Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 March
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२२ मार्च २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं
आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर
अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोविड काळात अडचणीत आलेल्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राला
दिलासा देणारं अभय योजना विधेयक, विधीमंडळात मंजूर
·
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं विधानसभेत निवेदन करण्याचे
सभापतींच्या सूचना
·
विधीमंडळ कामकाजाबाबत गांभीर्य न दाखवल्यानं बीड नगरपरिषदेचे
चार अधिकारी निलंबित
·
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी ९ हजार
६१२ हेक्टर क्षेत्रासाठीचं नियोजन
·
राज्यात कोविड संसर्गाचे ९९ तर मराठवाड्यात २ नवे रुग्ण
आणि
·
औरंगाबाद जिल्ह्यात केंद्रीय निधीतून तयार करण्यात आलेल्या
रस्त्यांची, गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत तपासणी करण्याची खासदार इम्तियाज जलील
यांची लोकसभेत मागणी
****
राज्याच्या
अर्थसंकल्पात जाहीर केलेलं वस्तू आणि सेवाकरासंदर्भातलं अभय योजना विधेयक, काल विधीमंडळाच्या
दोन्ही सभाग्रह मंजूर झालं.
अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं. कोविड काळात अडचणीत आलेल्या
उद्योग आणि व्यापार क्षेत्राला या विधेयकामुळे लाभ होईल. या विधेयकाच्या तरतुदीनुसार
एका वर्षात १० हजार रुपये थकबाकी असल्यास सदर थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात येईल. सुमारे
एक लाख प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. १० लाखापेक्षा कमी थकबाकी
असेल, तर २० टक्के रक्कम भरून, उर्वरित ८० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. सुमारे दोन
लाख २० हजार प्रकरणात व्यापारी वर्गाला याचा लाभ होईल. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी
असलेल्या व्यापाऱ्यांना चार हप्त्यात भरणा करण्याचा पर्याय देण्यात आला असून, २५ टक्के
रकमेचा पहिला हप्ता ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत तर उर्वरित तीन हप्ते पुढच्या नऊ महिन्यात
भरावे लागणार आहेत.
राज्यातल्या
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर झालेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती परत न करणाऱ्या
महाविद्यालयांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असं सामाजिक
न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत जाहीर केलं. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप
आणि राहूल कुल यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
****
मराठा
आरक्षण प्रकरणी राज्य सरकारनं निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश विधानसभेत
तालिका पीठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिले. मराठा समाजाचं आरक्षण आणि इतर मुद्यावरून
भाजपानं काल विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. खासदार संभाजीराजे यांचं उपोषण सोडताना
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा मुद्द्यांचं लेखी आश्वासन यांना दिलं होतं.
त्यात अंमलबजावणीचा तारीखवार कार्यक्रम दिला होता. त्यानुसार सारथी संस्थेतली रिक्त
पदं १५ मार्चपर्यंत भरू असं आश्वासन दिलं होतं, मात्र तारीख उलटून गेली तरी कार्यवाही
झालेली नाही, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
विधीमंडळ
कामकाजाबाबत गांभीर्य न दाखवल्यानं बीड नगरपरिषदेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची
घोषणा काल नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळात केली. बीड नगरपालिकेतल्या
विविध योजनांच्या भ्रष्टाचाराबाबत विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. विधीमंडळात
एखादा प्रश्न किंवा लक्षवेधी सूचना लागते तेव्हा त्यावर माहिती देण्यासाठी रविवारी
नगर परिषदेचे अधिकारी आले होते. सोमवारी पुन्हा उपस्थित राहण्यास सांगितलं तर कोणीही
आलं नाही, त्यांचे मोबाईलही बंद आहेत. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार आणि जनतेच्या
सुविधांची हेळसांड करण्याच्या आरोपांवरुन राहुल टाळके, सलीम याकुब, सुधीर जाधव आणि
योगेश हांडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नगरपरिषदेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांची
विभागीय चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल,
अशी माहिती तनपुरे यांनी दिली.
****
राज्यातल्या
दुध उत्पादकांना योग्य आणि किफायतशीर दर - एफआरपी देण्याबाबत लवकरच मंत्रीमंडळ बैठकीत
निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी विधान परिषदेत
दिली. दूध उद्योग जिवंत राहिला पाहिजे. यासाठी दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या
प्रमाणावर उभे राहिल्यास मागणी तसा पुरवठा होऊ शकेल. खुल्या अर्थव्यवस्थेत आपण दूध
उत्पादकांवर बंधनं लादू शकत नाही. त्यामुळं दूध उत्पादनासंदर्भात एफआरपी देण्यासंदर्भात
बैठक घेण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
****
बिगर
शेतीकरता महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सोपी
करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल विधानसभेत सांगितलं.
राज्यात जमिनीचे छोटे छोटे तुकडे पडू नयेत यासाठी जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध
आणि त्याचं एकत्रिकरण करण्याबाबतच्या कायद्यात कालानुरूप काही सुधारणा करण्यात आल्या
आहेत. शहरं आणि शहरांभोवती होणारी वाढ रोखणं हा यामागील उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
केंद्र
पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यात आठ लाख ८६ हजार शेतकरी
कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यासाठी २५ मार्चपासून विशेष मोहीम राबवण्यात येणार
आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू
पवार आणि अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते. या अंतर्गत
केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
३३
कोटी वृक्ष लागवड प्रकरणी लवकरच अहवाल सादर करुन दोषींविरुद्ध कारवाई करणार असल्याची
माहिती, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानपरिषदेत दिली. या योजनेच्या चौकशीसाठी
समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर
इथं वृक्ष लागवड योजनेच्या नावाखाली राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला
निलंबित केल्याची माहिती भरणे यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या १५ हजार १६० हेक्टर क्षेत्रापैकी सद्यस्थितीत ७ हजार ९१० हेक्टर सिंचन
अनुशेष शिल्लक आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी विभागानं ९ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रासाठी
नियोजन केलं असून, यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
घेण्यात येईल, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानभेत सांगितलं. सदस्य संतोष
बांगर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला पाटील उत्तर देत होते. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत
इसापूर धरण आणि सापळी धरण प्रस्तावित असून इसापूर धरणाचं काम १९८२ साली पूर्ण झालं
आहे तर सापळी धरणाचं काम जनविरोधामुळं अद्याप सुरु झालेलं नाही. तरीही सापळी धरणाच्या
मंजूर १९९ दशलक्ष घनमीटर नियोजित पाण्यातून हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष निर्मूलनासाठी
६१ पूर्णांक ४३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करुन देण्यात आल्याचं पाटिल यांनी यावेळी
सांगितलं.
****
सायबर
क्षेत्रातील गुन्ह्यांची गतीने तपासणी करण्यासाठी कौशल्य विकास आणि तत्सम प्रकारातील
प्रशिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची पोलीस प्रशिक्षण संस्था परभणी इथं स्थापन करण्याची
मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. राज्यात सद्यस्थितीत
एक लाख नागरिकांच्या मागे १६९ पोलीस कार्यरत आहेत. त्यासाठी पोलिस खात्यात मोठ्या पदभरतीची
गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ९९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या ७८ लाख ७२ हजार ५१२ झाली आहे. या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या
एक लाख ४३ हजार ७६७ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल १८० रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २३ हजार ४६८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
एक हजार २७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाची नोंद झाली,
औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण
आढळला नाही.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि अनेक वर्षापासून रखडलेले प्रलंबित
रस्ते प्रकल्प याकडे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेचं लक्ष वेधलं. अर्थसंकल्पात
परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसंच केंद्रीय मार्ग निधीतून औरंगाबाद जिल्ह्यात तयार
करण्यात आलेल्या रस्त्यांची, गुणवत्ता नियंत्रण समिती मार्फत तांत्रिक तपासणी करुन
संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जलील यांनी
केली. औरंगाबाद शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्यावर अखंड उड्डाणपूल, औरंगाबाद-शिर्डी
जलदगती मार्ग, औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचं रखडलेलं काम, धुळे सोलापूर महामार्गावरचा
औट्रम घाट, आदी मुद्यांकडेही खासदार जलील यांनी लक्ष वेधलं.
****
राज्याचे
मंत्री नवाब मलिक यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात
आली आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे त्यांना तुरुंगात पलंग आणि खुचीर्ची वापरण्यास परवानगी
देण्यात आली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी निगडीत जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी
त्यांना अटक करण्यात आली आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती काल साजरी झाली. या निमित्त राज्यभरातून शिवाजी
महाराजांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यातल्या श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवनेरी
किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील
शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पुतळ्यावर
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
****
राज्यातल्या
२५ जिल्हा परीषद आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची मुदत संपल्यामुळे कालपासून
प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परीषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत
समित्यांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार
काल औरंगाबाद जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे,
नांदेड जिल्हा परीषदेच्या प्रशासक म्हणून वर्षा ठाकूर यांनी, तर परभणी जिल्हा परिषदेचे
प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पदभार स्वीकारला.
****
नाथषष्ठी
निमित्तानं पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या दोन दरवाजातून काल गोदावरी नदी पात्रात पाणी
सोडण्यात आलं. नदी पात्रात स्नान करुन भाविक भानुदास एकनाथाच्या गजरात नाथ समाधीचं
दर्शन घेतात. त्यामुळे हे पाणी सोडण्यात आलं आहे. उद्या संत एकनाथ महाराज यांचा समाधी
सोहळा असून वारकऱ्यांसाठी विसाव्याच्या जागेची साफसफाई करण्यात आली. नाथषष्ठी यात्रा
महोत्सव पूर्व तयारी म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी नाथ मंदीर, कमल
तीर्थ, गोदावरी नदी पात्रातील वाळवंट, अशा विविध ठिकाणची पाहणी करुन कोणताही अनुचित
प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
****
सध्याची शिवसेना ही पवार सेना झाल्यामुळे त्यांचा निवडणुकीत
पराभव होत आहे, असं मत भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे.
काल त्यांनी आपल्या कुटुंबासह तुळजापूर इथं तुळजाभवानीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते
वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातलं सत्तारूढ आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही
त्यांनी यावेळी बोलतांना केला. राणे यांचा मंदिर संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात
आला.
****
उस्मानाबाद
तालुक्यातल्या ८६ गावांच्या गावठाणातील मिळकतींची आजपासून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून
मोजणी करण्यात येणार आहे. या ड्रोन मोजणीच्या वेळी प्रत्येक मिळकत धारकानं आपली घरं
आणि सहन जागा चुन्यानं सिमांकित करावी असं आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी केलं
आहे.
****
कोविड
लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं
आहे. नांदेड इथले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या
'कोरोना विरूद्ध युद्ध आमचे सुरू' या पुस्तकाचं विमोचन काल टोपे यांच्या हस्ते दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. लसीकरण किती महत्त्वाचं आहे,
हे डॉक्टर काब्दे यांनी आपल्या पुस्तकात सांगितलं असून, प्रत्येकाने लसीकरण करून घेणं,
ही आजची सर्वात महत्त्वाची बाब आहे, असं टोपे म्हणाले.
****
No comments:
Post a Comment