Wednesday, 10 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात अनेक भागात आज मुसळधार पाऊस सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून, चिपळूण इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी नदीला पूर आला असून, पुराचं पाणी चिपळूण शहरात घुसलं होतं. सकाळच्या सुमारास पाणी ओसरलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

गड़चिरोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु असून, बहुतांश महामार्ग बंद आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजाच्या आज पहाटे साडेपाच वाजता उघडला आहे. सात स्वयंचलित दरवाजे पैकी सहा नंबरचा दरवाजा उघडला असून, त्यातून एक हजार ४२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी नदी पातळीत वाढ होणार असून, प्रशासनानं नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राजाराम बंधार्याची पाणी पातळी ३९ पूर्णांक आठ फूइतकी झाली. यात सातत्याने वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल रात्री सावित्री नदीचं पाणी महाड शहरात घुसलं होतं, मात्र पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या कुंडलिका, पाताळगंगा, आंबा, उल्हास, या नद्यांना पूर आला आहे.

गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेलं जहाज रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातल्या पद्मदुर्ग किल्याच्या मागील बाजूस कालपासून अडकून पडलं आहे. त्यातील आठ ते दहा खलाशांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांसहित तालुका प्रशासन प्रयत्न करत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गेल्या दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. जिल्हा प्रशासनानं पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं.

****

जागतिक जैव इंधन दिवस आज पाळण्यात येत आहे. पारंपरिक जीवाष्म इंधनांना पर्याय म्हणून जैविक इंधनांचा वापर करुन कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत जनजागृतीसाठी या दिवसाचं महत्व आहे.

दरम्यान, हरियाणा पानिपत इथल्या इथेनॉल निर्मितीच्या सुधारित तंत्रज्ञान धारित प्रकल्पाचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. देशातल्या जैवइंधन निर्मितीला तसंच वापराला चालना देण्याच्या सरकारच्या उद्दीष्टाचा हा एक भाग आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यानिमित्तानं राज्यातल्या १८ जिल्ह्यात विविध प्रकारच्या ४२ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. हर घर तिरंगा उपक्रमात राज्यात २ कोटीहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. यासाठी  विविध पक्षाचे नेते, स्वयंसेवी संस्था आणि संघटना राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रध्वज वाटत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे, पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाना संबोधित केलं. राज्यात एक कोटी पा लाख आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज उस्मानाबाद इथं मोटार सायकल रॅली काढण्यात आली. युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं संयुक्त अरब अमिरातीत खेळल्या जाणाऱ्या आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं असून, के एल राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे दोन यष्टिरक्षक, तसंच आर अश्विन, युजवेन्द्र चहल आणि रवी बिष्णोई या फिरकीपटूंनाही संघात स्थान मिळालं आहे. येत्या २७ ऑगस्टपासून ही टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...