Thursday, 11 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १३ हजार ६०० रूपये मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्याचा - विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा इशारा

·      शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या याचिकांवरची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी पुन्हा लांबली, आता २२ ऑगस्टला सुनावणी

·      कर हस्तांतरणापोटी राज्याला सात हजार तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त

·      उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा आज शपथविधी

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८४७ रुग्ण, मराठवाड्यात ६६ बाधित

·      मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तक्रार

आणि

·      संत वाड्मयाच्या अभ्यासक आणि लेखिका वसुंधरा बनहट्टी यांचं निधन

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १३ हजार ६०० रूपये मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या निकषांनुसार दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळांनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. भरपाईसाठीची दोन हेक्टरची मर्यादाही वाढवून ती तीन हेक्टर करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पावसामुळे १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई मेट्रो तीनच्या वाढलेल्या खर्चाला देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. २०१५ मध्ये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च २३ हजार कोटी रुपये होता, तो आता १० हजार कोटी रुपयांनी वाढून ३३ हजार कोटी रुपये झाला आहे. रत्नागिरी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासही मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली.

****

कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार, तर बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी, आम्ही केली होती, त्याकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांवर अन्याय केला असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तीन हेक्टरच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे ही अट शिथिल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करुन अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला.

****

शिवसेनेच्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आता २२ ऑगस्टला होणार आहे. या आधी आठ ऑगस्टला होणारी ही सुनावणी, १२ ऑगस्टला निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सुनावणीची तारीख आणखी दहा दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यामुळे ही सुनावणी पुन्हा वेगळ्या पीठाकडे वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

राज्य सरकारांना कर हस्तांतरणाच्या दोन हप्त्यांची, सुमारे एक लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपयांची रक्कम, केंद्र सरकारनं काल वितरित केली. यामध्ये महाराष्ट्राला सुमारे सात हजार तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यांच्या भांडवली आणि विकास खर्चाला गती देण्याच्या दृष्टीनं मदत करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून, त्यानुसार राज्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली आहे.

****

देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ काल संपला.

दरम्यान, नायडू यांच्या हस्ते काल संसद भवनाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन, त्यांनी केलं.

****

देशाच्या सरन्यायाधीशपदी ज्येष्ठ न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं काल याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना २७ ऑगस्ट रोजी पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती लळीत हे ७८ दिवसांच्या कार्यकाळानंतर आठ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

****

भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातले आरोपी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाचं रूपांतर स्थायी जामिनात करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. ब्याऐंशी वर्षांचे राव यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत तशी विनंती न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात अजून आरोप निश्चित झाले नाहीत, आणि वरवरा राव यांच्या प्रकृतीत सुधारणाही झालेली नाही, म्हणून स्थायी जामीन देण्यात येत आहे, असं न्यायालयानं म्हटलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८४७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ६४ हजार ३६६ झाली आहे. काल या संसर्गानं सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १५७ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ८४० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख चार हजार ३२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ८८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ६६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २२, लातूर १८, औरंगाबाद दहा, बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी सात, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग - ई डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र देण्यास तहसीलदार टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत असून, राज्य शासनानं जिल्हा आणि तालुका प्रशासनांना तातडीनं निर्देश देऊन याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचं स्पष्ट करावं, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश तसंच नोकरभरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असल्यानं, मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, असंही चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस पात्र नागरिकांना मोफत देण्यात येत आहे. नांदेड इथले ज्येष्ठ बाल साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस घेतला असून, त्यांनी नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे.

‘‘कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारत सरकारने लस उपलब्ध करुन दिली आहे, जी की मोफत आहे. मी लसीचे दोन डोस आणि दुसरा बुस्टर डोस घेतला आहे. या सहकार्याबद्दल मी भारत सरकारचा आभारी आहे. सगळ्या भारतातील बंधू भगिनींना विनंती आहे, की त्यांनी लसीचे डोस घ्यावे आणि सुरक्षा कवच स्वीकारावं. जय हिंद, जय भारत.’’

****

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयातले प्राचार्य भारत देशमुख यांनी कोविड लसीची खबरदारीची मात्रा घेतली आहे. सर्व नागरिकांनी ही मात्रा घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे…

‘‘मी प्राध्यापक भारत रणजित देशमुख. नारायणराव वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर. नुकतंच मागच्या महिन्यामध्ये मी कोरोनाचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस घेतलेला आहे. छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शनपासून माझा बचाव होत आहे. मी सर्वांना आवाहन करतो, की आपणही केंद्र शासनाच्या फ्री ठेवलेल्या या बुस्टरचा लाभ घ्यावा. धन्यवाद.’’

****

 भारतीय रिझर्व्ह बँकेनं रूपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. व्यवहारातल्या अनियमिततेमुळे ही कारवाई करण्यात आली असून, येत्या २२ सप्टेंबरपासून बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. बँक कर्मचारी संघटनेनं दाखल केलेल्या आणि इतर खटल्यासंदर्भात, २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

उस्मानाबाद इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हर घर तिरंगा मोहिमेसाठी तिरंगा ध्वज विक्री केंद्राचं उद्घाटन, काल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उस्मानाबाद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातर्फे हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या अठरा पोलीस ठाण्यांत विक्रीसाठी ध्वज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये काल तीन हजार सातशे एकोणचाळीस शाळांमधल्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी, राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात भाग घेतला. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह अन्य मान्यवर आणि अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

लातूर जिल्हा प्रशासनाकडून स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका मुख्यालयात तसंच गावोगावी कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जाऊन देशभक्तीपर चित्रफिती, जिंगल्स आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरव गाथा दाखवण्यासाठी सज्ज असलेल्या दोन दृकश्राव्य एल ई डी रथांना, काल लातूर जिल्हा परिषदेतून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.

दरम्यान, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर शहरातून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. गंजगोलाई इथून निघालेली ही पदयात्रा दयारामरोड, खडक हनुमान, आजाद चौक या भागातून मार्गक्रमण करत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात विसर्जित झाली.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी इथं काल दिव्यांगांची वाहन फेरी काढण्यात आली. या फेरीला जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय, परभणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं, 'हर घर तिरंगा' अभियानाची जनजागृती करण्यासाठी परभणी शहरात बचत गटातल्या महिलांची महारॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सशस्त्र सीमा बलाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल येलकी इथल्या छावणीत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महात्मा फुले हायस्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले. त्यामध्ये वैशाली मिटकर हीनं मुलींमधून, तर पवन औटे यानं मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला.

****

संत वाड्मयाच्या अभ्यासक आणि लेखिका वसुंधरा बनहट्टी यांचं काल पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. वसुंधरा बनहट्टी यांनी श्री संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत एकनाथ, संत सखू, आदी संतांवर आणि त्यांच्या वाड्मयांवर अभ्यासपूर्ण लेखन केलं. त्यांचे लेखनप्रसाद, युगबोध, रसिक प्रसिद्ध झाले. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या त्या पत्नी होती.

****

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल रानभाजी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवाला शेतकऱ्यांचा आणि नांदेड शहरातल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याच्या विविध भागातून यामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी, महिला गट, शेतकरी गटांनी रानभाज्या, रानमेवा, सेंद्रीय भाजीपाला आणि इतर विविध खाद्यपदार्थ या महोत्सवात विक्रीसाठी आणले होते. काल दिवसभरात या महोत्सवात सुमारे चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...