Tuesday, 9 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

****

·      महिनाभरापासून प्रतिक्षा असलेला राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

·      नांदेड शहरातल्या रस्ते विकासासाठी शंभर कोटी तर नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा, आणि हिंगोली रस्त्यांसाठी १९२ कोटी रुपयांच्या निधीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा 

·      हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथल्या लमाण देव आणि आदिवासी भवनाला दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर

·      शिक्षक पात्रता परिक्षा घोटाळ्यात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द, आपल्या मुलींकडे अपात्रतेची प्रमाणपत्र, हा बदनामीचा प्रकार असल्याच आमदार सत्तार यांचा आरोप

·      शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

·      विधान परिषदेतच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची शिवसेनेची शिफारस  

·      संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेत सन्मानपूर्वक निरोप  

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १ हजार पाच रुग्ण, मराठवाड्यात ४७ बाधित  

 आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप, २२ सुवर्णासह एकूण ६१ पदकं जिंकून भारत चौथ्या स्थानावर, शेवट्या दिवशी बॅडमिंटनमध्ये तीन तर टेबल टेनिसमध्ये एक सुवर्णपदक  

****

बातमीपत्राला सुरवात करण्यापूर्वी, आजादी का अमृत महोत्सवानिमित्त, प्रादेशिक वृत्तविभाग आणि एमजीएम विद्यापीठ आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेत आजचा प्रश्न...

****

आता सविस्तर बातम्या

****

जवळपास महिनाभरापासून प्रतिक्षा असलेला राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. सकाळी ११ वाजता मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर १७ ऑगस्टपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड परिसरातल्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नांदेड इथं विविध पायाभूत सुविधा तसंच रस्ते विकासाच्या कामांचं प्रातिनिधीक स्वरूपात भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नांदेडला जोडणाऱ्या पूर्णा, हिंगोली रस्त्यांसाठी १९२ कोटी रुपये, तर नांदेड शहरातल्या रस्ते विकासासाठी शंभर कोटी रुपये निधी यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

नांदेड इथल्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयाला मुख्यमंत्र्यांनी काल भेट दिली. पतसंस्थेची या क्षेत्रातली कामगिरी अभिमानास्पद असून, अशा संस्थांचं बँकेत रुपांतर व्हावं, यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, यासंदर्भात केंद्र शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरगाव पूल इथं अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. 

हिंगोली इथं जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, बेरोजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार असल्याचं सांगितलं. कळमनुरी इथल्या लमाण देव आणि आदिवासी भवनाला दहा कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील, विपश्यना केद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ, बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारानं हिंगोली इथं काल कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून या कावड यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रे हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला.

****

शिक्षक पात्रता परिक्षा - टीईटी घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात हजार ८७४ विद्यार्थ्यांची नावं आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या मुलींनी परिक्षा दिल्या मात्र त्या नापास झाल्या असून, त्यांच्याकडे तसं प्रमाणपत्र देखील असल्याचं सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना केला. 

****

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय -ईडीनं राऊत यांना अटक केली होती, त्यांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. राऊत यांची कोठडी वाढवावी अशी ईडीनं मागणी केली, मात्र न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील याप्रकरणी ईडीने चौकशी केली.

****

विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेनं आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली आहे. दानवे यांच्या नावाचं शिफारस पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे.

****

नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला. यामध्ये नैसर्गिक आपत्ती मधील गरजूंना मदत, कृषि विभाग, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. नियोजित मुदतीच्या चार दिवस आधीच अधिवेशनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत ३८ तास कामकाज झालं, तर ४७ तास गोंधळामुळे वाया गेले, असं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. लोकसभेत ४४ तास कामकाज झालं आणि ७ विधेयक मंजूर झाल्याचं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.

****

उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं, काल राज्यसभेत सदनात त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सदस्यांनी यावेळी नायडू यांच्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांना शुभेच्छा दिल्या. नायडू यांची नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनानं नवीन उंची गाठल्याचं पंतप्रधान म्हणाले. नायडू यांच्या कार्यकाळात सदनाच्या कामकाजात ७० टक्के ‍वाढ झाली असून, १७७ विधेयकं मंजूर करण्यात आली. तरुण वर्ग, समाज आणि राष्ट्र त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊ शकतात, असं ते म्हणाले. नायडू यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असला, तरी राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अनुभव नेहमीच मार्गदर्शक ठरतो, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. संसदेचं अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर दोन्ही सदनांच्या संयुक्त समारंभातही नायडू यांना निरोप देण्यात आला.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार पाच रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ६० हजार ७३ झाली आहे. काल या संसर्गानं चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १३ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ४४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, लाख ६२६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २०, लातूर १३, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच, तर बीड जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.

****

काँग्रेस पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किलोमीटरच्या या पदयात्रा काढल्या जात आहेत. आज ऑगस्ट क्रांतीदिनी या पदयात्रांना प्रारंभ होत असून, १४ तारखेला समारोप होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सेवाग्राम इथन पदयात्रेचा शुभारंभ करणार आहेत.

****

आज ऑगस्ट क्रांती दिनी औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर स्वराज्य महोत्सवाअंतर्गत सामूहिक राष्ट्रगायन होणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. जवळपास १६ हजार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्व शासकीय आस्थापना आणि स्वयंसेवी संस्था तसंच नागरिकांनी सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

*****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात कोल्हा इथं स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्याक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा या संदर्भात काल ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. यात जिल्हा परिषद शाळेतले शंभराहून जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक, समाजसेवक आणि सैनिक यांच्या वेशभूषा परिधान करून देशभक्तीपर भाषणं सादर केली.

****

बर्मिंगहॅम इथल्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्यात काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. पुढल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियामधल्या विक्टोरिया इथं होणार आहेत. या स्पर्धेत भारत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकं जिंकून चौथ्या स्थानावर राहीला

दरम्यान, काल शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडुंनी पदकांची लयलूट करत, चार सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. 

बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पी.व्ही.सिंधूनं, पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं तर पुरुष दुहेरीत चिराग - सात्विक जोडीनं सुवर्ण पदक पटकावलं. अंतिम फेरीच्या सामन्यात सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली चा, २१-१५, २१- १३ असा पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं तिचं वैयक्तिक तिसरं पदक, तर पहिलच सुवर्णपदक आहे. या पूर्वी तिनं २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य, तर २०१८ च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.

पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं मलेशियाच्या बॅटमिंटनपटूचा १९-२१, २१-, २१-१६ असा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी - सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीने इंग्लंडच्या लेन बेन आणि सीन मेंडी जोडीचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. बॅटमिंटनमध्येकिदम्बी श्रीकांतनं कांस्य पदक जिंकलं. टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत अचंता शरत कमल याने काल सुवर्णपदक पटकावलं. तर जी साथियान याने कांस्य पदक जिंकलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे दहा दरवाजे काल अर्धा फूट उंच उघडून पाच हजार २४० घनफूट वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या १९ हजार ८६५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, जलसाठा ९३ पूर्णांक ७० शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.

हिंगोली जिल्ह्यातलं इसापूर धरणात देखील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाच्या १३ दरवाजातून २१ हजार ४५९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडलं जात आहे. 

*****

राज्यात पुढचे तीन दिवस ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर जालना, बीड, आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

****

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...