखल बांगलादेशचा संघ ४० षटकं आणि तीन चेंडूत ११९ धावांत बाद झाला.

****

पुणे विभागातील नऊ हजार २०० स्वस्त धान्य दुकानं डिजिटल होणार आहेत. आता या दुकानांमध्ये बँक व्यवहार, तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्जसह विविध सेवा मिळणार आहेत. धान्य वितरणातील कमिशन पुरेसं नसल्याची तक्रार दुकानदारांकडून केली जात होती. याची दखल घेत शासनाकडून ई-सेवा केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.

 

राज्याचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या सबलीकरणासाठी ई-सेवा केंद्राबाबतच्या समझोता करारनाम्यावर मुंबईत स्वाक्षरी करण्यात आली.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं, बँकेच्या सहाय्यक पदासाठीच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ज्या उमेदवारांनी भरती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ - rbi.org.in वरून पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील असं आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 5 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...