Sunday, 14 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 14.08.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 August 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ ऑगस्ट २०२ सायंकाळी ६.१०

****

·      ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज राष्ट्राला संबोधन.

·      राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; संदीपान भुमरे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तर तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य मंत्री.

·      शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन;उद्या दुपारी अंत्यसंस्कार.

आणि

·      श्याम देशपांडे स्मृतिप्रित्यर्थ पहिला ग्रंथसखा पुरस्कार मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांना प्रदान.

****

देशाचा शहात्तरावा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता काही वेळातच म्हणजे सात वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सायंकाळी सात वाजेपासून राष्ट्रपतींच्या भाषणाचं थेट प्रसारण होणार आहे. रात्री साडे नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधून अनुवाद प्रसारित केला जाणार आहे.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिल्लीतल्या लाल किल्यावर ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर देशवासियांना संबोधित करतील.

****

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ८२ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस पदकं जाहीर झाले आहेत. यातील ३४७ जणांना शौर्य पुरस्कारांनं गौरवण्यात येणार आहे. ८७ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं पोलिस पदक आणि ६४८ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलिस पदक प्रदान करण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्रातील ४२ पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक, तीन जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचं पोलिस पदक आणि ३९ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं पोलिस पदक जाहीर झालं आहे.  

केंद्रीय राखीव पोलिस दलातील १०९ आणि जम्मू कश्मीर पोलिस दलातील १०८ कर्मचाऱ्यांना शौर्यासाठीचं पोलिस पदक घोषित झाले आहे. सात जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं राष्‍ट्रपतींच सुधार सेवा पदक आणि ३८ जणांना उत्कृष्ट सेवेसाठीचं सुधार सेवा पदक प्रदान जाहीर झालं आहे.

 

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या ३० अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे, यामध्ये महाराष्ट्रातल्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अग्निशमन दलातल्या सेवेसाठी महाराष्ट्रातल्या किशोर घाडीगावकर, सागर खोपडे, विशाल विश्वासराव, दीपक जाधव, संजय गायकवाड, गणेश चौधरी, संजय निकम यांना राष्ट्रपती पदकं जाहीर झाली असून राम पिंजरकर यांना गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक जाहीर झालं आहे.

 

औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे. अपर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली इथं कार्यरत असतांना त्यांनी २०२० मध्ये नक्षल विरोधी अभियानातल्या चमकदार कामगिरीसाठी त्यांना हे पदक जाहीर झालं आहे.

****

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे. रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि  पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त आणि नियोजन, विधी आणि न्याय, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन, अब्दुल सत्तार-कृषी, अतुल सावे- सहकार, तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राधाकृष्ण विखे-पाटील महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, चंद्रकांत पाटील- उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास मंत्री, गिरीश महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा आणि  स्वच्छता, दादा भुसे- बंदरे  आणि खनिकर्म, संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन, सुरेश खाडे-कामगार कल्याण,  उदय सामंत - उद्योग, रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, दीपक केसरकर-शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, इतर मागास आणि बहुजन कल्याण,  शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, तसंच महिला आणि बालविकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख १ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०७ कोटी ९९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचं आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात निधन झालं, ते ५२ वर्षांचे होते. मेटे यांच्या पार्थिव देहावर उद्या दुपारी बीड इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

पनवेल ते खालापूर दरम्यानच्या भातन बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात मेटे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेटे यांच्या निधनानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

विनायक मेटे यांच्या राजकीय कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत...

Byte…

केज तालुक्यातील राजेगाव इथं शेतमजुर कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यात एका उंचीवर पोहोचलेले विनायक मेटे यांचा जीवनप्रवास हा संघर्षमय असाच राहिला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेटे १९८५ च्या सुमारास मुंबईत गेले. प्रारंभीच्या काळात उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसायही केला. याच दरम्यान मराठा महासंघाच्या संपर्कात आले आणि जीवनाची नवीन सुरूवात त्यांनी केली.

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात भाजप बरोबर त्यांनी मराठा महासंघाचे काम केले. याच दरम्यान त्यांना पहिल्यांदा विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पुढे सलग पाच वेळा ते राष्ट्रवादी कांग्रेससह विविध पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेत कार्यरत राहिले.

शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले, या करिता राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चाचे चोख नियोजन देखील त्यांनी केलं. २०२२ मध्ये त्यांची आमदारकीची टर्म संपली, भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही तरीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आपण कायम राहणार असा निर्णय घेऊन आपली मैत्री कायम ठेवली, अजातशत्रु असं व्यक्तीमत्व असलेले विनायक मेटे यांच्या निधनाने शिवसंग्राम संघटनाच नाही तर मराठा समाजासह उपेक्षित, वंचित समाज हा एका लढवय्या नेतृत्वाला मुकला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, राजीव सातव आणि आता विनायक मेटे यांच्या निधनानं कणखर राजकीय नेतृत्वाला मराठवाडा सातत्यानं पारखा होतोय, हे मराठवाड्याचं दुर्दैवच म्हणावं लागेल.

आकाशवाणी बातम्यांसाठी शशी केवडकर, बीड.

****

मराठी साहित्याची वितरण व्यवस्था भक्कम करण्याची गरज ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांनी व्यक्त केली आहे. ग्रंथ प्रसार आणि वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्यरत असणारे श्याम देशपांडे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं संडे कल्बच्या वतीनं पहिला ग्रंथसखा पुरस्कार मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांना पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पाटकर बोलत होते. मराठवाड्यात पुस्तकांच्या दुकानांची संख्या अत्यल्प असल्याकडे पाटकर यांनी लक्ष वेधलं.

****

औरंगाबाद इथं असंघटित कामगार सेनेच्या वतीनं पहिल्या टप्प्यात १५० कामगारांना  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सुरक्षा संचाचं वाटप करण्यात आलं. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय कामगार संघटना कटिबद्ध तर आहेच याच बरोबर असंघटित कामगारांचे प्रश्न मागे पडू नयेत त्यांना देखील न्याय मिळावा, यासाठीच असंघटित कामगार सेनेची स्थापना झाल्याचं अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जालना जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं आज दहा किलोमीटर फेरी काढण्यात आली. राज्य राखीव दलाच्या मैदानावर सकाळी सहा वाजता जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन जी गिमेकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. ७०० जणांनी यात सहभाग घेतला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...