Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे
राजन साळवी यांच्यात थेट लढत.
·
अमरावती इथल्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी एनआयए कडून तपास सुरू.
·
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्ती संघटनेकडून
बरखास्त.
आणि
·
बुद्धीबळ ऑलिम्पियाड मशाल रॅली आज नागपूरमध्ये दाखल.
****
विधानसभा
अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज
दाखल केला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता भारतीय जनता पक्षाचे राहुल नार्वेकर विरुद्ध
शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार
संघातून निवडून आलेले साळवी शिवसेनेचे उपनेते आहेत. साळवी यांचा अर्ज भरतेवेळी महाविकास
आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू उपस्थित होते.
दरम्यान,
या निवडणुकीसाठी विधानसभेचं उद्या आणि परवा विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांच्या गटासह आज गोव्याहून मुंबईकडे
रवाना झाल्याचं वृत्त आहे.
****
अमरावती
इथल्या उमेश कोल्हे या व्यावसायिकाच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआयए
अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. ‘एनआयए’चं पथक शहरात दाखल झालं असून,
त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. ‘एनआयए’च्या पथकाने घटनास्थळाची
पाहणी केली तसंच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचीसुद्धा झाडाझडती घेतल्याची माहिती
विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे. या हत्येमागचा
हेतू, आणि या हत्येशी काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा संबंध आहे का, याची चौकशी करण्याचे
आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
या
प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांच्यासह इतर नेत्यांनी
केली होती. अमरावतीच्या पोलिस आयुक्तांच्या अकार्यक्षमतेमुळे गुन्हे वाढले असून, त्यांची
बदली करावी अशी मागणी खासदार नवनीतकौर राणा यांनी केली आहे.
दरम्यान,
सखोल चौकशीअंती ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी
केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून ही माहिती दिली. २१ जून
रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा
यांच्या समर्थनार्थ त्यांनी समाजमाध्यमांवर काही मजकूर टाकला होता, असं सांगण्यात येतं
आहे.
****
अहमदनगर
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तीदंत तस्करी प्रकरणी सहा तस्करांना आज अटक केली.
औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका इथं हस्तीदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती, सापळा रचून पोलिसांनी या सहा तस्करांना अटक केली. व्यंकटेश
स्वामी, महेश काटे, महेश मरकड, सचिन पनाले, विशाल पनाले, संकेत मजल अशी या आरोपींची
नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून कोट्यवधी रुपयाचं हस्तीदंत जप्त करण्यात आलं आहे.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पथकर वसुलीला विरोध करत आज सकाळी ओसरगाव इथल्या
पथकर नाक्यावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रलंबित
समस्या सुटत नाहीत. जमीन मालकांना भूसंपादनाचा मोबदला मिळत नसून महामार्ग वाहतुकीस
योग्य होत नाही तोपर्यंत सर्व वाहन चालकांना पथकर माफी द्यावी, त्याशिवाय नाका सुरू
करू देणार नाही, असा इशार शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पथकर प्राधिकरणाला दिला आहे.
****
लोकपाल
आणि लोकायुक्त बाबत सरकार जनजागृती करतांना दिसत नाही, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं लोकपाल आणि
लोकायुक्त अधिनियम २०१३ या कायद्याच्या पुस्तकाचं प्रकाशन आज हजारे यांच्या हस्ते झालं
त्यावेळी ते बोलत होते. हा कायदा परिणामकारक असून कार्यकर्त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती
करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या पुस्तकाचं लेखन शिवाजी खेडकर यांनी केलं आहे.
****
बँकांमधे
नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी
दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट
वाचता येईल असा स्वच्छ असला पाहिजे. दुर्दशा झालेल्या नोटा तसंच चलनातून बाद ठरवलेल्या
मालिकेतल्या नोटा पुनर्प्रक्रीयेसाठी पाठवाव्या असंही रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
अशा नोटा तसंच बनावट नोटा वेगळ्या काढण्याची क्षमता या यंत्रांमधे असावी. या यंत्रांची
देखभाल दुरुस्ती नियमितपणे करण्याचे आणि तसं प्रमाणपत्र वेळोवेळी जारी करण्याचे निर्देश
रिझर्व बँकेनं काल जारी केले आहेत.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत
या लसीच्या १९७ कोटी ८४ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल १७ हजार ९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४ हजार ६८४ रुग्ण
बरे झाले. देशात सध्या एक लाख ९ हजार ५६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे
होण्याचा दर ९८ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.
****
अग्निपथ
योजनेअंतर्गत लष्कर आणि नौसेनेत अग्निवीरांच्या भरतीच्या नोंदणीला सुरुवात झाली असल्याची
घोषणा रक्षा मंत्रालयानं केली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात अग्निवीरांची भरती चार
वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. ४ वर्षात २५ टक्के अग्निवीरांना त्यांची
योग्यता, इच्छा आणि शारिरीक पात्रतेच्या निकषांवर नियमित केलं जाणार आहे. उर्वरित ७५
टक्के अग्निवीर ११ ते १२ लाख रुपयांच्या सेवानिधी पॅकेजसाठी पात्र राहतील. पहिल्या
४ वर्षात अग्निवीरांना ३० ते ४० हजार रुपये मासिक वेतन दिलं जाणार आहे.
****
खासदार
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. महासंघाच्या सूचनेनुसार राज्य कुस्तीगीर परिषदेने १५ तसंच २३ वर्ष वयोगटांतील
कुस्ती स्पर्धांचे आयोजन केलं नाही, त्यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
महासंघाने त्यावर संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देऊनही, राज्य कुस्तीगीर परिषदेनं
दुर्लक्ष केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती, भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव
विनोद तोमर यांनी दिली.
****
विद्यार्थ्यांनी
आपली रूची ओळखून आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावं, असा सल्ला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीश चव्हाण यांनी दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं मुप्टा शिक्षक
संघटना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गंगापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव
इथं दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आज प्रत्येक क्षेत्रात
आपली गुणवत्ता सिध्द करू लागला आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा, योग्य
मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच ते मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाहीत असंही चव्हाण
म्हणाले.
****
बुद्धीबळ
ऑलिम्पियाड मशाल रॅली आज सकाळी नागपूरमध्ये पोहोचली. ग्रँड मास्टर रौनक साधवानी, दिव्या
देशमुख आणि संकल्प गुप्ता यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि इतर अधिकारी
यावेळी उपस्थित होते. ही बुद्धीबळ ऑलिम्पियाड मशालज्योत आता पुणे आणि त्यानंतर मुंबईला
जाणार आहे. बुद्धीबळ स्पर्धांच्या इतिहासात इंटरनॅशनल चेस फेडरेशनद्वारे स्थापित मशाल
रॅलीची सुरुवात करणारा भारत हा पहिलाच देश आहे. येत्या २८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान
चेन्नईत ४४ वी इंटरनॅशनल चेस फेडरेशन बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धा होणार आहे.
****
पंढरपूर
इथल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या
भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या वतीने लाडू प्रसाद
विक्री पुन्हा सुरु केलं असल्याची माहिती मंदीर समितीचे सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज
औसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानूसार
‘श्री’ चा लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता.
****
पर्यावरणीय
समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली प्लास्टिक
बंदी ही आणखी एक स्वातंत्र्य चळवळ व्हावी, विद्यार्थ्यांनी या चळवळीत सक्रीय सहभाग
घ्यावा, असं आवाहन पर्यावरणतज्ज्ञ आणि तेर पॉलिसी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश शेंडे
यांनी केलं. काल १ जुलैपासून देशभरात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर
आज पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जनजागृती करण्यासाठी
मानवी साखळी केली होती. या वेळी राजेश शेंडे बोलत होते.
****
No comments:
Post a Comment