Wednesday, 22 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.06.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 June 2022

Time - 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जून २०२२ सायंकाळी ६.१०

****

·      शिवसेनेतल्या सहकाऱ्यांनी अविश्वास दाखवणं क्लेशदायक; थेट संपर्क साधून संवादाचं मुख्यमंत्र्याचं बंडखोर आमदारांना आवाहन; मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याची स्पष्टोक्ती.

·      सात अपक्षांसह ४६ आमदारांच्या पाठिंब्याचा एकनाथ शिंदे यांचा दावा;समर्थक आमदार भरत गोगावले यांची विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती.

·      काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपचीही दिवसभर बैठकांची सत्रं.

आणि

·      जगत्‌गुरू गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याची पुण्याकडे वाटचाल; दोन वर्षांच्या खंडानंतर भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवला पालखी सोहळा.

****

शिवसेनेतल्या सहकाऱ्यांनी आपल्यावर अविश्वास दाखवणं, ही बाब अत्यंत क्लेशदायक असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज फेसबुकवरून जनतेशी थेट संवाद साधत त्यांनी, या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन, आपल्याशी संवाद साधल्यास, आपण तत्काळ मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार असल्याचं, ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, शिवसेना आणि हिंदुत्व वेगळं होऊ शकत नाही, असं ठाकरे यांनी नमूद केलं. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असं भासवलं जात आहे. मात्र शिवसैनिकांना जे मिळालं, ते बाळासाहेबांच्यानंतरच्या शिवसेनेनं दिलं, हे लक्षात घ्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, या म्हणीप्रमाणे सहकाऱ्यांनी वागू नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ज्या सहकाऱ्यांना माझ्या मुख्यमंत्रिपदावर आक्षेप आहे, त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं आवाहनही ठाकरे यांनी केलं.

 

मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यावर पुढच्या एक दोन महिन्यातच कोविडचा प्रादुर्भाव झाला. त्या संकटातूनही  जनतेच्या सहकार्याने आपण बाहेर पडल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली, प्रशासनानेही आपल्याला सांभाळून घेतलं, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

****

राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज सायंकाळी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे निर्देश पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केले आहेत. पक्षांतर घडवून राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. या बैठकीस उपस्थित न राहिल्यास, शिवसेना पक्ष सदस्यत्व सोडण्याचा आपला इरादा स्पष्ट आहे, अस मानून आपणावर कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असं या नोटीशीत नमूद केलं आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना ही नोटीस विविध समाज माध्यमातून पाठवण्यात आली, मात्र त्यांनी ती न स्वीकारल्यामुळे त्यांच्या सातारा इथल्या निवासस्थानी ही नोटिस लावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदार बैठकीबद्दल दिलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं, एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावर भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विट संदेशाद्वारे जाहीर केलं आहे.

दरम्यान, आपल्याला सहा ते सात अपक्षांसह ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भाजपकडून आपल्याला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, आपली भाजपसोबत काहीही चर्चा झाली नसल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. आज संध्याकाळी सोबत असलेल्या आमदारांसह बैठक घेऊन पुढची रणनीती ठरवणार असल्याची माहिती बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज नागपूरमध्ये परत आले आहेत. आपण उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचं त्यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सूरतमध्ये असतांना आपल्याला रक्तदाब किंवा हृदयासंदर्भात कोणतीही समस्या नव्हती,तरीही आपल्याला गुजरात पोलिसांनी जबरदस्तीनं दवाखान्यात नेलं,असा आरोपही त्यांनी केला.

****

राज्यात आज दिवसभर वेगानं राजकीय घडामोडी झाल्या. काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे निरीक्षक कमलनाथ यांनी आज मुंबईत पक्षाची बैठक घेतली,या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार हजर असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं. या बैठकीनंतर कमलनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना, महाविकास आघाडीला आपला पाठिंबा कायम असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशीही कमलनाथ यांनी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आज एक उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या परिस्थितीबाबत विचार विनियम केला. या बैठकीनंतर बोलताना, पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, राज्यात मध्यावधी निवडणुकांची वेळ येणार नाही, पण आलीच तर आम्ही तयार आहोत, राजकीय पक्षांनी नेहमीच निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी, असं मत व्यक्त केलं.

****

दरम्यान, भाजप नेते तथा विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भाजप नेते तसंच समर्थक आमदारांची बैठक झाल्याचं वृत्त आहे.

****

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं वृत्त असून, या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

कोरोना काळातल्या प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राजकीय आणि सामाजिक आंदोलनातल्या ज्या गुन्ह्यांमध्ये 31 डिसेंबर 2021 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरच्या एकूण नऊशे शहाण्णव पदांच्या सुधारित आकृतीबंधात अपर संचालक हे नियमित पद निर्माण करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून त्यासाठी आवश्यक पदं निर्माण करण्यासही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अंमलबजावणी संचालनालय - ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. यासंदर्भात त्यांनी आज ईडीला पत्र पाठवलं आहे. नॅशनल हेरॉल्डशी संबंधीत काळा पैसा वैध केल्या प्रकरणात ईडीने त्यांना १३ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे पत्र पाठवले होते. परंतु, कोरोनाची लागण झाल्यामुळे गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उद्या त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं अपेक्षित होतं. परंतु, त्यांनी आज ईडीला पत्र पाठवून चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

****

आषाढी वारीसाठी जगत्‌गुरू गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणे शहर सज्ज झालं आहे. पुणे महापालिकेनं दोन्ही पालख्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी केली आहे. पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासोबतच महापालिकेनं यंदा प्रथमच आरोग्य वारी ही संकल्पना राबवून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विशेष काळजी घेण्याची तयारी केली आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोहोळ्यानं काल टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात आळंदीहून पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. दोन वर्षांच्या खंडानंतर अलंकापुरीमध्ये हजारो भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवला. कपाळावर चंदनी टिळा, गळ्यात तुळशी माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेतलेल्या वैष्णवांसह साडेचारशेहून अधिक दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत.

****

हर्सूल इथलं सुका कचरा प्रक्रिया केंद्र नव्यानं उभारून एका महिन्यात सुरू करण्याचे तसंच चिकलठाणा घनकचरा प्रक्रिया केंद्राचं काम सात दिवसात सुरू करण्याचे आदेश औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. या दोन्ही केंद्रांच्या, आग लागून झालेल्या नुकसानाची पाहणी करताना त्यांनी हे आदेश दिले. दरम्यान, चिकलठाणा इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करत असताना तेरा सीसीटीव्ही कॅमेरांपैकी दोन कॅमेरे बंद असल्याचं आढळून आल्यानं तिथल्या ठेकेदाराला दोन लाख रुपये दंड ठोठावण्याचे आदेशही त्यांनी दिले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...