Tuesday, 22 March 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ मार्च २०२२ दुपारी १.०० वा.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारचं धोरण अधिवेशन संपायच्या आत मांडलं जाईल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत सांगितलं. एसटी कर्मचारी संपाबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत आणि आतापर्यंत शंभर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा भाजपनं आज सभागृहात उपस्थित करुन यासंबंधी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर परब यांनी हे उत्तर दिलं.  

दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी राज्य सरकारनं द्यावा, या मागणीसाठी भाजपा आमदारांनी आज विधानभवनाबाहेर आंदोलन केलं.

****

आजपासून देशात पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ८४ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८३ पैशांनी वाढ झाली आहे.  घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडर ९४९ रुपये ५० पैसे या किमतीत मिळणार आहे.

दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे राज्यसभेत आज विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

भारतानं केंद्र आणि राज्य सरकारांच्या योग्य समन्वयानं एकजुटीनं काम करत जगासमोर कोविड व्यवस्थापनाचं अनुकरणीय प्रारूप सादर केलं, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. लोक चळवळ आणि लोकसहभाग हे भारताच्या कोविड व्यवस्थापन धोरणाचं प्रमुख स्तंभ असून, भारताचं कोविड व्यवस्थापन हे नेतृत्व, नावीन्य, समर्पण, भागीदारी, आणि तंत्रज्ञानाचा उत्तम वापर याची कथा आहे असंही ते म्हणाले. भारताची ही यशोगाथा जगभरातल्या अन्य देशांसाठीही अनुकरणीय ठरत आहे असं आरोग्य मंत्री म्हणाले.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं आत्तापर्यंत १८१ कोटी ५६ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ३० लाख ५८ हजार नागरीकांचं लसीकरण झालं.

दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ५१५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ७४१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २३ हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

आगामी शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देताना केंद्रीय विद्यापीठांनी सी यू इ टी अर्थात विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम.जगदेश कुमार यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एन टी ए पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेईल. या प्रवेश परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम इयत्ता बारावीच्या एन सी इ आर टी च्या अभ्यासक्रमासारखाच असेल असं जगदेश कुमार यांनी सांगितलं.

****

वीजग्राहकांना योग्य दाबाने गुणवत्तापूर्वक अखंडित वीजपुरवठ्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्याचा नवीन प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या मान्यतेनंतर निधीच्या उपलब्धतेनुसार विविध कामे हाती घेण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितलं. अतिदाबाने रोहित्रे नादुरुस्त होत असून, डीपीदेखील खराब होत आहेत, विशेष बाब म्हणून रोहित्रे विकत घेण्यासाठी आमदारांच्या स्थानिक निधीतून परवानगी देता येईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य अठराव्या बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला बीड इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कालपासून सुरुवात झाली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षी अठराव्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचे आयोजन बीड इथं करण्यात आलं आहे.

****

आजपासून सुरू होणाऱ्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अग्रमानांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, साईना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत आपले पहिल्या फेरीतले सामने आज खेळणार आहेत.

दरम्यान, जर्मन ओपन आणि ऑल इंग्लंड स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारलेल्या लक्ष्य सेननं विश्रांतीसाठी स्विस ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

****

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना बांग्लादेश बरोबर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघानं निर्धारित षटकात सात बाद २२९ धावा केल्या. यास्तिका भाटियानं ५०, शेफाली वर्मानं ४२ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांग्लादेश महिला संघाच्या ३७ षटकांत नऊ बाद १०५ धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजचा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा असे दोन्ही सामने जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...