Friday, 12 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.08.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 August 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      जालन्यात स्टील कारखान्यांवर, आयकर विभागाच्या छाप्यांत, सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकी

·      चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांना शपथ

·      राज्य विधिमंडळाचं येत्या १७ तारखेपासून पावसाळी अधिवेशन

·      `घरोघरी तिरंगा` मोहिमेत सर्व जनतेनं सहभागी होण्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आवाहन 

·      केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन सत्तेवर आलेलं सरकार फार काळ टिकणार नाही- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ८७ रुग्ण, मराठवाड्यात ७१ बाधित

आणि

·      येत्या रविवारपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

****

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत, सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. आयकर विभागानं जालना इथल्या दोन कारखानदारांच्या जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबई इथल्या एकूण ३० ठिकाणी या धाडी टाकल्या. यामध्ये ५६ कोटी रुपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटी रुपयांचा ऐवज, तसंच सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह, महत्त्वाचा दस्तावेज जप्त करण्यात आला. लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या या कारखानादारांनी, आवश्यकतेपेक्षा, आणि कागदपत्री न दाखवता, मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा साठा केला होता. त्याचप्रमाणे अनेक बेहिशेबी व्यवहार करुन वस्तू आणि सेवा करही चोरी केल्याचं आयकर खात्याला आढळून आलं होतं. या कारवाईमध्ये या कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावानं अनेक सहकारी बँकांच्या तिजोरी मध्येही दागिने आणि रोख रक्कम ठेवण्यात आल्याची माहिती, आयकर खात्यानं दिली आहे. ही कारवाई पुढंही सुरू राहणार असल्याचं आयकर खात्यानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून काल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या सहा तारखेला झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेल्या धनखड यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा ५२८ विरुद्ध १८२ मतांच्या फरकानं पराभव केला होता.

****

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेपासून मुंबईत होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालेल. काल मुंबईत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसंच कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, उपस्थित होते. २४ ऑगस्टला विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातल्या विधानसभा आणि विधानपरिषद बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

****

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून, प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीनं घरोघरी तिरंगाहे अभियान यशस्वी करावं, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये काल मंत्रालयात या संदर्भातला कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलंत होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या विक्री दालनातून राष्ट्रध्वज विकत घेतले.

****

`घरोघरी तिरंगा` मोहिमेत सर्व जनतेनं सहभागी होण्याचं आवाहन, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद हा ऐतिहासिक वारसा जपणारा जिल्हा असून, या ऐतिहासिक वारसा स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवावा, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी आदी सूचना संबंधितांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले….

‘‘मी नागरीकांना विनंती करतो की आपण आपल्या घरावरती राज्य आणि केंद्र शासनाच्या यंत्रणेतून मिळणारे तिरंगे झंडे आपल्या घरावती लावावेत, ७५वा स्वातंत्र्य दिवस आपण उत्साहात साजरा करावा, एलोरा केव्ह्ज असतील, अजिंठा लेणी असेल, या तिनही ठिकाणी तिरंगा झेंडा लावायचं काम एएसआय मार्फत होत आहे. त्याचबरोबर बीबीचा मकबरा आणि काही पर्यटन स्थळं आहेत, त्याठिकाणी रोषणाई सुद्धा करण्यात येणार आहे. जे ऐतिहासिक दरवाजे आहेत, त्या ऐतिहासिक दरवाज्यांवर सुद्धा तिरंगा लावला पाहिजे, म्हणून मी तशा सूचना दिलेल्या आहेत.’’

 औरंगाबाद मधल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि त्यांच्या वारसांचा सन्मान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यात येणार असल्याचंही डॉ. कराड यांनी सांगितलं. 

****

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारनं परिपत्रक जारी केलं आहे. राज्यपालांच्या हस्ते पुण्यात तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय इथं सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण केलं जाणार आहे. राज्यात १९ जिल्ह्यात मंत्र्यांच्या हस्ते, तर अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. औरंगाबादमध्ये मंत्री संदीपान भुमरे, जालन्यात अब्दुल सत्तार, परभणीत अतुल सावे आणि उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. राज्यातल्या सर्व सार्वजनिक आणि शासकीय इमारती तसंच ऐतिहासिक किल्ल्यांवरही राष्ट्रध्वज उभारण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहनही सरकारनं केलं आहे.

****

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटांचं सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते काल औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. हे सरकार जोर जबरदस्ती करुन तसंच पैशांच्या जोरावर सत्तेवर आलं आहे, असा आरोप त्यांनी केला. या सरकारनं तब्बल ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला, तसंच राज्याची तात्काळ खाते वाटपाची पंरपरा मोडीत काढली असून, तीन दिवसानंतरही खाते वाटप केलेलं नाही, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटामध्ये विशिष्ट महत्त्वाच्या खात्यांसाठी लढाई सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ८७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ६ हजार २४३ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १६२ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल एक हजार ९७१ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख सहा हजार २९१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ७९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या २९, औरंगाबाद १३, उस्मानाबाद ११, जालना सात, बीड पाच, नांदेड चार, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

राज्यातल्या जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा तसंच वर्धक मात्रा देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुंबईत विधानभवनात कोविड प्रतिबंधक लसीकरण वर्धक मात्रा देण्याच्या मोहिमेचा काल प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यासह अन्य ठिकाणी सोयाबीन आणि विविध पिकांचं गोगलगाय किटकानं केलेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना बोंड आळीच्या धरतीवर विशेष मदत द्यावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या संदर्भातल्या मागणीचं निवेदन दिलं. राज्य शासनानं नुकतीच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून, यात कुठंही गोगलगायींच्या प्रादुर्भावानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत नाही, असं ते म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटीची वेळ मागितली आहे.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं काल नांदेड इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं, ३७५ मीटर लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची तिंरगा पदयात्रा काढण्यात आली. या तिरंगा पदयात्रेत विविध पक्षांचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हडको इथंल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल पोलिस दलातर्फे महिला सुरक्षा जनजागृती फेरी काढण्यात आली. महापालिकेच्या महापौर जयश्री पावडे यांनी या फेरीचा शुभारंभ केला. महिला आणि तरूणींना अडचणींच्या वेळी तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस विभागातर्फे शक्ती मोबाईलची निर्मिती करण्यात आली आहे. नांदेड शहरातील शैक्षणिक केंद्र लक्षात घेता खासगी शिकविणी वर्ग, महाविद्यालय आदी गर्दीच्या ठिकाणी शक्ती मोबाईल पथक मदतीसाठी तत्पर असेल, असं पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबादचे मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव गरड यांचं आज पहाटे सोलापूर इथं अल्पशा आजाराने निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. एसटी महामंडळ सेवेत ते कार्यरत होते. या काळात तसंच सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अनेक कविता कथासंग्रहाचं लेखन केलं. उस्मानाबाद इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते निमंत्रक होते.

****

येत्या रविवारपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...