Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –०२ जून २०२२ दुपारी १.०० वा.
****
महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं गेल्या आठ वर्षात सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारानं अगदी सुरुवातीपासून
महिला केंद्री विकासाला प्राधान्य दिलं आहे, त्यामुळे कोट्यावधी
माता-भगिनी आणि कन्यांचं जीवन सुलभ झालं असून देशाच्या प्रगतीत त्या हिरीरीनं योगदान
देत आहेत, असं ट्विट पंतप्रधानांनी केलं
आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, नळाचं पाणी,
गॅस जोडणी, घरोघरी शौचालय, प्रसुतीकाळातल्या पगारी रजेत वाढ, सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत,
दोन कोटी ७३ लाखापेक्षा जास्त खाती उघडणं, त्रिवार
तलाक पद्धत बंद करणं, सशस्त्र दलांमधे महिलांचा कायमस्वरुपी समावेश,
इत्यादी महत्त्वाच्या उपाययोजना सरकारनं केल्या आहेत. सुधारणा कामगिरी,
आणि परिवर्तन या तत्वामुळे व्यापार सुलभतेची अनेक उद्दिष्ट्यं साधता
आली. त्यामुळे विशेषतः युवकांना मोठा लाभ झाला, आणि संपत्तीचे
निर्माणकर्ते बननण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला बळ मिळालं, असं पंतप्रधानांनी दुसऱ्या एका ट्वीटमधे म्हटलं आहे.
****
माजी
काँग्रेस नेते आणि पाटीदार आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल यांनी
आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गुजरातमधले भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या
उपस्थितीत गांधीनगर इथं हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. हार्दिक
पटेल यांनी आज सकाळी ट्विट करत, आपण देशसेवेच्या
उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
****
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामिक संघटनेच्या २३ बँक खात्यांवर तसंच या संघटनेची
उप संघटना असलेल्या रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या १० बँक खात्यावर सक्तवसुली संचलनालयानं
टाच आणली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेल्या तपासातंर्गत
ही कारवाई करण्यात आली. त्याबरोबरच ६८ लाख रुपयांच्या रकमेवरही
टाच आणली आहे. या संघटनांना संशयास्पद स्रोतांकडून मोठी रक्कम मिळाली असल्याचं ईडीच्या
तपासात आढळून आलं.
****
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं पक्षाच्या चार नेत्यांची तसंच केंद्रीय मंत्र्यांची
नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून अश्विनी
वैष्णव, राजस्थानसाठी नरेंद्रसिंग तोमर, हरियाणासाठी गजेंद्रसिंग शेखावत तर कर्नाटकसाठी जी किशन
रेड्डी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. काल १२ लाख ८४ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण
झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९३ कोटी ७० लाख मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ७१२ कोविड रूग्णांची
नोंद झाली, तर दोन हजार ५८४ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १९ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
भारतीय नौसेना उद्या अपल्या मुंबई गोदीतून आई एन एस निशंक आणि आई एन एस अक्षय या
दोन जहाजांना सेवेतून मुक्त करणार आहे. ३२ वर्षांच्या देशाला दिलेल्या दीर्घ सेवेनंतर
आता या दोन जहाजांना निरोप देण्यात येणार असून अनेक समुद्री युद्धामंध्ये योद्धांना
साथ देणारी ही जहाजं नेहमीच त्यांच्या गौरव आणि सन्मानासाठी स्मरणात रहातील.
****
राज्यातल्या भूदान आणि ग्रामदान अधिनियमाच्या अंतर्गत
जमिनीच्या संदर्भात शासनाची भूमिका ठरवण्याकरता सर्वंकष अभ्यास करुन शासनास योग्य शिफारस
करण्यासाठी प्रधान महसूल सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित करण्यात आली
आहे. राज्यातल्या विविध भागात भूदान आणि ग्रामदान अधिनियमाच्या
अंतर्गत जमिनीच्या वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन अशा जमिनीचं झालेलं बेकायदेशीर
हस्तांतरण आणि वापरात बदल यावर उपाययोजना सुचवणं, नागरीकरणाच्या
प्रभाव क्षेत्रातील भूदान आणि ग्रामदान जमिनींच्या वापर आणि विनियोगाच्या संनियंत्रण
आणि व्यवस्थापनाविषयी शिफारशी करणं अशी या समितीची कार्यकक्षा राहणार आहे.
****
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध प्रवर्गातल्या
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक
अभ्यासक्रमाच्या विशेष अध्यासनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळणार आहे.
एका वर्षात राज्यातल्या अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध प्रवर्गातल्या ७५ विद्यार्थ्यांना
छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाची
शिष्यवृत्ती १० विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे परदेशातील शिक्षणाचा
आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने सन २०२२-२३ या वर्षासाठी परदेशातील उच्च
शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात काल रात्री पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात
शिर्डी मार्गावर एका गावात पावसामुळे भिंत कोसळून नारायण हरीभाऊ गवळी या वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय
नाशिक जिल्ह्यात चांदवड आणि येवला तालुक्यातही मान्सून पूर्व पाऊस पडला.
****
No comments:
Post a Comment