Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 23 June 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शिवसेनेतल्या सहकाऱ्यांनीच अविश्वास दाखवणं, अत्यंत क्लेशदायक, मुख्यमंत्री
आणि शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार असल्याचं स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरे यांनी
शासकीय निवासस्थान सोडलं
· पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असल्याचं
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं मत
· पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार योगेश कदम यांच्यासह चार आमदार बंडखोर
गटात सामिल
· महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचं स्पष्टीकरण
· शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद पदावर आमदार भरत गोगावले यांची बंडखोर एकनाथ
शिंदे गटाकडून नियुक्ती
· संपूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा राज्य
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार २६० रुग्ण, मराठवाड्यात ३२ बाधित
आणि
· मराठवाड्याच्या अनेक भागात पाऊस
सविस्तर बातम्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी शिवसेनेतल्या आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्यावर
अविश्वास दाखवणं, ही बाब अत्यंत क्लेशदायक असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
म्हटलं आहे. राज्यातल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल जनतेशी संवाद
साधला. या सर्व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष समोर येऊन, आपल्याशी संवाद साधल्यास, आपण तत्काळ
मुख्यमंत्रिपद तसंच शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडण्यास तयार असल्याचं, स्पष्ट केलं.
ते म्हणाले...
Byte …
मला दु:ख कशाचं झालेलं आहे.., आश्चर्य कशाचं
वाटलेलं आहे.., धक्का, हो धक्का कशाचा बसलेला आहे.., काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली
कि आम्हाला मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे नको, तर तो त्यांचा विचार आहे. पण त्यांनी माझ्यावर
भरोसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्रिपदी नको असेल, तर काय करायचं?
मग मला हेच म्हणायचं की तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? जर त्यांच्या पैकी
एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.
मला कोणताही मोह नाही. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे. मी दोन्ही पदं
सोडायला तयार आहे. पण मी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल,
मला आनंदाने मान्य आहे.
लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते तो जिंकतो. शिवसैनिकांनी आपल्यावर
अविश्वास ठरावाची वेळ येऊ देऊ नये, एकाही शिवसैनिकाचं मत आपल्याविरुद्ध गेल्यास, ते
आपल्यासाठी लाजिरवाणं ठरेल, असं मुख्यमंत्री म्हणाले...
Byte…
लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते
तो जिंकतो. मग ती संख्या तुम्ही कशी जमवता, हे नगण्य असतं. मी ज्यांना माझे मानतो,
त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेले आहेत? किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील..? नाही,
एकाने जरी माझ्या विरुद्ध मतदान केलं तरी माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यावरती
त्यांना अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांनी मला सांगावं, मी त्या
नावाचा उच्चार करणार नाही. वाच्यता करणार नाही. तुम्ही सांगा, मी मुख्यमंत्रिपद सोडतो.
बांधवांनो आणि भगिनींनो, एकच सांगेन की, जे प्रेम तुम्ही आजपर्यंत दिलं. हे सदैव असंच
कायम ठेवा. एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
शिवसेना आणि हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, शिवसेना आणि हिंदुत्व
वेगळं होऊ शकत नाही, असं ठाकरे यांनी नमूद केलं. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना
राहिली नाही, असं भासवलं जात आहे. मात्र शिवसैनिकांना जे मिळालं, ते बाळासाहेबांच्यानंतरच्या
शिवसेनेनं दिलं, हे लक्षात घ्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Byte…
२०१४ साली सुद्धा जी शिवसेना लढली होती, आणि
एकट्याच्या ताकतीवरती प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आणले, त्यातले काही नंतर
जे मंत्री झाले. ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती. गेली अडीच
वर्ष मी स्वत: मुख्यमंत्री आहे. माझ्या सोबत पहिल्या आणि आताच्या मंत्रिमंडळातले जे
काही सहकारी आहेत, ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. शिवसेना
हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलंय का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली
नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेनाच पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काही
सगळं मिळालं, ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलं. हे मी म्हणेन, पुन्हा तुम्ही
लक्षात ठेवा.
'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ', या म्हणीप्रमाणे सहकाऱ्यांनी वागू नये, असंही
मुख्यमंत्री म्हणाले. ज्या सहकाऱ्यांना माझ्या मुख्यमंत्रिपदावर आक्षेप आहे, त्यांनी
तसं स्पष्ट सांगावं, असं आवाहन ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यावर
पुढच्या एक दोन महिन्यातच कोविडचा प्रादुर्भाव झाला. त्या संकटातुनही जनतेच्या सहकार्याने
आपण बाहेर पडल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या
अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्यावर विश्वास दाखवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी टाकली,
प्रशासनानेही आपल्याला सांभाळून घेतलं, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आपल्या
या संवादातच मुख्यमंत्र्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडत असल्याचं सांगितलं,
त्यानंतर काही वेळानं ते शासकीय निवासस्थान सोडून मातोश्री या निवासस्थानी गेले. यावेळी
वर्षा बंगल्यासमोर तसंच रस्त्याच्या दुतर्फा शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसैनिकांच्या
घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला होता.
****
मुख्यमंत्र्यांच्या या संबोधनानंतर, एकनाथ शिंदे यांनी, पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी
महाविकास आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असल्याचं ट्वीट केलं आहे. गेल्या अडीच वर्षात
महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक
पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचं, शिवसेनेचं मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे
महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रत्नागिरी जिल्ह्यातील
आमदार योगेश कदम यांच्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या शिवसेना समर्थक अपक्ष
आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावित गुवाहाटीला
जाऊन एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले.
शिंदे यांच्यासोबत असलेले अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख
हे काल घरी परतले. अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, भाजपच्या संगनमताने एकनाथ
शिंदे यांनी हे षडयंत्र रचलं, असा आरोप केला. सूरतमध्ये असतांना आपल्याला रक्तदाब किंवा
हृदयासंदर्भात कोणतीही समस्या नव्हती, तरीही आपल्याला गुजरात पोलिसांनी जबरदस्तीनं
दवाखान्यात नेलं, असा आरोपही त्यांनी केला.
****
शिवसेनेतल्या या बंडामुळे माहविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला असताना,
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचं
स्पष्ट केलं.
महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काल काँग्रेस आमदारांची बैठक
झाली. या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे निरीक्षक कमलनाथ यांनी महाविकास
आघाडीला आपला पाठिंबा कायम असल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे यांच्या पाठीशी असून, सरकार
समोर संकट असलं तरी यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवा, असं शरद पवार यांनी यावेळी
सांगितलं.
****
शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या स्वाक्षरीचे दोन प्रस्ताव विधानसभा
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सादर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधीमंडळ
पक्षप्रमुखपदी म्हणून कायम ठेवावं तसंच मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड
तत्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले यांची निवड करावी, असं यात नमूद करण्यात आलं
आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक काल मुंबईत झाली. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं ते, या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन
पद्धतीनं सहभागी झाले होते.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
देण्यात आली. २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५०
हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार असल्याचाही निर्णय
यावेळी घेण्यात आला.
या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत
पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे दाखल केलेले खटले
मागे घेण्याची कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रिय समित्यांना काल मान्यता देण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तर उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या कळंब इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी
न्यायाधीश न्यायालय स्थापन करून, त्यासाठी आवश्यक पदं निर्माण करण्यासही कालच्या मंत्रिमंडळ
बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार २६० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ४५ हजार २२ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४७ हजार ८९२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल तीन हजार
५३३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ७२ हजार ४९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
२४ हजार ६३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
१३, उस्मानाबाद आठ, लातूर सात, तर जालना जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात काल पाऊस झाला.
जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. बदनापूर तालुक्यातल्या
रोशनगाव, सागरवाडी, शेलगाव, मात्रेवाडी, सोमठाणा, रोशनगाव या भागातही मध्यम स्वरुपाचा
पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरीसह भायगव्हाण, बाचेगाव, वडीरामसगाव, हिवरा,
भार्डी, रुई या गावांच्या परिसरातही मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर भोकरदन तालुक्यातल्या
धावडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतांमधून पाणी वाहिले. या पावसामुळे खरिपातल्या
रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे.
औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
नांदेड शहरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतरही उशिरापर्यंत पावसाची
रिमझिम सुरूच होती.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. हिंगोली शहर आणि
परिसरातही काल दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. जिल्ह्यात काही भागात शेतकर्यांनी हळद
आणि कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, मुंबईसह कोकण तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात, येत्या पंचवीस तारखेपर्यंत
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्रानं
वर्तवली आहे.
****
आषाढी वारीसाठी जगत्गुरू गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराज पालखी सोहळा काल पुण्यात दाखल झाला. पुणे महापालिकेकडून पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच,
पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासोबतच महापालिकेनं
यंदा प्रथमच आरोग्य वारी ही संकल्पना राबवून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं
विशेष काळजी घेण्याची तयारी केली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर हजारो भाविकांनी हा
सोहळा प्रत्यक्ष अनुभवला. कपाळावर चंदनी टिळा, गळ्यात तुळशी माळा आणि खांद्यावर भगव्या
पताका घेतलेल्या वैष्णवांसह साडेचारशेहून अधिक दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या
आहेत.
****
हर्सुल इथलं सुका कचरा प्रक्रिया केंद्र नव्यानं उभारून एका महिन्यात सुरू करण्याचे,
तसंच चिकलठाणा घनकचरा प्रक्रिया केंद्राचं काम सात दिवसात सुरू करण्याचे आदेश, औरंगाबाद
महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. या दोन्ही
केंद्रांच्या, आग लागून झालेल्या नुकसानाची पाहणी करताना ते काल बोलत होते.
दरम्यान, चिकलठाणा इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करत असताना तेरा
सीसीटीव्ही कॅमेरांपैकी दोन कॅमेरे बंद असल्याचं आढळून आल्यानं तिथल्या ठेकेदाराला
दोन लाख रुपये दंड ठोठावण्याचे आदेशही पाण्डेय यांनी दिले.
****
औरंगाबाद इथं काल शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शिवसेना आमदार अंबादास
दानवे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात करण्यात आलेल्या या निदर्शनात एकनाथ शिंदे यांच्या
बंडाचा निषेध करण्यात आला. शिवसैनिक विशेषत: महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी
झाल्या. आपली भूमिका मांडताना या महिला कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत कार्यकारी अभियंत्याला
काल ३० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. संजयकुमार कोकणे असं या अभियंत्याचं
नाव असून, कामाचं देयक मंजूर करून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
****
No comments:
Post a Comment