Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 09
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०9 ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार;
भाजप तसंच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
·
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप
पटवर्धन यांचं आज पहाटे मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं
निधन.
·
ऑगस्ट क्रांती दिनी
औरंगाबाद इथं १६ हजार विद्यार्थ्यांचं सामुहिक राष्ट्रगीत गायन.
आणि
·
ईसापूर धरणातून पाणी विसर्गामुळे पैनगंगा नदीला पूर; विदर्भ
आणि मराठवाड्याला जोडणारा पूल पाण्याखाली;वाहतुक ठप्प.
****
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. मुंबईत राजभवनाच्या
दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या
शिंदे गटातल्या प्रत्येकी नऊ सदस्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि
गोपनीयतेची शपथ दिली.
शिंदे
गटातून उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव
पाटील, संजय राठोड, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी, तर भारतीय जनता पक्षाकडून, चंद्रकांत
पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे,
मंगलप्रभाग लोढा, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या या सर्व नव्या मंत्र्यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं
आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं.
मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व दिलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नव्या
मंत्रिमंडळात संजय राठोड यांच्या समावेशावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी
आक्षेप घेतला आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड
यांना पुन्हा मंत्रिपद देणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राठोड यांच्या विरुद्ध
न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
या
मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी
यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, राज्यातल्या स्त्री शक्तीवर हा अन्याय असल्याचं
ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
****
नव्या
मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा आक्षेप लवकरच दूर होईल, असा खुलासा उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान,
ज्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं असल्याचं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्य
विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
संयुक्त
जनता दलाचे प्रमुख नीतीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
आज दुपारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नीतीशकुमार यांनी राजीनामा सादर केला.
त्यासोबतच १६० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत, नवीन सरकार स्थापनेचा दावाही नीतीशकुमार
यांनी केला आहे. राजीनाम्यानंतर नीतीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या बिहारच्या
माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज पहाटे मुंबईत
ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. मोरूची
मावशी हे त्यांचं नाटक अतिशय गाजलं. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, यांसारख्या नाटकांमध्ये देखील
त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. दूरचित्रवाणीवरच्या अनेक
मालिका, चित्रपट, नाटकात त्यांनी काम केलं.
एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळाबेरीज, बॉम्बे वेल्वेट, नवरा
माझा नवसाचा आदी चित्रपटांमधल्या
त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रंगभूमी तसंच चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
रंगभूमीवरचा
हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचं अतिशय वाईट वाटतं, या शब्दात उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या २०६ कोटी ८८ लाख ४९
हजार ७७५ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात
तीन कोटी ९५ लाख मुलांना कोविड लस मात्रा देण्यात आली आहे.
****
आज
९ ऑगस्ट. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग असलेल्या
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज अभिवादन
करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण केलं, महात्मा
गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन छोडो भारत आंदोलनात ज्येष्ठ नेते लोकनायक जयप्रकाश
नारायण, राम मनोहर लोहिया यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातले लोक सहभागी झाले होते,
असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
****
काँग्रेस
पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रांना आजपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी
नऊ वाजता लाडसावंगी इथून या पदयात्रेला सुरुवात झाली, माजी आमदार कल्याण काळे यांच्या
नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले.
****
धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील
चिमठाणे इथलं क्रांती स्मारक ते दोंडाईचा अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत
कॉंग्रेस कार्यकर्ते हातात तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले.
****
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर
सामुहिक राष्ट्रगान करण्यात आलं. शहरातल्या
विविध शाळांचे आणि महाविद्यालयाचे सुमारे १६ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर नृत्य करत
सगळ्याचं लक्ष वेधलं.
****
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त बीड जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे. याचाच एक भाग म्हणून गेवराई इथं तहसीलदार सचिन खाडे
यांनी शहरातल्या विविध शाळेच्या विद्यार्थांचा सहभाग घेऊन
शहरातून ७५ मीटर लांब तिरंगा झेंड्याची शोभायात्रा काढली.
****
हिंगोली जिल्ह्यात आज जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी
काढण्यात आली. अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे
रॅलीत सहभाग घेऊन ग्रामस्थांना हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती सांगितली
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीनं
आज तिरंगा मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायतींच्या वतीने रांगोळ्या काढून
हर घर तिरंगाबाबत जनजागृती करण्यात आली.
****
औरंगाबादच्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली
आहे. धरणाचे १८ दरवाजे
एक फूट उचलून सध्या सुमारे साडे तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
धरणात सध्या ५२ हजार ७३७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून धरणातला पाणी साठा साडे
९५ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली
आहे.
****
ईसापूर
धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे पैनगंगा
नदीवरील हिंगोली जिल्ह्यातल्या शिऊर पुलावरून पाणी वाहत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला
जोडणारा शेंबाळपिंपरी ते कळमनुरी हा मार्ग आज सकाळपासून बंद झाला आहे. या मार्गावरची
बस वाहतुकही ठप्प झाली आहे.
****
गेल्या दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात
संततधार पाऊस होत असून काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. जिल्हा प्रशासनानं
पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून द्यावी
अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. निवासी
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात
आलं आहे.
****
राज्यात पुढचे तीन दिवस ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं
वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जिल्ह्यांसाठी
ऑरेंज अलर्ट तर जालना, बीड, आणि लातूर जिल्ह्यांसाठी
यलो अलर्ट जारी केला आहे.
****
मुस्लीम
बांधवांकडून आज मोहर्रम पाळण्यात आला. औरंगाबाद इथं शिया बांधवांकडून
आज यौमे आशुरानिमित्त
मातमी जुलूस काढण्यात
आला. शिया बांधवांनी हजरत हुसैन यांच्या स्मृती जागवल्या. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त
ठेवण्यात आला होता.
****
No comments:
Post a Comment