Wednesday, 23 March 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०

****

कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोविड प्रतिबंधासाठी कोणतेही आदेश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

** गर्भधारणा आणि प्रसूतिपूर्व गर्भ लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी- आरोग्यमंत्री राजेश टोपे

** गेवराई तालुक्यातल्या पाझर तलावांच्या दुरूस्तीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं मृद आणि जलसंधारण मंत्र्यांचं आश्वासन

** पेट्रोल -डिझेल आणि घरगुती गॅस दर वाढीच्या निषेधार्थ विरोधकांचा संसदेत गदारोळ

आणि

** आंबा निर्यातीसाठीची अत्यावश्यक प्रक्रिया सुरू

****

कोविड प्रतिबंधासाठी आता आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत कोणतेही आदेश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटल आहे. देशात कोविड रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्राद्वारे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत कळवलं आहे. गेल्या सात आठवड्यापांसून देशातली कोविड संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असून देशात सध्या केवळ २३ हजार ९१३ सक्रीय रूग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र मुखपट्टीचा वापर आणि हातांची स्वच्छता बंधनकारक असून कोविडची संख्या वाढल्यास त्या त्या ठिकाणचं प्रशासन स्थानिक कारवाई करण्याबाबत विचार करू शकतात असंही भल्ला यांनी स्पष्ट केलं.

****

गर्भधारणा आणि प्रसूतिपूर्व गर्भ लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य दल असून या सर्व यंत्रणांच्या दोन तीन महिन्यांनी बैठका घेऊन आढावा घेतला जातो असंही त्यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणीसंदर्भातल्या कायदेशीर तरतुदींचा भंग होत असल्याच्या कारणावरून १८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना राज्यात गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून तीन केंद्रांवरील सोनोग्राफी यंत्रं सील केल्याचं ते म्हणाले.  राज्यात २०१५ पासून २०१९ पर्यंत दरवर्षी दर हजार मुलांमागे असलेली मुलींची संख्या कमी झालेली नाही, असंही टोपे यांनी नमूद केलं.

****

रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळं लोकांचा विरोध मावळत असून लोक पुढाकार घेत आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे - बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला उत्तर देताना ते बोलत होते.

दरम्यान, राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान देण्याच्या मुद्यावर शिक्षक आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं परिषदेचं कामकाज सुरुवातीला दहा मिनिटं आणि नंतर पाच मिनिटं तहकूब करण्यात आलं. 

****

जलसंपदा विभागातर्फे पुढील दोन वर्षात १०४ प्रकल्प पूर्ण करण्याकरिता कालबध्द कार्यक्रम आखण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. २०२२-२३ वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. तसंच डावा-उजवा कालव्याचं ७५ टक्के काम पूर्ण झालं आहे. गोदावरी खोऱ्यात प्रवाह वळण योजनेद्वारे पाणी वळवण्याचं काम प्रगतीपथावर असून नदीजोड प्रकल्प राबवले जात असल्याचं ते म्हणाले.

****

राज्यात दर शंभर किलोमीटर अंतरावर कर्करोग उपचारांसाठी उपकेंद्र सुरू केली जातील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. नागपूरच्या कर्करोग निदान केंद्रासाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाचं बांधकाम करण्यासाठी निधीची अडचण येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या पाझर तलावांच्या दुरूस्तीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज विधानसभेत दिली. या पाझर तलावांचं ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं असून त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करून मिळावी, असा प्रश्न विधानसभा सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केला होता. या कामांसाठी १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचंही मंत्री गडाख यांनी सांगितलं.

****

पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस सह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित झालं होतं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी ही मागणी फेटाळून लावली. यावरुन विरोधकांनी सदनात फलक झळकावत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.   

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव, राजगुरु यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आज देशभरात शहीद दिवस पाळण्यात येत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन मिनिटं मौन पाळून या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना अभिवादन केलं आहे.

शहिद दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ इथं रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं.

****

कृषी पणन मंडळानं आंबा निर्यातीसाठीची अत्यावश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. गेली दोन वर्षे कोविडमुळे आंबा निर्यात अडचणीत आली होती. यंदा सुमारे अडीच हजार टन आंब्याच्या निर्यातीचं उद्दिष्ट असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली आहे. राज्यात आंबा निर्यातीच्या प्रक्रियेसाठी कृषी पणन मंडळाची नऊ निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत झाली आहेत. त्यात बारामती, रत्नागिरी जिल्ह्यातलं नाचणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जामसंडे  तसंच जालना, लातूर, बीड, वाशी इथल्या  केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सुमारे ३५ ते ४० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात केली जाते.

****

राष्ट्रीय पोषण माह पंधरवडा निमित्त उस्मानाबाद तालुक्यात तेर इथल्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना द्यावयाच्या सकस पूरक पोषण आहार स्वच्छता जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. या जनजागृती रॅलीमध्ये नागरिकांना बालकांची काळजी आणि त्यांचा आहार याविषयी माहिती देण्यात आली.

****

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड रेल्वे विभागा मध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना १ एप्रिल ते २ ऑगस्ट दरम्यान मुदतवाढ दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...