Wednesday, 22 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जून २०२२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत आपलं मत मांडणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या राजकीय घडामोडांचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं होत असल्याचं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

****

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, औरंगाबाद इथं आज शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात करण्यात आलेल्या या निदर्शनात एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा निषेध करण्यात आला.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. त्यांना आज सकाळी मुंबईत गिरगाव इथल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं राजभवनातल्या अधिकार्यांनी सांगितलं.

****

चार वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अग्नीवीरांना मर्चंट नेव्हीत संधी दिली जाईल, असं नौदलानं जाहीर केलं आहे. व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. भारतीय नौदलातल्या कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्हीत पाठवण्याबाबत नौवहन महासंचालनालय आणि नौदल यांच्यात सामंजस्य करार झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १२ लाख २८ हजार २९१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९६ कोटी ४५ लाख ९९ हजार ९०६ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार २४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ हजार ८६२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८१ हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे एक हजार खाटांचं मल्टी स्पेशॅलिटी रुग्णालय आहे, जे २१ एकरात पसरलेलं आहे. याठिकाणी निसर्गोपचार केले जातात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या भूमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले. मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालय हजारो लोकांना स्वस्त दरात उपचार देणारं आहे, ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. हे देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतलेल्या हजारो लोकांना प्रेरणा देईल, असं ही त्यांनी सांगितलं.

****

मनमाड ते अंकाई रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचं असल्यानं २५ ते २८ जून दरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक - मुबंई पंचवटी एक्स्प्रेस, जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, नागपूर - मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

खते आणि बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पक्की बिलं देणं आवश्यक असतानाही अशी बिलं न दिल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पक्की बिले देण्याचे आदेश दिले आहेत, मात्र प्रत्यक्ष तपासणीत अनियमितता आढळल्यानं १८ खत विक्रेते, सहा बियाणे विक्रते आणि सात कीटकनाशके विक्रेते अशा ३१ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

****

‘अग्निपथ’ हे लष्करी सेवेतलं कंत्राटीकरण असल्याचा आरोप करत, ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आफ इंडिया’ या संघटनेनं, काल सोलापुरात आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

भारतीय हवामान खात्यानं शनिवारपर्यंत मुंबई तसेच महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारी भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानुसार, संपूर्ण किनारपट्टी उपविभागात ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः मुंबईसाठी, भारतीय हवामान विभागानं शनिवारपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जूनला आकाशाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...