Saturday, 23 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

भारत आणि ब्रिटन दरम्यानचा मुक्त व्यापार करार या वर्षअखेरीस पूर्णत्वाला नेण्यासाठी उभय देश प्रयत्नशील असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात काल नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान बोलत होते. सध्याच्या जागतिक अस्वस्थतेच्या काळात उभय देशांमधील भागीदारी महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं प्रतिपादन जॉन्सन यांनी यावेळी केलं.

****

कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयानं १० लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. लालूंच्या जामीन अर्जावर काल झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या न्यायालयानं या प्रकरणी सीबीआयचा युक्तिवाद फेटाळला.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटकेपासून दोन आठवड्यांसाठी अंतरिम संरक्षण दिलं आहे. न्यायमूर्ती पीबी वराळे आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

****

बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या ५०० चालकांनी कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. वेतन मिळत नसल्याच्या कारणावरुन कालपासून हे आंदोलन सुरू होतं. मात्र कंत्राटदाराने रखडलेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर बंद ठेवण्यात आलेली बससेवा सुरु करण्यात आली.

****

मुंबई पोलिसांनी काल अंमली पदार्थांसह एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे १ कोटी १२ लाख रुपयांचं साडे ७०० ग्रॅम अंमली पदार्थ आढळल्याची माहिती पोलीस उपायुक्त विशाल यादव यांनी दिली.

****

मंगोलियात सुरू असलेल्या आशियायी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आणखी तीन पदकांची कमाई केली आहे. अंशु मलिक आणि राधिकानं त्यांच्या वयोगटात फ्री-स्टाइल कुस्तीमध्ये रौप्य पदक पटकावलं. तर मनिषानं कांस्य पदक जिंकलं. यापूर्वी सविता मोर आणि सुषमा शौकीन यांना कांस्यपदक मिळालं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...