Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनात आजच्या दुसर्या दिवशी सकाळच्या सत्रात लेखक राजन गवस यांची मुलाखत झाली, तसंच
मान्यवर लेखक आणि प्रकाशकांचा सत्कार करण्यात आला. तसंच ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड
यांच्या हस्ते बालमेळाव्याचं उद्घाटन झालं, तसंच बालकांचं काव्यवाचन झालं. कविकट्टा
आणि गझलकट्टा हे कार्यक्रम देखील आज पार पडले. दुपारच्या सत्रात ‘मराठी साहित्यात निसर्गचित्रणच
आहे, पर्यावरण नाही’ आणि ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे’
या विषयांवर परिसंवाद, तसंच निमंत्रितांचं बाल कविसंमेलन होणार आहेत. संमेलनात आज संध्याकाळच्या
सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
****
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोली पर्यंत वाढवण्यात
येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वाशिममधल्या
शेलूबाजारपासून नागपूरपर्यंतच्या २१० किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन दोन मे रोजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पुढच्या वर्ष अखेरपर्यंत संपूर्ण महामार्ग खुला
होईल, असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर ते काल बोलत होते.
****
महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाकडून एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सामाजिक
न्यायाचा जागर केला जाणार आहे. यावेळी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात विभागाच्या सर्व योजनांची
माहिती देणारी माहितीपत्रिका दिली जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. काल १९ लाख १३ हजार २९६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८७
कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ५२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ६५६ रुग्ण बरे झाले. देशात
सध्या १५ हजार ७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण
समारंभात उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे.
****
राज्यात वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून, राज्यात अघोषित
भारनियमन सुरूच आहे. असं असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारनं ग्राहकांच्या
खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबवण्याच्या मागणीसाठी, भारतीय जनता पक्षातर्फे
राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचं, भाजप नेते आशिष शेलार यांनी काल पुण्यात
पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीनं नांदेड शहरात उभारण्यात आलेल्या महात्मा
बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण काल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री
तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झालं. या अनावरण समारंभास
शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे शिवा
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर
राहण्याचे आदेश दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व दोन हजार १२१ कर्मचारी कामावर
हजर झाले आहेत. उद्यापर्यंत सर्व फेऱ्या १०० टक्के सुरु होतील असा विश्वास एसटीच्या
अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
****
पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या मृदा आणि जल या संसाधनांचं
नाविन्यपूर्ण नियोजन करणं गरजेचं असल्याचं, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री
पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि
विद्यापीठात पाणलोट क्षेत्र प्रकल्पाच्या कामाबद्दल पाहणी करतांना ते काल बोलत होते.
हिवरेबाजार प्रमाणेच राहुरी कृषि विद्यापीठातही पाणलोट क्षेत्र विकासाचं काम होत असून,
पाणलोट क्षेत्र विकास संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र भविष्यात देशाला दिशा देणारा प्रकल्प
ठरेल, असं ते यावेळी म्हणाले.
****
लातूर इथं जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी इयत्तेच्या प्रवेशासाठी लेखी
परिक्षा येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातल्या ३६ केंद्रावर होणार
असल्याचं प्राचार्य जी. रमेश राव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment