Thursday, 11 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  ११  ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांचा शपथविधी.

·      ‘घरोघरी तिरंगा’अभियान यशस्वी करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन.

·      राज्यातलं सरकार फार काळ टिकणार नाही- नाना पटोले यांची टीका.

आणि

·      जालन्यामध्ये प्राप्तीकर विभागाच्या धाडीत ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.

****

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. उपराष्ट्रपती पदाच्या ६ तारखेला झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेल्या धनखड यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा ५२८ विरुद्ध १८२ मतांच्या फरकानं पराभव केला होता.

****

रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र उत्साहानं साजरा केला जात आहे. राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण- भावांमधल्या विश्वासाचा हा सण समाजात महिलांबद्दल आदर आणि  सद्भावनेला प्रोत्साहन देईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात काम करणारे सफाई कर्मचारी, शिपाई, माळी आणि वाहनचालकांच्या मुलींकडून राखी बांधून घेत हा सण साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना विधानभवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या.

****

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिकानं राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीनं ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयात या संदर्भातला कार्यक्रम झाला, त्यावेळी शिंदे बोलंत होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले. ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

राज्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा तसंच वर्धक मात्रा देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत विधानभवनात कोविड प्रतिबंधक लसीकरण वर्धक मात्रा देण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटांचं सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केली. हे सरकार जोर जबरदस्ती करुन तसंच पैशांच्या जोरावर सत्तेवर आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. या सरकारनं तब्बल ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तसंच राज्याची तात्काळ खाते वाटपाची पंरपरा मोडीत काढली असून तीन दिवसानंतरही खाते वाटप केलेलं नाही, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये विशिष्ट महत्त्वाच्या खात्यांसाठी लढाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महागाई वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. खतं, बियाणं आणि शेतमजुरांचे भाव तिप्पट वाढले आहेत. अतीवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. येत्या सतरा तारखेपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हे विषय लावून धरणार असल्याचं पटोले म्हणाले.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या मात्र राज्याच्या जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची कोणतीच मागणी केली नसल्याची टीका  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातल्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न येत्या अधिवेशनात सभागृहात मांडणार असल्याचं ते म्हणाले. सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावं असंही पाटील म्हणाले.

****

बीड जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोयाबीन आणि विविध पिकांचं गोगलगाय किटकानं केलेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना बोंड आळीच्या धरतीवर विशेष मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या संदर्भातल्या मागणीचं निवेदन दिलं. राज्य शासनानं नुकतीच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून यात कुठंही गोगलगायींच्या प्रादुर्भावानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत नाही, असं ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटीची वेळ मागितली आहे.

****

भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते मुंबईत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभागातल्या सेवानिवृत्त तसंच सेवेत असलेल्या शौर्य विजेत्या अधिकारी आणि सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. भविष्यातली आव्हानं वेगळ्या प्रकारची असतील, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. माजी नौसेना प्रमुख ऍडमिरल विजय सिंह शेखावत, कमांडर अशोक कुमार, कमांडर अनुप वर्मा, कॅप्टन होमी मोतीवाला, सर्जन कमांडर अलोक बॅनर्जी, कॅप्टन कौस्तुभ विजयकुमार गोसावी, क्लिअरन्स डायव्हर आनंद सोपान सावंत आणि पेटी ऑफिसर आदेश कुमार या शौर्य विजेत्या माजी आजी अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

****

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२२ व्या जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं आज अहमदनगर इथं वितरण करण्यात आलं. केरळचे राज्यपाल आरीफ महोमंद खान यांच्या हस्ते आणि  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहाळ यांना यावेळी गौरवण्यात आलं. साहत्यिक रविंद्र इंगळे-चावरेकर, अभय गुलाबचंद कांता, मंगेश नारायण काळे, के.जी भालेराव, हिरालाल पगडाल यांना साहित्य पुरस्कारानं तर दत्ता भगत आणि छबुबाई चव्हाण यांना कला गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

प्राप्तीकर विभागानं जालना इथं छापे टाकून  ५८ कोटी रुपयांची रोकड, ३२ किलो सोन्यासह हिरे, मोती असा सोळा किलोंचा ऐवज अशी एकूण ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जालन्यातल्या चार स्टील व्यावसायिकांच्या निवासस्थानी, कार्यालयांत ही कारवाई झाली. यात औरंगाबादमधील एका बांधकाम व्यावसायिकाचाही समावेश आहे. गेल्या एक ऑगस्टरोजी सुरू झालेली ही कारवाई आठ ऑगस्टपर्यंत सुरू होती, अशी माहिती प्राप्तीकर विभागानं दिली. नाशिक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातल्या २६० कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आज नांदेड इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं ३७५ मीटर लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची तिंरगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेत विविध पक्षांचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीनं हडको इथंल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस, अकलूज या भागात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीमधे पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...