Sunday, 21 August 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचं लातूर जिल्ह्यातलं प्रायोगिक तत्वावरचं काम पथदर्शक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

·      नोकर भरतीदहीहंडीचा नवीन खेळ म्हणून समावेश, अधिकचं आरक्षण नाही- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

·      येत्या दोन वर्षात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      मुंबईत हल्ला करण्याच्या धमकीचा कसून तपास सुरू,  शिर्डीएका संशयित दहशतवाद्याला अटक  

·      औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठीचा उर्वरित २०६ कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचं आश्वासन

·      ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं बोरडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा

 आणि

·      दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बॉब्वेवर पाच गडी राखून विजय

****

आता सविस्तर बातम्या

****

हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचं प्रायोगिक तत्वावर लातूर जिल्ह्यात केलेलं काम देशाला पथदर्शक होईल, असं मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल लातूर इथं एका बैठकीत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रायोगिक तत्वावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेलं हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना राज्यपालांनी केली.

लातूर जिल्ह्यात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, शिवाय इथंच त्यावर प्रक्रिया पण होते हे कौतुकास्पद असून, काळ्या सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं. लातूर इथल्या उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसॅबिलिटी रिसर्च सेंटरलाही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली.

लातूर दौऱ्यापूर्वी काल सकाळी राज्यपालांनी परळीजवळ गोपीनाथ गडावर जाऊन, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

****

नोकर भरतीसाठी असलेल्या खेळांच्या आरक्षणामध्ये गोविंदांना अधिकचं आरक्षण दिलेलं नाही, तर या आरक्षणातच खेळ म्हणून नव्यानं दहीहंडीचा समावेश केला असल्याचं स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी नोकरीत गोविंदांना ५ टक्के आरक्षण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ा निर्णयावर नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलतांना विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली असून गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला आहे, मात्र असे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात, असं पवार यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातल्या इतर उमेदवारांवर अन्याय होणार नाही का, याचा सारासार विचार राज्य सरकारनं केला नाही, असा आरोप त्यांनी केला. गोविंदांना नाउमेद करण्याचा आपला विचार नाही, मात्र अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे राज्यातल्या गोविंदांचं रेकॉर्ड कसं ठेवणार, गोविंदा पथकातल्या कमी शिकलेल्या मुलांना आपण कोणती नोकरी देणार, असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. 

****

दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्यावर बोलताना, एखाद्या विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी भावनेच्या भरात निर्णय घेणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं नाव उज्ज्वल केलेले अनेक खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, शासनानं प्रथम या खेळाडूंना न्याय द्यावा, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयाला आपला विरोध नाही, मात्र याबाबत कोणते निकष लावणार हा संभ्रम असल्याचंही भुजबळ म्हणाले.

****

येत्या दोन वर्षात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीनं वैद्यकीय शिक्षण विभागानं तयारी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थेसोबतची आढावा बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय सुविधा निर्मितीसाठी २०३० पर्यंतचा आराखडा विभागानं तयार केला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागानं वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण आणल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. यानुसार इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या मदतीनं प्राथमिक टप्प्यात नागपूर इथं सुपरस्पेशलिटी, तसंच औरंगाबाद आणि लातूर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात असल्याचं ते म्हणाले.

****

मुंबईत हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश काल मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला. या संदेशामुळे सर्व यंत्रणा सावध झाल्या आहेत. हा संदेश नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाकिस्तानी दूरध्वनी क्रमांकावरून आल्याचं निष्पन्न झालं आहे. २६/११ सारखा हल्ला करणार असल्याचं या धमकीमधे म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.

****

राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकानं शिर्डीतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक केलेल्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसनं पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसांच्या गाडीला स्फोटकं लावून उडवून देण्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. 

****

औरंगाबाद स्मार्ट सिटी साठी केंद्र शासनाकडून उर्वरित २०६ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिलं आहे. डॉ कराड आणि राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी काल औरंगाबाद इथं स्मार्ट सिटी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कलाग्राम इथं ग्लो गार्डन उभारण्यासाठी १० कोटी रुपये निधी तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र "लाईट हाऊस" इथून प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना मुद्रा योजना अंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याची घोषणाही डॉ. कराड यांनी यावेळी केली. सहकार मंत्री सावे यांनी नागरिकांची तक्रार घेऊन त्यांचं निवारण करण्यासाठी सक्षम कॉल सेंटर उभारण्याची सूचना केली.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांचं डिजिटल शाळांमध्ये रुपांतर करण्यासाठी किमान १० डिजिटल वर्गांचं अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात यावं, असंही डॉ कराड यांनी सूचित केलं

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या राजीव गांधी यांच्या पुतळयास औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडासाजरा  करण्यात येणार आहे. राज्यातल्या विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या आणि अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धींगत करुन हिंसाचार टाळण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जातो.

****

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात चापानेर, रामनगर इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. खरडून गेलेल्या शेतजमिनींना आगामी काळाचा विचार करून भरीव मदतीची तरतूद करण्याची गरज अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुरामुळे दगावलेली जनावरं, तसंच ढासळलेल्या विहिरींसाठीही मदत करण्याबाबत त्यांनी सूचना केली.

****

शपथपत्र किंवा करार करून संघटना मोठी होत नसते, असं शिवसेनेच्या शिंदे गटाचे औरंगाबाद इथले नेते राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे, ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. बाळासाहेबांचे विचार ज्यांच्या मनात आहेत, ते शिंदे गटासोबत जोडले जात आहेत. आगामी निवडणुकीत सर्व सामान्य जनतेच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या नवीन चेहऱ्यांना आपल्या गटाकडून संधी दिली जाणार असल्याचं जंजाळ यांनी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १ हजार ८५५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख २ हजार ५१ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १९३ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ७२० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २२ हजार ४९२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर जालना जिल्ह्यात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  नवीन रुग्णांमध्ये लातूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी ७, परभणी ४, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी ३  तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं बोरडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा काल औरंगाबाद इथं साजरा करण्यात आला. एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन ९५ वा व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झालं. सभोवतीच्या घटनांमुळे लेखक करुणा प्रेरित होतो. तेव्हा त्या करुणेतून विशेष कलाकृती जन्माला येत असते. यामुळेच पाचोळा ही कांदबरी आपल्याला पन्नास वर्षानंतरही चर्चा करण्यासाठी भाग पाडत असल्याचं सासणे यावेळी म्हणाले.

यावेळी परिसंवाद, अभिवाचनासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले. बोराडे यांच्या या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केली. युवा कादंबरीकार सुनिता बोरडे, मेधा पाटील, प्रसाद कुमठेकर, सुशील धसकटे, संतोष जगताप यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

****

अंबाजोगाई साहित्य संमेलनात काल दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले. अंबाजोगाईचे अनिवासी पत्रकार, अंबाजोगाई परिसरातील शेती आणि शेतकरी, मान्यवरांच्या मुलाखती यासह माहेरवाशिणींचा परिसंवादही काल पार पडला. संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांच्या साहित्यावरील परिसंवादात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. अनिवासी अंबाजोगाईकर या संकल्पनेवर आधारित या संमेलनाचा आज समारोप होणार आहे.

****

क्रिकेट

दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं काल झिम्बॉब्वेवर पाच गडी राखून विजय मिळवला, तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणारा झिम्बॉब्वेचा संघ ३९ व्या षटकांत १६१ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघानं २६ व्या षटकांतच पाच बाद १६७ धावा केल्या. यष्टीरक्षक संजू सॅमसननं सर्वाधिक ४३ धावा केल्या. शिखर धवन तसंच शुभमन गिलने प्रत्येकी ३३, दीपक हुडानं २५, तर इशान किशन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी सहा धावा केल्या. मालिकेत तिसरा सामना उद्या हरारे इथचं होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पिकाचं गोगलगायींनी केलेलं आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, शेतकरी अडचणी आहेत असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील सरमकुंडी, तांदळवाडी, जवळका इथं पावसामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी काल खासदार निंबाळकर आणि शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी निंबाळकर यांनी केली. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करुन नुकसानाचे फोटो अपलोड करावेत, नुकसाना संदर्भात तहसिलदारांकडे अर्ज करावा असं आवाहनही त्यांनी केलं.

****

रायगड - पुणे - माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात चारचाकी दरीत पडून   झालेल्या भीषण अपघातात तीन तरूण ठार झाले असून अन्य ४ जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी हा अपघात झाला. वाशिम जिल्ह्यातील हे सर्व तरूण पर्यटनासाठी कोकणात आले होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला.

औरंगाबादनजीक काल धुळे सोलापूर महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अन्य एका अपघातात २ जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. खुलताबाद इथल्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी एका दुचाकीवर जाणाऱ्या ३ जणांना  चारचाकीनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

****

कृषी संस्कृतीशी महिलांचं असणारं नातं सांगणारा बंजारा बांधवांचा तीज उत्सव राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून या दहा दिवसीय तीज उत्सवाला सुरुवात होते, बांबू पासून बनवलेल्या परडीमध्ये वारुळाची माती आणून त्यात गहू पेरले जातात. त्यानंतर पारंपरिक गाणे आणि नृत्य करत हा उत्सव साजरा केला जातो. सध्या ठिकठिकाणच्या तांड्यांवर बंजारा लोकगीतांचे स्वर घुमत असल्याचं आमच्या वाशिमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...